रंगो बापूजी

महाराष्ट्रातील क्रांतिकारक
(रंगो बापूजी गुप्ते या पानावरून पुनर्निर्देशित)

रंगो बापूजी गुप्ते अथवा रंगो बापूजी (???? - इ.स. १८८५) हे सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंह भोसले ह्यांचे कारभारी आणि वकील होते. श्रीशिवछत्रपतींचे पहिले साथीदार दादाजी नरसप्रभु यांच्या वंशातील, चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीतील रंगो बापूजी ह्यांनी प्रखर स्वामिनिष्ठा, बुद्धिमत्ता, लेखन आणि वक्तृत्वकौशल्य ह्या आपल्या गुणांच्या जोरावर ईस्ट इंडिया कंपनी सरकारविरुद्ध जवळपास १३-१४ वर्षे सनदशीर मार्गाने लढा दिला.

छत्रपतींची वकिली संपादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे अखेरचे वारस सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह १८०८ साली गादीवर आले. संस्थानावर डोळा असणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रजांनी दरबारातील काही असंतुष्ट मंडळींच्या संगनमताने महाराजांविरुद्ध कट कारस्थाने करण्यास सुरुवात केली. ह्या कारस्थानांना तोंड देण्यासाठी छत्रपतींनी आपले कारभारी रंगो बापूजी ह्यांची वकील म्हणून नेमणूक केली आणि त्यांना कंपनी सरकारपुढे आपली बाजू मांडायला सांगितले.

आधी नेमलेल्या दोन वकिलांतर्फे केलेली शिष्टाई फसल्यावर रंगो बापूजी स्वतः महाराजांची बाजू मांडण्यासाठी इ. स. १८४०मध्ये लंडनला गेले. त्यांच्या आणि महाराज यांच्यामधील लंडन-सातारा असा सुरू झालेला पत्रव्यवहार कारस्थानातील प्रमुख बाळाजीपंत नातू ह्यांनी इंग्रजांच्या हाती देण्यास सुरुवात केली. हे ओळखल्यावर रंगो बापूजींनी चाणाक्षपणे असली आणि नकली पत्रव्यवहार वेगवेगळ्या लखोट्यांमध्ये आणि डाकेने पाठवून कारस्थान्यांना काटशह दिला.

लंडनस्थित रंगो बापूजी सफाईदारपणे इंग्रजी बोलू शकत होते. आपल्या संभाषण चातुर्याच्या आणि लेखन/वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी सातारच्या आणि मुंबईतल्या कंपनी सरकारातल्या इंग्रज अधिकाऱ्यांची कृष्णकृत्ये पुराव्यासकट चव्हाट्यावर आणली. इ.स. १८४६-१८४७मध्ये त्यांनी सातारची बाजू मांडण्यासाठी जाहीर भाषणे दिली, पत्रव्यवहार/अर्ज केले, पुस्तके छापली. १४ ऑक्टोबर १८४७ रोजी छत्रपती प्रतापसिंहांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा वकील असणाऱ्या बापूंनी बालछत्रपतींचे पालक आणि मयत छत्रपतींच्या संपदेचे विश्वस्त ह्या नव्या भूमिकेतून सातारची बाजू पुढे मांडली. दुर्दैवाने त्यांची ही भूमिका कंपनी सरकारने कायमच अमान्य केली.

१३-१४ वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर मात्र रंगो बापूजी लंडनहून भारतात परतले आणि त्यांनी वकिली सोडली. "कायदेबाजी करून इंग्रजांशी इकाडा देणारा रंगोबा आता मेला यावरून काय ते समजा" असे आपल्या घरच्या मंडळींना त्यांनी सांगितले. इतकी वर्षे आपल्या राजाला न्याय मिळावा म्हणून सर्वस्व बलिदान करणारे रंगो बापुजी आता मायदेशाला परत जाणार, ह्या बातमीमुळे कष्टी झालेल्या त्यांच्या इंग्लंडमधील मित्रांनी त्यांना निरोपादाखल एक मोठे सुंदर चांदीचे तबक गौरवचिन्ह म्हणून दिले. सध्या हे तबक पुणे येथील ‘राजा दिनकर केळकर’ वस्तूसंग्रहालयात जतन केलेले आहे.

