दमयंती जोशी

भारतीय नृत्यांगना

दमयंती जोशी (जन्म :५ सप्टेंबर १९२८, - मुंबई, १९ सप्टेंबर २००४) या कथक हे भारतीय शास्त्रीय नृत्य करणाऱ्या नृत्यांगना होत्या. त्यांनी सन १९३० च्या दशकात मॅडम मेनका यांच्या पथकामध्ये नृत्य करायला सुरुवात केली. हे पथक जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये आपली कला सादर करत असे. दमयंती यांनी जयपूर घराण्याचे सिताराम प्रसाद यांच्याकडून कथ्थक नृत्याची तालीम घेतली आणि अतिशय लहान वयात त्या चांगल्या नृत्यांगना बनल्या. नंतर त्यांनी लक्ष्मण महाराज आणि शंभू महाराज या लखनौ घराण्याच्या गुरूंकडून नृत्याची तालीम घेतली. त्यामुळे त्यांच्या नृत्यामध्ये दोन्ही घराण्यांची वैशिष्ट्ये दिसत. सन १९५० पासून स्वतंत्ररीत्या नृत्याचे सादरीकरण करू लागल्या. १९६० च्या दरम्यान त्या मान्यताप्राप्त कलाकार बनल्या. त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये स्वतःचे नृत्य विद्यालय सुरू केले. त्यांना १९६८मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार व १९७०मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य संगीत नृत्य अकादमी पुरस्कारसुद्धा मिळाला. लखनौमधील उत्तर प्रदेश कथक केंद्राच्या त्या संचालिका होत्या.(१९९०-९३)[]

दमयंती जोशी
आयुष्य
जन्म ५ सप्टेंबर १९२८
जन्म स्थान मुंबई
संगीत कारकीर्द
कार्य कथक नृत्य
पेशा नर्तिका, नृत्य दिग्दर्शक
गौरव
गौरव पद्मश्री - १९७०
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार – १९६८

पूर्वायुष्य व शिक्षण

संपादन

दमयंती जोशी यांचा जन्म मुंबईमध्ये एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. [] त्यांच्या जन्मानंतर काही महिन्यातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.[] आईच्या प्रोत्साहनामुळे वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी पंडित सीताराम प्रसाद यांच्याकडून कथक नृत्याची तालीम घेण्यास सुरुवात केली. पुढे त्या मुंबईमध्ये हाफकिन इन्स्टीट्यूटचे संचालक जनरल डॉक्टर साहिब सिंग सोखी आणि त्यांची पत्नी लीला सोखी ( ज्या पुढे मॅडम मेनका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या) यांच्या घरामध्ये त्या वाढल्या. मॅडम मेनका यांच्या स्वतःच्या अपत्याचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे त्यांनी दमयंती जोशी यांना दत्तक घ्यायचे ठरवले. पण जोशी यांची आई वत्सला जोशी यांची त्याला मान्यता नव्हती.दोन्ही कुटुंबांनी दमयंती यांचे संयुक्त पालकत्व घेण्याचे वत्सला जोशी यांनी मान्य केले. मॅडम मेनकांच्या पथकामध्ये त्यांनी नृत्य सादर करण्यास सुरुवात केली.पुढील दहा वर्षात त्यांनी या पथकातून भारतात तसेच लंका, मलाया, ब्रह्मदेश, युरोप इ. ठिकाणच्या परदेशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये नृत्य सादर केले. []सोखी कुटुंबाने दमयंतीच्या आईला नोकरी दिली.तसेच दमयंती जोशी यांचे शिक्षणही केले. जोशी यांनी पुढे रुईया महाविद्यालयातून इंग्रजी विषयात कलाशाखेची पदवी ऑनर्ससह मिळवली. दमयंती जोशी या मुंबईच्या श्री राजराजेश्वरी भरत नाट्यकला मंदिराच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. तेथे त्यांनी गुरू टी.के. महालिंगम पिल्लै यांच्याकडून भरतनाट्यमची तालीम घेतली.

कारकीर्द

संपादन

सन १९५० च्या दशकामध्ये दमयंती यांनी एक यशस्वी एकल कथक नृत्यांगना म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांनी दिल्लीच्या कथक केंद्र, दिल्ली येथे त्यांनी शंभू महाराज यांच्याकडे तालीम घेतली. लखनौ घराण्याचे पंडित अच्छन महाराज यांच्याकडून कथक नृत्याची अधिकची तालीम घेतल्यावर त्यांनी जयपूर घराण्याचे गुरू हिरालाल यांच्याकडूनसुद्धा तालीम घेतली. कथक नृत्याचे सादरीकरण साडी हा पोशाख वापरून करणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या.

इंदिरा कला विश्वविद्यालय खैरागड येथे आणि कथक केंद्र लखनौ येथे त्यांनी नृत्य शिक्षिका म्हणून काम केले. 

त्यांना  १९६८ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९७० मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्या बिरेश्वर गौतम यांच्या गुरू होत्या.

१९७१ मध्ये फिल्म्स डिव्हिजन, भारत सरकारच्या कथक नृत्यावर तयार केलेल्या माहितीपटामध्ये त्यांचा समावेश आहे. तसेच १९७३ मध्ये हुकुमत सरीन यांनी त्यांच्यावर ‘दमयंती जोशी’ नावाचा एक चित्रपट तयार केला.[] इंदिरा गांधी राष्ट्रीय कलाकेंद्राने ग्रेट मास्टर सिरीज या मालिकेत सितारा देवी आणि दमयंती जोशी यांच्यावरचे चित्रपट एका डी.व्ही.डी.मध्ये प्रकाशित केले.[] भारत सरकारने चीन आणि जपानला पाठवलेल्या सांस्कृतिक शिष्टमंडळात त्या सहभागी होत्या.[]

१९ सप्टेंबर २००४ रोजी मुंबईतील दादर येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

दमयंती जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • मॅडम मेनका []

दमयंती जोशी यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

संपादन
  • दमयंती - मेनकाज डॉटर - सी. एस. लक्ष्मी, रोशन जी. शहानी []
  • नृत्यसौदामिनी दमयंती जोशी - प्रा. सुहासिनी पटवर्धन, ग्रंथाली प्रकाशन[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "कथक की प्रतिभाओं को 'गुरु' की दरकार". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.
  2. ^ "नृत्यांगना दमयंती जोशी – Marathisrushti Articles". www.marathisrushti.com. 2020-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ a b "जोशी, दमयंती". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.
  4. ^ "जोशी, दमयंती". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2020-03-28 रोजी पाहिले.
  5. ^ Ministry of Information, Films Division. "Damayanti Joshi". https://archive.org/details/dli.MoI.DamayantiJoshi_English. २८ मार्च २०२० रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  6. ^ "Great Master Series – Smt. Sitara Devi and Smt. Damyanti Joshi (two films in one DVD)". http://ignca.gov.in/. २८ मार्च २०२० रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  7. ^ Joshi, Damayanti (1989). Madame Menaka (इंग्रजी भाषेत). Sangeet Natak Akademi.
  8. ^ Lakshmi, C. S.; Shahani, Roshan G. (1998). Damayanti, Menaka's Daughter: A Biographical Note Based on the Visual History Workshop, February 15, 1998 (इंग्रजी भाषेत). SPARROW, Sound & Picture Archives for Research on Women.
  9. ^ "नृत्यसौदामिनी दमयंती जोशी (Nrutyasoudamini Damyanti Joshi) | Granthali". Granthali. 2017-02-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-28 रोजी पाहिले.