अवाबाई वाडिया
डॉ. अवाबाई वाडिया (१८ सप्टेंबर, १९१३:कोलंबो, श्रीलंका - ११ जुलै, २००५) या भारतीय समाजसेविका होत्या.
डॉ. अवाबाई वाडिया | |
---|---|
जन्म |
१८ सप्टेंबर, १९१३ कोलंबो, श्रीलंका |
मृत्यू |
११ जुलै, २००५ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | समाजसेविका |
पदवी हुद्दा | डॉक्टरेट |
धर्म | हिंदू |
जोडीदार | डॉ.बोमजी वाडिया |
पुरस्कार | पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार |
जीवन
संपादनअवाबाई यांचा जन्म एका पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील बोटीच्या एका व्यापारी मंडळात (कंपनीत) होते, त्यामुळे त्यांना समुद्राविषयी प्रथमपासूनच ओढ होती. त्यांची आई कणखर वृत्तीची आणि शिकण्याची दृढ इच्छा असलेली स्त्री होती. त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटीची कोलंबोतील शाखा सुरू करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. अवाबाईंमध्ये आईकडून दृढ इच्छा आणि अथक परिश्रम हे गुण आले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी श्रीलंकेत वकिलीची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. फारशी वकिली न करता, त्यांनी आईच्या ओळखीने लंडनमध्ये, ब्रिटिश महिला संघटनेत कामाला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारबरोबर होणाऱ्या लंडनमधील वाटाघाटीत गांधी, जीना आणि नेहरू यांच्यासह त्यांनी पण भाग घेतला होता.[१] १९४१ साली त्या मुंबईत कायमच्या स्थायिक झाल्या. १९४६ साली त्यांचा विवाह डॉ.बोमजी वाडिया यांच्याशी झाला, ते हावर्ड मधील पहिले भारतीय पदवीधर होते.
सन्मान व पुरस्कार
संपादनअवाबाईंच्या ‘ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स’मधील कामामुळे कुटुंबनियोजनाविषयी खटले चालवणाऱ्या वकिलांच्या समूहाशी संबंध आला आणि त्यांच्या प्रजनन आरोग्य आणि हक्क यांविषयांच्या कळकळीमुळे १९४९ साली फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफ.पी.ए.आय.) स्थापन करण्यात त्यांचा मुख्य सहभाग होता. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंचवार्षिक योजनेत कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात डॉ.अवाबाईंचे अथक परिश्रम कारणीभूत होते. ‘एफ.पी.ए.आय.’ या बिगरसरकारी किंवा स्वायत्त संघटनेला ‘यु.एन. पॉप्युलेशन’चा पुरस्कार १९८५ साली तर तिसऱ्या जगातील पुरस्कार १९८७ साली मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल प्लॅन्ड पेरेंटहूड फेडरेशनचे (आय.पी.पी.एफ.) कार्य बहरले. त्यांना १९७१ साली पद्मश्री[२] आणि १९८१ साली पद्मभूषण हे किताब सरकारने त्यांच्या कुटुंबनियोजनातील कार्याबद्दल दिले. तसेच, ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज’ ने त्यांना ‘डॉक्टरेट’ ही पदवी बहाल केली.
सामाजिक कार्य
संपादनअवाबाईं उत्कृष्ट वक्त्या आणि उत्तम लेखिका होत्या. ‘द लाइट इज अवर्स’ हे त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरची सामाजिक क्रांती सांगणारे पुस्तक आहे. १९९४ साली कैरोत झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या परिषदेत त्यांनी सांगितले की, ‘‘वसुधैव कुटुंबकम्-जग हे एक कुटुंब आहे, मानवजात एक आहे. सर्व माणसांनी जात, धर्म, पंथ, वंश, तसेच लिंग विसरून एकत्र काम करणे जरुरीचे आहे.’’ त्यांनी आपले सर्व जीवन सामाजिक कार्यासाठी वाहिले. त्यांचा मृत्यू ११ जुलै २००५ रोजी जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी झाला.
संदर्भ
संपादन- ^ Pathak, Narendra (2018-10-25). Sansad Mein Vikas Ki Baaten (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5266-731-4.
- ^ "पद्म श्री पुरस्कार (१९७०-७९) - Wikiwand". www.wikiwand.com. 2020-03-27 रोजी पाहिले.