शिवाजीराव अनंतराव भोसले

एक मराठी वक्ते व लेखक
(प्राचार्य शिवाजीराव भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)


शिवाजीराव अनंतराव भोसले (जुलै १५, १९२७ - जून २९, २०१०) हे मराठी वक्ते, लेखक होते.

शिवाजीराव अनंतराव भोसले
जन्म नाव शिवाजीराव अनंतराव भोसले
जन्म जुलै १५, इ.स. १९२७
कलेढोण , (सातारा जिल्हा), महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून २९, इ.स. २०१०
परळ (मुंबई), महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अध्यापन, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य, व्याख्याते
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती दीपस्तंभ, यक्षप्रश्न, जागर (खंड १ आणि २), प्रेरणा, हितगोष्टी
वडील अनंतराव
आई अनसूयाबाई
अपत्ये संजीव (मुलगा); रंजना (सून); प्रा. अंजली (मुलगी)

बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी

संपादन

भोसल्यांचा जन्म साताऱ्यातील कलेढोण येथे जुलै १५, १९२७ रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव अनसूयाबाई होते. भोसल्यांचे थोरले भाऊ लष्करी अधिकारी, तर दुसऱ्या क्रमांकावरील थोरले बंधू प्राथमिक शिक्षक आणि त्यानंतरचे बंधू बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते.

विटा या लहान गावात शिवाजीरावांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा न्यू इंग्लिश स्कूल, पुण्यातील वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण झाले. राजर्षि शाहू महाराजांच्या बोर्डिंगाच्या 'कमवा शिका' योजनेचा लाभही त्यांनी घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजातून घेतली. थोरले भाऊ बाबासाहेब भोसले यांच्याबरोबर साताऱ्यात त्यांनी काही काळ वकिलीही केली.

अध्यापकीय कारकीर्द

संपादन

फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वर्षे प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.

१९८८-९१ या काळात त्यांनी छ्त्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद सांभाळले.

वक्तृत्व

संपादन

शिवाजीराव भोसले एक सुपरिचित व्याख्याते होते. भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, मराठी संत, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य इत्यादी विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्यान देत. त्यांपैकी काही व्याख्यानमाला अशा :-

वसंत व्याख्यानमाला, पुणे आकाशवाणी व्याख्यानमाला, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व्याख्यानमाला, वगैरे. कन्याकुमारी येथे विवेकानंद शिला स्मारक उभारण्यासाठी शीला स्मारक समितीच्या वतीने शिवाजीराव भोसले यांनी देशभर व्याख्यानमालांचे आयोजन केले होते..

स्मृती पुरस्कार

संपादन

पुण्याची प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती दर वर्षी १५ जुलै रोजी त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार प्रदान करते. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :-. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (इ.स. २०१२), शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (२०१३), साहित्यिक प्रा. द.मा. मिरासदार (२०१४), सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ (२०१५), डॉक्टर ह.वि. सरदेसाई (२०१६). फादर फ्रान्सिस दिब्रिटो (२०१७), माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (२०१८) , संतसाहित्याचे आणि लोकसाहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते डॉ. रामचंद्र देखणे (२०१९)..

साहित्य

संपादन
  • कथा वक्तृत्वाची
  • चिंतन
  • जागर (खंड १ आणि २)
  • जीवनवीध
  • दीपस्तंभ
  • देशोदेशींचे दार्शनिक
  • प्रेरणा
  • मुक्तिगाथा महामानवाची
  • यक्षप्रश्न
  • स्वामी विवेकानंद चरित्र
  • हितगोष्टी

संदर्भ

संपादन

बाह्यदुवे

संपादन