पालखेडची लढाई
दिनांक फेब्रुवारी २८, इ.स. १७२८
स्थान पालखेड, छत्रपती संभाजीनगर जिल्हा
परिणती मराठ्यांचा विजय
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्य हैदराबादचा निजाम
सेनापती
बाजीराव पहिला निझाम-उल-मुल्क


पालखेडची लढाई फेब्रुवारी २८, १७२८ रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहराजवळ असलेल्या पालखेड येथील लढाई होती.

पहिल्या बाजीरावांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्यहैदराबादचा निझाम यांच्यातील या लढाईत मराठ्यांचा जय झाला. या लढाईत दोन्ही सैन्यांची फारशी खराबी झाली नाही. बाजीरावांनी निझामाला खेळवत स्वतःला अनुकूल अशा ठिकाणी खेचून आणले व तेथे कोंडीत पकडून निझामाला हरवले. हे बाजीरावांच्या व्यूहरचनेचे व युद्धतंत्राचे उत्तम उदाहरण समजले जाते. पालखेडच्या लढाईला अनेक युद्धशास्त्र अभ्यासकांनी गनिमी काव्याचे अत्युत्तम उदाहरण मानलेले आहे.[][][]

पार्श्वभूमी

संपादन

इ.स. १७१३ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवाईची वस्त्रे दिल्यापासून दहा-बारा वर्षांत बाळाजींनी मोडकळीस आलेल्या मोगल साम्राज्याचे लचके तोडून मराठा साम्राज्यास जोडण्याचा उद्योग लावलेला होता. याचे पारिपत्य करण्यासाठी मोगल सम्राट मुहम्मद शाह याने ऑक्टोबर इ.स. १७२४मध्ये निझाम-उल-मुल्क यास दख्खनचा वजीर नेमले व त्यास दख्खनेत पाठवले. तोपर्यंत बाळाजींचा मुलगा बाजीराव पहिला पेशवेपदी आले होते.

याच सुमारास मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण होऊ घातली होती. साताऱ्यास छत्रपती शाहू तर कोल्हापूरास छत्रपती संभाजी यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे जाहीर केले होते. क्रूर आणि कपटी निझामाने याचा फायदा घेण्याचे ठरवले व कोल्हापूरच्या गादीस आपला पाठिंबा दिला. याउप्पर निझामाने दख्खनातील देशमुखांकरवी सरदेशमुखी व चौथ (महसूली उत्पन्नाचा चौथा भाग) मराठ्यांच्या हवाली करणे बंद करवले. या कारणांस्तव छत्रपती शाहू व बाजीराव पेशव्यांनी निझामास धडा शिकवण्याचे ठरविले.

१७२७ च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातील मोहीमेवर होते. निझाम-उल-मुल्कने महसूल देणे बंद करविल्यावर छत्रपती शाहूस निझामाला धडा शिकवण्याचा व त्यानिमित्ताने मराठा साम्राज्याचा पूर्वेस विस्तार करण्याचा सल्ला बाजीरावांनी दिला. छत्रपतींनी बाजीरावास सैन्यासह आपल्याकडे बोलावून घेतले. इकडे कोल्हापूरातील श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती संभाजीला निझामाशी वाटाघाटी करण्याचे सुचवले. पावसाळा संपतासंपता बाजीरावाने सैन्यास कुमक लावून घेतली व छत्रपती संभाजीनगर जिल्हाकडे कूच केले. जालन्याजवळ त्याने निझामाच्या सैन्यावर छापा घातला आणि शत्रू सावध होउन लढायला तयार होईपर्यंत मराठा सैन्याने उत्तरेस बुऱ्हाणपुराकडे वाट काढली.

निझामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावाचा पाठलाग सुरू केला. बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाला. बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येउन निझामाच्या सैन्याने त्याचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली. आपल्या राजधानीकडे शत्रू जात असल्याचे पाहून बाजीराव आपसूकच आपल्या जाळ्यात येईल असा निझामाचा डाव होता. निझामाने दक्षिणेकडे सरकत उदापूर, अवसरी, पाबळ, खेड, नारायणगाव जिंकले. त्यानंतर खुद्द पुण्यात घुसून तेथे तळ ठोकला आणि तेथून साताऱ्यावर चाल केली. आतातर त्याने सुपे, पाटस आणि बारामती पर्यंत धडक मारली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला.

असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव किंवा दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निझामाचा हा डाव पूर्ण होत आला होता. बाजीरावाने त्यास भीक न घालता निझामासच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निझामाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर वर चाल केली. निझामास ही खेळी अनपेक्षित होती. त्याला छत्रपती संभाजीनगर जिल्हा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते. त्याने आता कोल्हापूरच्या छत्रपतींना साताऱ्यावर चाल करण्यास सुचवले. काट्याने काटा काढण्याची ही निझामाची हिकमत नामी होती. छत्रपती संभाजीला आपली सत्ता प्रबळ करणे ही लालूच दाखवून कोल्हापूरला आपले धार्जिणे राज्य करून घेणे निझामाला अपेक्षित होत. परंतु येथेही त्याचा अंदाज चुकला. संभाजी व पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती शाहूंवर हल्ला करण्यास नकार दिला. आता बाजीरावाच्या कचाट्यातून छत्रपती संभाजीनगर तरी वाचवावे यासाठी निझाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला. बाजीरावाने छत्रपती संभाजीनगरचा रस्ता सोडून निझामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला. छत्रपती संभाजीनगर कडे निघालेल्या निझामाच्या सैन्यावर विद्युतवेगी हल्ले चढवत बाजीरावाने त्यास सळो कि पळो करून सोडले. छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसान होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावाने निझामास नाशिककडे ओढत नेले. असे करता फेब्रुवारी २५, इ.स. १७२८ रोजी पालखेड जवळील निपाणी प्रदेशात निझामाचे सैन्य आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये ठाण मांडून बाजीरावाने निझामाला कोंडीत धरले. शेवटी फेब्रुवारी २८ रोजी निझामाने मराठ्यांची फळी फोडत गोदावरीपर्यंत पोचण्याचा आपल्या सैन्यास हुकुम दिला. जेरीस आलेल्या निझामी सैन्याने लढण्यास साफ नकार दिला. निझामाने इवाझ खानामार्फत बाजीरावास शरणागतीचा संदेश पाठवला व फारशी खानाखराबी न होता मराठ्यांनी निझामाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला.

पर्यवसान

संपादन

सपशेल पराभव झालेल्या निझामाने मुंगी-पैठण या गावात मार्च ६, १७२८ रोजी तह स्वीकारला. त्यानुसार --

१. छत्रपती शाहू हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निझामाने व पर्यायाने मोगल सम्राटाने मान्य केले.

२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला.

३. मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या.

४. महसूलाची थकलेली रक्कम निझामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले.

निझाम व मोगल सैन्याशी झगडा करून त्यांना आपल्या अटी मान्य करायला लावल्याने थोरल्या बाजीरावांची कीर्ती भारतभर पसरली व येथून दख्खन/माळव्यात मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. थोरल्या बाजीरावांनी निझामाविरुद्ध वापरलेली रणनीती पुढे मराठ्यांनी अनेक लढायांत वापरली व भारतभर साम्राज्य पसरविण्यास सुरुवात केली.

संदर्भ

संपादन
  1. ^ अ कन्साइज हिस्टरी ऑफ वॉरफेर -- फील्ड मार्शल बर्नार्ड लॉ मॉंटगोमरी, विल्यम कॉलिन्स सन्स, १९६८, आय.एस.बी.एन. 1-84022-223-9, पृ. १३२
  2. ^ द लाइफ ऑफ ॲन आउटस्टॅंडिंग इंडियन कॅव्हेलरी कमांडर - १७२०-१७४० द पेशवा, कर्नल आर.डी. पालसोलकर, रिलायन्स प्रकाशन, १९९५, आय.एस.बी.एन.ISBN 81-85972-93-1, पृ. २४८
  3. ^ बाजीराव - द वॉरियर पेशवा, जयवंत ई. पॉल, रोली बूक्स प्रा. लि., आय.एस.बी.एन.81-7436-129-4, पृ. १८४