दुसरे बाजीराव पेशवे Archived 2020-06-17 at the Wayback Machine. कर्नाटक युद्ध (मराठी नामभेद: कर्नाटकातील दुसरा इंग्रज-फ्रेंच संघर्ष ; इंग्रजी: Second Carnatic War, सेकंड कर्नाटिक वॉर) हे कर्नाटक युद्धे मालिकेतील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात भारतातील कर्नाटक प्रांतात इ.स. १७४८ ते इ.स. १७५४ या कालावधीत झालेले युद्ध होते. या युद्धात इंग्रजांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंचांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांनी सहभाग घेतला.[]

पार्श्वभूमी

संपादन

इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या भारतीय कंपन्या ज्या भारतीय सत्तेला मदतीची गरज असेल तिला मदत करण्यासाठी तत्पर होत्या. भारतीय सत्ताधीशांना मदत करणे हा त्यांचा हेतू नव्हता तर त्यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्ध्यांच्या मर्मावर आघात करणे हाच या कंपन्यांचा हेतू होता. याचवेळी इंग्रज आणि फ्रेंचांना अर्काट आणि हैदराबादच्या गादीसाठी भावाभावात चालू असलेल्या भांडणात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. मे, इ.स. १७४८ मध्ये निजामाचा मृत्यू झाला व त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा नासिरजंग हा दुसरा निजाम म्हणून हैदराबादच्या गादीवर आला[] पण त्याच्या गादीवर येण्याला निजामाच्या मुलीचा मुलगा मुझफ्फरजंग याने विरोध केला. याचवेळी दुसरा वाद अर्काटच्या नवाबपदासाठी उद्भवला. त्यावेळी अन्वरूद्दीन हा अर्काटचा नवाब होता. त्याच्या वारसाहक्कास माजी नवाब दोस्त अलीचा जावई चंदासाहेब याने विरोध केला.

चंदासाहेब आणि मुझफ्फरजंग यांनी परस्परांशी करार करून एकमेकांना सहाय्य करण्याचे ठरविले. या दोघांनाही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जोसेफ डुप्ले यानेही मदत केली. या तिघांच्या सैन्याने मिळून ३ ऑगस्ट, इ.स. १७४९ रोजी झालेल्या अंबुरच्या युद्धात अर्काटचा नवाब अन्वरुद्दीन याचा पराभव करून त्याला ठार मारले. यानंतर मुजफ्फरजंगने स्वतःला हैदराबादचा निजाम घोषित करून चंदासाहेबाला स्वतःच्या अधिपत्याखाली अर्काटच्या नवाबपदी बसविले.

फ्रेंचांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना पॉण्डेचेरीच्या भोवतीची ऐंशी खेडी आणि मच्छलीपट्टणम हे बंदराचे शहर देण्यात आले. त्याचवेळी इंग्रजांनी एकाएकी निजामाच्या गादीचा दावेदार नासिरजंग आणि अर्काटच्या नवाबपदाचा दावेदार अन्वरूद्दीनच्या मुलाला पाठींबा जाहीर केला.

युद्धातील प्रमुख घटना

संपादन

ऑक्टोबर, इ.स. १७४९ मध्ये त्रिचनापल्ली येथे अडकलेल्या महंमद अलीला मदत करण्यासाठी ब्रिटिश फौजेची एक तुकडी मद्रासहून निघाली. या फौजेने मद्रासजवळील सेंट थॉमस किल्ल्याचा ताबा घेतला. नासिरजंगही आपली फौज घेऊन आला. मेजर लॉरेन्सच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजही नासिरजंगाला येऊन मिळाली. तिथे मुझफ्फरजंगशी झालेल्या युद्धात नासिरजंगचा विजय झाला. मुझफ्फरजंगला कैद करण्यात आले. पुढे १६ डिसेंबर, इ.स. १७५० रोजी नासिरजंगचा एका अफगाण सरदाराने खून केला. मुझफ्फरजंगला कैदेतून मुक्त करण्यात आले आणि फ्रेंचांच्या संरक्षणाखाली तिसरा निजाम म्हणून हैदराबादच्या गादीवर बसविण्यात आले. दुप्लेने केलेल्या मदतीबद्दल मुझफ्फरजंगने कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंतच्या किनारपट्टीवरील प्रदेशाची सुभेदारी (गव्हर्नरचे पद), दोन लाख रुपये व वार्षिक दहा हजार रुपये उत्पन्न देणारी जहागिर दुप्लेला भेट म्हणून दिली.

