बावीस प्रतिज्ञा

बौद्ध धम्म स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवदिक्षीत बौद्धांना दिलेल्या प्रतिज्ञा

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा सपत्निक स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत. असे मानले जाते की, या प्रतिज्ञा मानवी प्रवृत्तीला सत्प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक क्रांतीच्या दीशा दिग्दर्शक आहेत.[][] भारतामध्ये बौद्ध धर्म स्वीकारताना व्यक्ती किंवा व्यक्ती-समूहांकडून या प्रतिज्ञा शपता म्हणून वदवल्या जातात. बावीस प्रतिज्ञांना 'धम्म प्रतिज्ञा', 'डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा', 'बौद्ध प्रतिज्ञा', 'नवबौद्ध प्रतिज्ञा' किंवा 'नवयानी प्रतिज्ञा' असेही म्हणले जाते.

दीक्षा ग्रहण करताना बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर

२२ प्रतिज्ञा

संपादन
 
हिंदू धर्माच्या त्याग करतांना दीक्षाभूमी, नागपूर येथे २२ प्रतिज्ञा देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १४ ऑक्टो. १९५६

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालीलप्रमाणे आहेत.[][][][]

  1. मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  2. मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  3. मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
  4. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
  5. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
  6. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
  7. मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
  8. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
  9. सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
  10. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
  11. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
  12. तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
  13. मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
  14. मी चोरी करणार नाही.
  15. मी व्याभिचार करणार नाही.
  16. मी खोटे बोलणार नाही.
  17. मी दारू पिणार नाही.
  18. ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
  19. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
  20. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
  21. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
  22. इतःपर मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.


या २२ प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धर्मात महत्त्वाच्या आहेत. सामान्यतः सर्व नवयानी बौद्ध या २२ प्रतिज्ञा पाळतात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्गदहा पारमिता अनुसरण्यासाठी आहेत.

स्तंभ

संपादन
 
२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ

या बावीस प्रतिज्ञांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी'चे तत्कालीन अध्यक्ष आणि बिहारकेरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई तसेच संस्थेचे सचिव सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीवर या बावीस प्रतिज्ञा प्रशस्त संगमरवरी दगडावर कोरून तो स्तंभ स्तूपाच्या प्रथमदर्शनी ठेवला आहे. वर्धा येथील बुद्ध विहारातही डॉ. म.ल. कासारे यांच्या नेतृत्वाखाली अशाच स्वरूपाचा भव्य स्तंभ उभारण्यात आला आहे.

उच्चारण पद्धती

संपादन

बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देतांना या बावीस प्रतिज्ञांचे आयोजन केलेले असावे. या प्रतिज्ञा करताना अनुया सश्रद्ध भावनेने हात जोडून त्रिशरणपंचशीलांचा त्या पाठोपाठ उच्चारण करताना डोळे मिटून होते. बौद्धजन डोळे मिटून श्रद्धने त्या बावीस प्रतिज्ञांचे ग्रहण करून पुन्हा उच्चारतात, तेव्हा त्या वचनांना प्रार्थनेचे स्वरूप आपोआप प्राप्त होते.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही ; वाचा बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा". marathibhaskar. 2017-12-06. 2018-05-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "http://velivada.com/2015/02/15/22-vows-by-dr-ambedkar-in-hindi-in-photos/". velivada.com. 2018-05-09 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  3. ^ १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दिलेले भाषण
  4. ^ "22 Vows of Dr. Ambedkar : English, Hindi, Marathi". Jai Bhim Ambedkar (इंग्रजी भाषेत). 2017-01-29. 2018-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.
  5. ^ "22 Vows Of Dr. Ambedkar - BAIAE Japan" (इंग्रजी भाषेत). 2018-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.
  6. ^ "ARJUNWADI-Village Panchayat - National Panchayat Portal - Govt. of India". www.arjunwadi.mahapanchayat.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-08-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-18 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन