सामना (वृत्तपत्र)

मराठी वृत्तपत्र


सामना हे शिवसेना या राजकीय पक्षाचे मुखपत्र असून ते मुंबई शहरातून प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राची सुरुवात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. सुरुवातीच्या काळात सामना मधून बाळासाहेबांची फक्त व्यंगचित्रे प्रकाशित होत असत. पण शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हे शिवसेनेचे मुखपत्र बनले.

सामना
प्रकारदैनिक

प्रकाशकसुभाष देसाई,
प्रबोधन प्रकाशन
संस्थापक संपादकबाळ ठाकरे
संपादकउद्धव ठाकरे
व्यवस्थापकीय संपादकसंजय राऊत
राजकीय बांधिलकीशिवसेना
भाषामराठी, हिंदी
किंमतरु.४.००
मुख्यालयभारत मुंबई, महाराष्ट्र, भारत

संकेतस्थळ: सामना.कॉम

२३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. [] दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन प्रसंगी बोलताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल आणि उद्या पाळी आली तर, आम्हाला खऱ्या शस्त्रालाही हात घालावा लागेल.” सर्वांना प्रवेश नसल्याने अनेक जण बाहेर उभे राहून भाषण ऐकत होते. ‘सामना’चे प्रकाशन होताच, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या समारंभात महापौर छगन भुजबळ, शिवसेना नेते सर्वश्री मनोहर जोशी, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर यांचीही भाषणे झाली. ‘सामना’चे कार्यकारी संपादक श्री. अशोक पडबिद्री यांनी प्रास्ताविक केले तर, श्री. सुभाष देसाई यांनी सूत्रसंचालन केले.[ संदर्भ हवा ]

‘सामना’चा पहिला अग्रलेख होता, ‘या असे सामन्याला.’ या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.

प्रकाशन प्रसंगी ‘सामना’चे संपादक बाळासाहेब ठाकरे म्हणाले, “सामना हा राज्यकर्त्यांना दाखवलेला आरसा आहे. त्यात आपली प्रतिमा पाहून त्यांनी स्वतःची प्रतिमा सुधारावी, हा आरसा फोडण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. कारण तो फुटला तर, त्याचे तुकडे पडतील आणि प्रत्येक तुकड्यात त्यांची प्रतिमा अधिकच विद्रूप दिसेल."

सामना सहा महिन्यांचा झाला तेव्हा बाळासाहेबांचा अग्रलेख त्यांच्या सहीनिशी प्रसिद्ध झाला. अग्रलेखाचे शीर्षक होते “तुमचा ‘सामना’ सहा महिन्यांचा झाला!”

आज शिवसेना पक्षप्रमुख आणि ‘सामना’चे संपादक अशी दुहेरी जबाबदारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळीत आहेत, तर संजय राऊत हे कार्यकारी संपादक म्हणून ‘सामना’ची संपादकीय जबाबदारी पार पाडीत आहेत. संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते आहेत.

संदर्भ

संपादन
  1. ^ "बाळासाहेब ठाकरेंचा सामना जेव्हा ठाकरेंचा नव्हता, तेव्हाची गोष्ट..."