रघुवीर भोपळे
रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादुगार रघुवीर (जन्म : २४ मे १९२४, - २० ऑगस्ट १९८४) हे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादुगार होते. भारतातील नामवंत जादूगारामधे त्यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व अनेक देशामध्ये जादूचे प्रयोग केले होते. उत्तर प्रदेशचे ओ.पी. शर्मा तसेच बंगालमधील पी. सी. सरकार हे जादुगार भारतात प्रसिद्ध आहेत. जादूगार रघुवीर हे पाहिले यशस्वी व्यावसायिक मराठी जादुगार आहेत.[१][२]
कौटुंबिक माहिती
संपादनरघुवीर यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात २४ मे १९२४ रोजी मुळशी धरणाजवळच्या कादव या गावात झाला. मुळशी धरणक्षेत्रामधे गाव व जमीन बुडाल्याने त्यांचे आई वडील चाकण जवळील आंबेठाण येथे पुनर्वसनाच्या जागी स्थलांतरित झाले.धरणग्रस्तांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या विस्थापितांच्या अडचणी त्यांनी सोसल्या.
बालपण व शिक्षण
संपादनघरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यानी पुण्याचे अनाथ विद्यार्थिगृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) या वसतिगृहात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. माधुकरी मागून त्यांनी आपले उदरभरण केले. कठीण परिस्थिती कुटुंबियांपासून दूर राहून त्यांनी मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची उंची ६ फूट २ इंच व डोळे निळे होते, म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त वाटत असे.
व्यावसायिक कारकीर्द
संपादन‘जादू’ या शब्दाची विलक्षण जादू पुरातनकाळापासून सर्वच देशामधील लोकांच्यावर पडलेली आहे. पूर्वी मदारी किंवा तत्सम फिरस्ते आपली हातचलाखी रस्त्यावर दाखवीत असत. ‘राणा’ या राजस्थानी जादूगाराचा खेळ त्यांनी रस्त्यावर एकदा पाहिला. राणाकडून जादूची ही कला त्यांनी शिकून घेतली. त्यानंतर सुमारे ८० वर्षांपूर्वी त्यांनी पहिला व्यावसायिक प्रयोग केला. गायिका हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांची कला पाहून त्यांना आफ्रिका दौऱ्यावर सोबत नेले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी जादूचा खेळ हा व्यवसाय म्हणून स्वीकारला. पुणे येथील शकुंतला पटवर्धन यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला. शकुंतलाताई पण त्यांच्यासोबत जादूचे प्रयोग करत असत. त्या ‘बोलक्या बाहुल्या’ हा कार्यक्रम सादर करीत असत. विजय व संजय ही त्यांची दोन मुलेही प्रयोगात असत. त्यांनी व शकुंतलाताई यांनी धनुर्विद्या आत्मसात केली होती.[३] एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे बाणाच्या साहाय्याने हार घालून स्वागत केले होते. शक्तीचे प्रयोग, योगासने तसेच श्वास रोखून धरणे या गोष्टींमधे ते तरबेज होते. आपल्या कार्यक्रमांमधून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचेही कार्य करीत असत. त्यासाठी त्यांनी प्रबोधनपर व्याख्यानेही दिली. नारळ फोडून कुंकू काढणे यासारखे भोंदूगिरीचे चमत्कार कसे केले जातात याचे प्रात्यक्षिक दाखवत. 'जादू ही कला आणि केवळ हातचलाखी आहे’ हे स्पष्ट जाहीरपणे सांगणारे ते एकमेव जादूगार होते. सन १९७७ मध्ये त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली. पुणे येथे २० ऑगस्ट १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.[४]
काही खास वैशिष्ट्ये, किस्से
