भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीत रुपांतर झाले.[१]. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदीक काळ सूरू झाला[२]. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदीक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदीक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदीक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदीक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली.परंतु भारतीय संस्कृती म्हणून त्यापूर्वीच्या शेकडो वर्षाचे संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे . इतिहास संशोधन आणि लेखन याचे शास्त्र यावर अधिक संशोधन झाल्यास मागील ९००० हजार वर्षाचा सांस्कृतिक इतिहास मांडणे शक्य होईल मध्य वैदीक काळात सिंधू काठची वैदीक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.


अजिंठा-वेरूळची लेणी येथील भित्तीचित्रे:इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचासम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[३] भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदीक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. साहित्य, गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."[४][५] भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील चोल साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन, या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. अजिंठा-वेरूळची लेणी, वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशापर्यंत पोहोचला होता.