प्रख्यात भारतीय नर्तकी लेडी लीला सोखी ह्या मेनका नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील बारिसाल येथे उच्चकुलीन जमीनदार घराण्यात झाला. [१]शालेय जीवनात व्हायोलिनवादनात त्यांनी उत्तम प्रगती केली.

लेडी लीला सोखी
जन्म १५ ऑक्टोबर १८९९
मृत्यू २७ एप्रिल १९४७
टोपणनावे मेनका
जोडीदार साहेबसिंग सोखी
पुरस्कार ‘बंगाल म्यूझिक असोसिएशन’ - सुवर्णपदक

इ.स. १९०९ मध्ये व्हायोलिन वादनाच्या पुढील अभ्यासासाठी त्या इंग्लंडला रवाना झाल्या. लंडनमधील ‘सेंट पॉल गर्ल्स स्कूल’ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे पॅरिसमध्ये कुचबिहारच्या राणीसमवेत रहात असताना खलील देउशी ह्या इराणी नर्तकाबरोबर मेनका ह्यांनी पौर्वात्य नृत्ये सादर केली. नंतर कथ्थक नृत्यशैलीकडे त्याचे मन  आकृष्ट झाले. भारतात परतल्यावर लेडी मेनका ह्यांनी कथ्थकचे अध्ययन सुरू केले.

पंडित सीताराम मिश्र, महाराज बिहारीलाल मिश्र, गुरू रामदत्त मिश्र, अच्छन महाराज व लच्छू महाराज ह्या गुरूंकडे त्यांनी कथ्थकची तालीम घेतली. तसेच कथ्थकमधील लखनौ घराण्यातील नृत्यशैलीत विशेष प्रावीण्य मिळविले. तेव्हाच त्यांनी गुरू करुणाकरन् मेनन यांच्याकडे कथकलीचे व गुरू नबकुमार सिन्हा यांच्याकडे मणिपुरीचे अध्ययन केले.त्यांनी आपल्या संगीताच्या अध्ययनाची पार्श्वभूमी आणि कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या नृत्यशैलींचा व्यासंग ह्यांची सुरेख सांगड घालून स्वतःचे असे एक आगळे नृत्यनाट्याचे तंत्र व शैली निर्माण केली. कथ्थक हे मूलतः एकपात्री  नृत्य समजले जाते. त्यात नाट्याची भर घालून त्यांनी कथ्थकवर आधारित असे पहिले नृत्यनाट्य तयार केले.मुंबई येथे इ.स १९२६ मध्ये त्यांनी पहिला नृत्यप्रयोग सादर केला. ह्या कार्यक्रमाला सुविख्यात रशियन नर्तकी आन्न पाव्हलॉव्ह ह्या हजर होत्या.

कृष्णलिला, देव विजय नृत्य व मेनकालास्यम् ही त्यांची आंरभीची नृत्यनाट्ये होत. ही नृत्यनाट्ये प्रामुख्याने कथ्थकवर आधारित होती आणि ती ४५ मिनिटांची होती . नंतर त्यांनी सतत दोन वर्षे परिश्रम घेऊन मालविकाग्निमित्रम्‌ हे संपूर्ण अडीच तासांचे नृत्यनाट्य सादर केले. त्यात त्यांनी कथ्थक, कथकळी व मणीपुरी ह्या शैलींचा मिलाफ केला होता. नृत्यनाट्यातील कथावस्तू, वेशभूषा, संगीत इ. विविध अंगांसाठी त्यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांत परिपूर्णता साधण्याचात्यांचा प्रयत्न असे.

मेनका यांनी इ.स. १९३८ मध्ये भारतीय नृत्यपरंपरांच्या सखोल अभ्यासासाठी खंडाळा येथे एक नृत्यालय स्थापन केले. कथ्थक, कथकळीमणीपुरी ह्या परंपरांतील विद्वान गुरू व संगीतज्ञ यांना पाचारण करून त्यांनी ते एक आदर्श गुरुकुल बनविले होते. नृत्यशिक्षणाबरोबर आणखी इतर शिक्षणाचीही व्यवस्था तिथे करण्यात आली होती.

त्यांनी त्याचे पती साहेबसिंग सोखी यांच्या प्रोत्साहनाने अभिजात भारतीय नृत्याच्या प्रसाराकरिता अविरत मेहनत घेतली.त्यांनी अनेकवेळा भारतभर  नृत्यप्रसाराकरता दौरे केले. ‘बंगाल म्यूझिक असोसिएशन’ ने त्यांना सुवर्णपदक अर्पण करून त्यांचा नृत्यसेवेचा गौरव केला. कराची, हैदराबाद, लाहोर, कोलंबो इ. शहरातर्फे त्यांना मानपत्रे देण्यात आली. त्यानंतर  त्यांनी ब्रह्मदेश, मलाया, इंडोनेशिया वगैरे देशात दौरे केले. इ.स. १९३६ मध्ये त्यांनी यूरोपमधील शहरांतून विपुल प्रमाणात नृत्यकार्यक्रम सादर केले व बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय नृत्य ऑलिंपिकमध्ये तीन सन्मान पदके मिळवून आपल्या नृत्यजीवनातील यशाचा कळस गाठला. ह्या ऑलिंपिकमध्ये जगातील सतरा राष्ट्रांनी भाग घेतला होता. मेनका यांनी  सर्वांत जास्त पदके पटकवण्याचा मान मिळवून भारताला मोठा गौरव प्राप्त करून दिला. युरोपच्या दौऱ्यानंतर भारतीय नृत्यात प्रथमच मेनका यांनी आकर्षक नेपथ्याचा सुयोग्य वापर केला.

उदय शंकर यांच्या बरोबरीनेच मेनका ह्यांनी भारतीय नृत्याचा प्रसार भारतात व भारताबाहेर करण्यात हातभार लावला. नृत्यकलेचे शिक्षण  घेण्यास घरंदाज मध्यमवर्गीय मुलींना त्याकाळी समाजामध्ये बराच विरोध होता. ह्याविरुद्ध जाऊन  मेनका ह्यांनी बंड करून मध्यमवर्गातील घरंदाज स्त्रियांना नृत्याचे प्रांगण खुले केले. त्यांच्या बहुमोल कार्याचे खरे मूल्यमापन म्हणजे त्यांनी गुरू कृष्णन कुट्टी, गुरू बिपिन सिन्हा यांसारखे नर्तक, राम गांगुली यांसारखे संगीतदिग्दर्शक व विष्णू शिरोडकरांसारखे तबलावादक महाराष्ट्राला मिळवून दिले. तसेच दमयंती जोशी, शेवंती, मालती पांडे, कमला कीर्तिकर, शिरीन वजिफदार यांसारख्या नामंवत नर्तकींची परंपराही तयार केली. मेनका यांच्या कथ्थक नृत्यप्रणालीचा वारसा भारतात त्यांच्या दमयंती जोशी यासारख्या शिष्या चालवला.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ Kothari, Sunil. "The magnetic Madame Menaka and the Tiger of Hastinapur". The Asian Age. 2020-03-28 रोजी पाहिले.