पुंगी

(बीन या पानावरून पुनर्निर्देशित)

पुंगी किंवा बीन हे एक प्राचीन सुषिरवाद्य वाद्य आहे. नागसापांच्या जाती याविषयी समाजात निरनिराळे समज व गैरसमज आहेत. साप विषारी आहे की बिनविषारी हे पाहण्याअगोदरच नव्हे तर दिसताक्षणीच त्यास मारून टाकण्याची रीत बनली आहे. त्यांना मारून टाकणे सोपे वाटत असले तरी त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे फारच कठिण आहे. सापांचे रक्षण व्हावे आणि माणसांनाही कोणती इजा होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवली जाते. त्यातीलच एक शक्कल म्हणजे सापांवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी 'पुंगी' या वाद्याचा केला जाणारा उपयोग.[ संदर्भ हवा ]

गारुडी पुंगी वाजवितांना

पुंगीचा विकास मूलत: भारतीय लोकसंगीतामध्ये झालेला आहे. गारुडीजादूगार लोक नाग-सर्पांना मोहविण्यासाठी हे वाद्य वापरतात. पुंगी हे वाद्य बनविण्यासाठी देठाकडे निमुळता होत गेलेला एक कडू भोपळा घेतला जातो. तो आतून पोखरण्यात येतो. त्याच्या रुंद टोकाशी एक भोक पाडले जाते. त्यात देवनाळाच्या वीत-दीड वीत लांबीच्या दोन नळ्या बसवतात. या दोन नळ्यांपैकी एकीला स्वरांची सात छिद्रे पाडलेली असतात. दुसऱ्या नळीचा उपयोग फक्त सुरासाठी होतो. स्वरांच्या छिद्रांवर बोटे ठेवून वरील अंगास ठेवलेल्या मोठ्या छिद्रावर तोंडाने फुंकल्याने पुंगी वाजू लागते. पुंगीच्या नळ्या जोडण्यासाठी व स्वर कमी करण्यासाठी मेणाचा उपयोग करतात. नळीची सर्व छिद्रे बंद केल्यावर आवाज आपोआप कमी होतो तर ती छिद्रे उघडी ठेवल्यावर उच्च पातळीत बीन ऐकायला मिळते. या वाद्याची अशी रचना केलेली असते की त्यातून भैरवीचे स्वर निघावे.[ संदर्भ हवा ]

बीन

पुंगी या वाद्याचा उपयोग नागाशी संबंधित अशा अनेक चित्रपटांमध्ये करण्यात आला आहे. सर्पांशी निगडीत सर्व गीतांमध्ये पुंगीचा प्रभावीपणे वापर केलेला दिसतो. हे वाद्य शास्त्रीय संगीतात बसणारे नसले तरी वातावरणनिर्मितीसाठी तिचा वापर अनेक वादक करतात. गारुडी पुंगी वाजवत असताना आजूबाजूला सतत हलवत असतो. या पुंगीला शत्रू समजून तिच्यावर निशाणा साधण्यासाठी ती ज्या दिशेने हालेल त्या दिशेने नाग आपला फणा डोलावतो.[ संदर्भ हवा ]

पुंगी सारखेच एक वाद्य आसाममधील डोंगरी लोक वाजवितात. त्यामध्ये भिन्न भिन्न लांबीच्या ५ ते ९ वेतनलिका बसविलेल्या असतात. या वाद्याची रचना ऑरगनच्या तत्त्वावर केलेली असते. गारुडी व जादूगार पुंगीचा उपयोग करून नागांचे खेळ दाखवितात. यात्रा, उत्सव याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाऊन गारुडी आपले कलाप्रदर्शन करतात. निरनिराळ्या पद्धतीच्या व स्वरांच्या पुंग्यांचा उपयोग करून नागांना डोलवले जाते. जादूगर आपल्या पुंगीतून निघणाऱ्या स्वरांचा उपयोग नागांबरोबरच पाहणाऱ्यांना देखील मोहीत करण्यासाठी करतात. पुंगी हे वाद्य गारुडी व जादूगर यांच्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. त्याचा विकास इतर क्षेत्रांमध्ये झालेला दिसत नाही.[ संदर्भ हवा ]

समोखनसिंग नामक एक प्रसिद्ध बीनवादक इ.स. १६ व १७ व्या शतकात होऊन गेला. तो रजपूत असून राजस्थानातील खंडार गावचा रहिवासी होता. त्याने फार परिश्रम करून बीनवादनात प्रावीण्य संपादन केले होते. पुढे अकबराच्या कानी त्याची कीर्ती पोहोचली. अकबराने समोखनसिंगला बोलावून घेतले व दरबारात वादक म्हणून त्याची नेमणूक केली. त्याचे बीनवादन ऐकून अकबर खूप खूष झाला. दरबारातील गायक तानसेनच्या सांगण्यावरून समोखनसिंगने मुसलमान धर्म स्वीकारला व तो नौबदखॉं बनला. तानसेनाने मग त्याला आपली मुलगी दिली. नौबदखॉंला अनेक रागांतील पुष्कळ ध्रुवपदे येत होती. त्याच्या ध्रुवपद म्हणण्याच्या पद्धतीला 'खंडारबाणी' असे नाव आहे. त्याच्या व्यासंगामुळे त्याला फार लौकिक मिळाला. त्याला रसबीनखॉं व रागरसखॉं असे दोन पूत्र होते. ते दोघे अनुक्रमे बीनवादक व गवई म्हणून प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी संपादन