मुझफ्फरजंगला नंतर एका फ्रेंच सैनिकांच्या तुकडीसोबत हैदराबादला नेण्यात आले. या फ्रेंच तुकडीचे नेतृत्व फ्रेंच अधिकारी बुसीकडे देण्यात आले होते. बुसीने या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी वैयक्तिकरीत्या चार लाख रुपये व त्याच्या तुकडीतील प्रत्येक सैनिकासाठी तीन महिन्याचे आगाऊ वेतन मुझफ्फरजंगकडून घेतले होते. जानेवारी, इ.स. १७५१ मध्ये एका कडाक्याच्या भांडणात मुझफ्फरजंगचा एका विश्वासघातकी अफगाणाकडून मृत्यू ओढावला. जनरल बुसीने ताबडतोब निजामाचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा सलाबतजंगची हैदराबादच्या गादीवर चौथा निजाम म्हणून नेमणूक केली. पुढेही चौथा निजाम बनलेला सलाबतजंग स्वतःच्या आस्तित्वासाठी फ्रेंचांच्याच मदतीवर अवलंबून राहिला. बुसीच्या फौजेला नियमित पगार मिळावा म्हणून सलाबतजंगने त्याच्या राज्याच्या उत्तरेकडील चिकाकोल, एल्लोर, राजमुंद्री आणि गंटूर हे चार जिल्हे फ्रेंचांना दिले. हे चार जिल्हे व त्यालगतची जमीन फ्रेंचांना मिळाल्याने किनारपट्टी तसेच गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशावर फ्रेंचांचा संपूर्ण ताबा प्रस्थापित झाला.

२८ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सॅण्डर्सने मद्रास येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली. त्याने चंदासाहेबाच्या अर्काटच्या नवाबपदाला हरकत घेतली व महंमदअलीला अर्काटचा कायदेशीर नवाब म्हणून घोषित केले. त्याने डुप्लेला देण्यात आलेल्या पदव्या व मुझफ्फरजंगकडून फ्रेंच कंपनीला जो प्रदेश मिळाला होता त्यालाही मान्यता देण्यास नकार दिला.

महंमदअली त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात अडकला होता. या किल्ल्याला चंदासाहेबाने फ्रेंच सैनिकांची मदत घेऊन वेढा दिला. चंदासाहेबाचे ध्यान विचलित करण्यासाठी आणि महंमदअलीला मदत करण्यासाठी रॉबर्ट क्लाईव्हने ३१ ऑगस्ट, इ.स. १७५१ रोजी अर्काटचा किल्ला जिंकला.[] यामुळे चंदासाहेब अस्वस्थ झाला व त्याने त्याची अर्धी सेना त्याचा मुलगा रझासाहेबाच्या नेतृत्वाखाली अर्काटकडे पाठविली. रझासाहेबाने सुसज्ज सेनेसह अर्काटच्या किल्ल्याला वेढा दिला. क्लाईव्हने अनेक दिवस शर्थीने किल्ला लढविला पण त्याला नवीन सैन्याची कुमक येऊन मिळाल्यानंतर भयग्रस्त झालेल्या रझासाहेबाने किल्ल्याचा वेढा उठविला. त्यानंतर समोरासमोर झालेल्या युद्धात चंदासाहेब पराभूत झाला आणि मारला गेला; त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्या संरक्षणाखाली महंमदअलीची अर्काटचा नवाब म्हणून घोषणा केली.

परिणाम

संपादन

इंग्रजांनी महंमदअलीची अर्काटच्या नवाबपदी घोषणा करून फ्रेंचांनी हैदराबाद येथे केलेल्या कृतीचा बदला घेतला. परिणामी डुप्लेचे कर्नाटकात फ्रेंच साम्राज्य उभारण्याचे स्वप्न भंग पावले. दरम्यान या काळात इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशात युरोपात शांतता नांदत होती. त्यामुळे भारतातील त्यांच्या कंपन्यात चालू असलेल्या झगड्यांना त्यांच्या सरकारांकडून पाठींबा मिळाला नाही. भारतातील शांतता भंग करतो म्हणून डुप्लेला भारतातून माघारी बोलविण्यात यावे अशी ब्रिटिश सरकारने फ्रेंच सरकारला विनंती केली. फ्रेंच सरकारही डुप्लेच्या कारवायांनी त्रस्त झाले होते. परिणामी, त्याच्या जागी गोडेहू याची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पॉण्डेचेरी येथील गव्हर्नर म्हणून २ ऑगस्ट, इ.स. १७५४ रोजी नेमणूक झाली.

पॉंडिचेरीचा तह

संपादन

आपापल्या सरकारच्या आदेशावरून गोडेहू आणि सॅंडर्स या भारतातील अनुक्रमे फ्रेंच आणि इंग्लिश व्यापारी कंपन्यांच्या गव्हर्नर्सनी आपापसात शांतता करार केला. हा करार पॉंडिचेरीचा तह म्हणून ओळखला जातो. इ.स. १७५५ साली हा तह करण्यात आला. या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या दोन्ही कंपन्यांनी भारतीय सत्ताधीशांच्या अंतर्गत भांडणात हस्तक्ष्पेप न करण्याचे ठरविले. तसेच त्यांनी परस्परांचे जिंकलेले सर्व प्रदेश परत करण्याचे आश्वासन दिले. परस्परांच्या वखारी व व्यापारी केंद्रांना उपद्रव न पोहोचविण्याचेही या तहाने ठरविण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "British Trading Company and Indian Allies — versus — French Trading Company and Indian Allies" (इंग्रजी भाषेत). 2013-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Second Carnatic War, 1749-54" (इंग्रजी भाषेत). ६ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "second-carnatic-war" (इंग्रजी भाषेत). ६ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हे सुद्धा पहा

संपादन