संपादनरघुवीर प्रयोगाच्या दरम्यान रिकाम्या घागरीमधून पाणी काढून दाखवायचे आणि त्या वेळी ते गंगेची प्रार्थना म्हणत असत. प्रयोग संपेपर्यंत बादली भरत असे. डोळ्यांवर काळी पट्टी बांधून ते रस्त्यावर मोटारसायकल चालवत असत. रस्त्यामध्ये कोणी हार घेऊन उभे असल्यास मोटारसायकल थांबवून हार गळ्यात घालून घेत असत.[५] एकदा रघुवीर पुण्याहून सांगलीला प्रयोगासाठी येताना रस्त्याच्या कडेला द्राक्षाचा स्टॉल होता. तिथे थांबून त्यांनी द्राक्षे घेतली त्याचे पैसे देण्यासाठी स्टॉलवाल्याकडूनच १ रुपयाचे नाणे घेतले आणि हाताच्या मुठीमध्ये ठेवून दुसऱ्या हाताने मुठीवर आघात करायला सुरुवात केली खाली स्टॉलवाल्याला हाताची ओंजळ करायला सांगितली आणि बघता बघता त्याने मागितले तेवढे रुपये त्याच्या ओंजळीमध्ये पाडले. मग त्याचा अचंबित चेहरा बघून म्हणाले,"ही हातचलाखी,नजरबंदी आहे. असे पैसे पाडता आले असते तर मला गावोगावी प्रयोग करावे लागले नसते.” त्यांनी भारतात तसेच इंग्लंड, जपान, रशिया इ. देशांत कलेचे प्रयोग केले. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी ७ हजार २३ प्रयोग केले. वर्ष १९६० मधे पुण्यामध्ये "जादूची शाळा" नावाची एक संस्था त्यांनी काढली. तेथे अनेक विद्यार्थी जादू शिकण्यासाठी येत असत तसेच अनेक परदेशी विद्यार्थीही जादू शिकण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. त्यांच्या निवासाची व्यवस्थाही पण केली होती. स्वप्नसृष्टी, नोटांचा पाऊस, हातातून वीजनिर्मिती, भुतांचा नाच, डोळे बांधून रस्त्यावर मोटरसायकल चालविणे इ. खेळांचे ते प्रयोग करीत असत. अनेक शाळा महाविद्यालयांमधे व्याख्याने देऊन त्यांनी या कलेचा प्रचार केला. त्यांच्या जपानी शैलीत बांधलेल्या बंगल्यात टाळी वाजविल्यावर पाणी येणे किंवा लाईट लागणे असे चमत्कार तंत्राच्या साहाय्याने घडत असत.[६]
सामाजिक बांधीलकी
संपादनअनेक लहान गावांत व शहरांत त्यांनी शाळा, सामाजिक संस्था यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चॅरिटी शो केले. पु.ल.देशपांडे, राजा गोसावी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर त्यांचे स्नेहसंबंध होते. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकामध्ये राधेश्याम महाराज साकारताना त्यामध्ये अचूकता यावी म्हणून अत्र्यांनी पणशीकरांना रघुवीर यांच्याकडे जादूचे छोटे प्रयोग शिकायला पाठवले होते.
वारसा
संपादनत्यांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीने पण त्यांचा जादूचा वारसा जपला आणि जोपासला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र विजय आणि संजय यांनी जादूचे कार्यक्रम देशविदेशात चालू ठेवले. विजय यांचे चिरंजीव जादूगार जितेंद्र व त्याची पत्नी अश्विनी व त्यांचा मुलगा ईशान तसेच कन्या तेजा रघुवीर व तिची मुलगी इरा ही चौथी पिढीही या कला व्यवसायात आहेत.[७]
प्रकाशित साहित्य
संपादनत्यांनी 'मी पाहिलेला रशिया', 'प्रवासी जादूगार' व 'जादूच्या गमती जमती' ही तीन पुस्तके लिहिली. 'प्रवासी जादूगार' या पुस्तकात आलेले अनुभव त्यांनी रोचकपणे मांडले आहेत.[८]
सन्मान
संपादनत्यांचे पुस्तक 'प्रवासी जादूगार’ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
चित्रदालन
संपादन-
आपल्या कार्यालयात
-
पत्नी शकुंतला आणि नातू जितेंद्र यांच्यासोबत
-
जाहीर प्रयोगाचा फलक
-
मंचावर विविध जादूचे प्रयोग करताना
-
नोटांचा पाऊस
-
माणूस कापून अर्धा करण्याचा प्रसिद्ध प्रयोग
-
तीन पिढ्या - रघुवीर, विजय, जितेंद्र
संदर्भ
संपादन- ^ "आपला माणूस : जादूचे किमयागार". सामना. 2021-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-21 रोजी पाहिले.
- ^ "Page:Konkani Viswakosh Vol1.pdf/834 - Wikisource". wikisource.org. 2020-08-21 रोजी पाहिले.
- ^ Sahyādri. 1969.
- ^ रुद्रवाणी रघुवीर विशेषांक. पुणे: किर्लोस्कर प्रकाशन. १९८४.
- ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
- ^ "'जादूच्या शाळे'ची चार पिढ्यांत रुजलेली 'किमया'". महाराष्ट्र टाइम्स. 2020-08-21 रोजी पाहिले.
- ^ "तीन पिढ्यांच्या जादूचा १५ हजारावा प्रयोग". लोकसत्ता. 2016-05-05. 2020-08-21 रोजी पाहिले.
- ^ Mahārāshṭra sāhitya patrikā. Mahārashṭra Sāhitya Parishada. 1961.