मार्गारेट हिल्डा थॅचर (इंग्लिश: Margaret Hilda Thatcher), पूर्वाश्रमीच्या मार्गारेट हिल्डा रॉबर्ट्स (इंग्लिश: Margaret Hilda Roberts), (१३ ऑक्टोबर, इ.स. १९२५ - ८ एप्रिल, इ.स. २०१३) या इ.स. १९७९ ते इ.स. १९९० या काळात ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या तसेच इ.स. १९७५ ते इ.स. १९९० या काळात हुजूर पक्षाच्या त्या अध्यक्षा होत्या. थॅचर या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. फेब्रुवारी ११ इ.स. १९७५ रोजी ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली. इ.स.च्या २० व्या शतकातील सर्वात अधिक काळ ब्रिटनचे पंतप्रधान पद भूषविणाऱ्या आणि आजवरच्या त्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. एका रशियन पत्रकाराने त्यांना 'पोलादी महिला' म्हणून संबोधले आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखू जाऊ लागल्या. कणखर राजकीय निर्णय, बुलंद नेतृत्वक्षमता यामुळे त्या २० व्या शतकातील एक पोलादी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. त्यानी अवलंबिलेली राजकीय शैली 'थॅचरिझम' या नावाने संबोधिली जाते.

मार्गारेट थॅचर

कार्यकाळ
४ मे १९७९ – २८ मे १९९०
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील जेम्स कॅलाघन
पुढील जॉन मेजर

जन्म १३ ऑक्टोबर १९२५ (1925-10-13)
ग्रॅंथम, लिंकनशायर, इंग्लंड
मृत्यू ८ एप्रिल, २०१३ (वय ८७)
लंडन
राजकीय पक्ष हुजूर पक्ष

कारकीर्द

संपादन

रसायनशास्त्राची पदवी असताना त्यांनी कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टरची पदवी मिळवली. इ.स. १९५९ मध्ये फिंचलेमधून खासदार म्हणून निवडून आल्या एडवर्ड हीथ यांच्या सरकारमध्ये इ.स. १९७० मध्ये त्यांची शिक्षण आणि विज्ञान राज्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. इ.स. १९७५ मध्ये हीथ यांचा पराभव करून त्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडून आल्या आणि ब्रिटनच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या झाल्या. इ.स. १९७९ च्या सार्वत्रिक निवडणूकांच्या विजयानंतर त्या पंतप्रधान झाल्या.

१० डाउनिंग स्ट्रीट(पंतप्रधान कार्यालय) मध्ये आल्यावर त्यांनी तातडीने काही महत्त्वाचे राजकिय आणि अर्थव्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी ठोस कार्यक्रम लागू केले. ब्रिटनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला कारणीभूत असणाऱ्या गोष्टिंना त्यांनी सर्वतोपरी आळा घालण्याचा प्रयत्न केला. आर्थिक विकेंद्रीकरण, सरकारी उद्योगांचे खासगीकरण, कामगार संघटनांचे खच्चीकरण या गोष्टिंच्या त्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. पंतप्रधान पद ग्रहण केल्यानंतर प्रसिद्धिच्या शिखरावर पोहोचलेल्या थॅचर यांची ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे लोकप्रियता कमी होऊ लागली. पण नंतर आलेल्या आर्थिक विकासाच्या लाटेमुळे आणि इ.स. १९८२ मध्ये आर्जेंटिना बरोबर झालेल्या फॉकलंड युद्धामुळे त्या पुन्हा एकदा लोकप्रिय नेत्या झाल्या आणि इ.स. १९८३ मध्ये पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या.

इ.स. १९८७ मध्ये थॅचर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्या. या काळात त्यांनी करप्रणालीत केलेल्या बदलांमुळे आणि युरोपियन संघराज्याबद्दल त्यांच्या मताबद्दल त्यांना टिकेला सामोरे जावे लागले. त्यांच्या सरकारमधील अनेक जण त्यांच्याविषयी नाराज होते. मायकल हेसेलटाईन यांनी थॅचर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याला सुरुवात केल्यावर नोव्हेंबर, इ.स. १९९० मध्ये थॅचर यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "मार्गारेट थॅचर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)