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध संपादन

१८५७ चे वर्ष स्वातंत्र्यसमरामुळे गाजू लागले. गोसाव्याच्या वेशात भटकणाऱ्या रंगोबांची गाठ तात्या टोपे ह्यांच्याशी पडली. विचार-विनिमय झाले. त्यानंतर स्वतः धोंडोपंत बाजीराव पेशवे त्यांना बिठूरला घेऊन गेले. स्वातंत्र्यलढ्यासाठी दक्षिणेतले नेतृत्व करण्याचे निश्चित करून रंगोबा परतले. छत्रपतींविषयी आदर असणाऱ्या अठरापगड जातींमधील शेकडो लोकांना त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित केले. भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ ह्यांच्या मदतीने त्यांनी सैन्यभरणी सुरू केली. तसेच त्यांच्या हेरांनी इंग्रजांच्या पलटणींमध्ये बेदिली माजवण्यास सुरुवात केली.

मंगल पांडे यांची फाशी (एप्रिल ६ १८५७) व मीरतचा उठाव (मे ७, १८५७) या घटनांमुळे महाराष्ट्रात उठाव करण्यास उत्सुक लोकांना काळाचे वारे ओळखून त्यांनी "कुशल सेनानी योग्य वेळीच आघात करतो वा माघार घेतो" असा सबुरीचा सल्ला दिला. दुर्दैवाने फंदफितुरीमुळे ते इंग्रजांच्या तावडीत सापडले. पण तिथूनही मोठ्या शिताफीने ते निसटले ते पुन्हा इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैदेत असताना मोठ्या शिताफीने तिथून निसटून वेषांतर करत ते ठाणे गावठाणला आले. त्यांच्या मागावर असलेल्या इंग्रजांनी ठाणे येथील प्रभाकर विठ्ठल गुप्ते यांच्या घरी मुंजीच्या समारंभात वेढा घालून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लाल अलवाणाचा मुकटा नेसून आजीबाईच्या वेषात हातात नैवेद्याचे ताट घेऊन ते निसटले, ते कायमचेच.

रंगो बापूजींचे पुतणे यशवंतराव व वामनराव त्यांनीच केलेल्या तयारीप्रमाणे ५०० च्या आसपास मावळे घेऊन उत्तरेकडील उठावात सामील झाले. १८५७ च्या अखेरच्या लढाईत ते सहभागी झाले होते. स्वातंत्र्यलढा मोडून काढल्यावर दक्षिणेतल्या १७ जणांवर खटला भरण्यात आला त्यात रंगो बापूजींचा मुलगा सीताराम व त्यांचे मेव्हणे केशव निळकंठ चित्रे (अण्णा मामा) यांच्यासकट त्या १७ जणांना फाशीची शिक्षा झाली.

मृत्यू संपादन

कैदेतून निसटल्यावर रंगो बापूजी बैरागी बनले. इ.स. १८७०मध्ये दारव्हा येथे कुपरी नदी (गोकी नदीच्या?)च्या काठावर ‘बैरागी बाबा‘ या नावाने ते प्रकट झाले. काही काळ माहूरच्या अरण्यात राहिले. इ.स. १८८५मध्ये दारव्हा येथे आपल्या मठात त्यांनी देह ठेवला. मात्र सदरच्या माहितीबद्दल ठोस पुरावा उपलब्ध नाही.

रंगो बापूजी यांची चरित्रे संपादन

संदर्भ संपादन

  • २९ एप्रिल २००६ची लोकसत्ताची आवृत्ती