महादेव कोळ्यांचे साम्राज्य (जयहर) जव्हार किंवा जव्हार तालुका याच्याशी गल्लत करू नका. जव्हार संस्थान इसवी सन १३१६पासून १० जून १९४८पर्यंत अस्तित्वात होते. मुकणे गावातील जयबा हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबा जमीनदार होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी 31 लहान किल्ले जिंकले वर भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकला. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. अश्या वेळी इ.स. १३१६मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबा आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले. इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा.

काळमांडवी धबधबा.
जय विलास पॅलेस, जव्हार
हनुमान पॉइंटपासून दिसणारा जय विलास पॅलेस

छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया, १ डिसेंबर १६६१ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला `शिरपामाळ असे नाव पडले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. सुरतेच्या स्वारीदरम्यान शिवाजीराजे वाडा तालुक्यातील कोहज गडावर मुक्कामी होते. विक्रमशहाराजे यांच्या पश्चात जव्हार संस्थानच्या गादीवर बसायचे कोणी, या कारणावरून वारसदारांमध्ये वादंग निर्माण झाले होते. या वादात इंग्रजांनी हस्तक्षेप करून राणी सगुणाबाईंच्या अज्ञान पतंगशहा नावाच्या अज्ञान मुलाला गादीवर बसविले. मुलाच्या अधिपत्याखाली राणी सगुणाबाई याच राज्यकारभार चालवत असत. पुढे धुळबा राजाचा नातू देवबा यांच्या राजघराण्यातील गादीच्या वादामुळे जुना राजवाडा १८२०साली आगीत जळाला. यात राजवाड्यातील ऐतिहासिक कागदपत्रे जळून खाक झाली. हा राजवाडा कृष्णराजाने बांधला होता. जुन्या राजवाड्याचा परिसर २१ हजार चौरस मीटर होता.

जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. ते आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून २१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.

जव्हार हे शहर महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. ठाणे शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ समजतात. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.


जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात


मुकणे राजांचा जो नवीन राजवाडा आहे तो एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. जव्हारच्या एसटी स्टँडपासून रिक्षा केल्यास ती आपल्याला राजवाड्यापर्यंत घेऊन जाते. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबर, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.

जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिल स्टेशन आहे. हे नाशिकपासून ८० कि.मी.वर आणि मुंबईपासून १५० कि.मी.वर आहे. हे एक सुंदर व समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे. जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे. जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण असल्याने मुंबई, ठाणे यासारख्या प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणच्या लोकांना हे ठिकाण विशेष आवडते.

जव्हारमध्ये काळमांडवी धबधबा, दाभोसा धबधबा खूप सुंदर आहे.जव्हारचा जय विलास पॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाॅईॅंट,हनुमान पाॅईॅंट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.

पर्यटनसंपादन करा

  • शिरपामाळ
  • हनुमान पॉईंट
  • सनसेट पॉईंट
  • जय विलास पॅलेस
  • दाभोसा धबधबा
  • काळ मांडवी धबधबे
  • भूपतगड किल्ला

त्यापूर्वी १ सप्टेंबर १९१८ला राजे मार्तण्ड यांनी लोककल्याणकारी पाऊल उचलत जव्हार नगरपरिषद स्थापन केली, अशी माहिती जव्हार संस्थानच्या माहिती पुस्तकेतून मिळते. आजघडीला जुना राजवाडा भग्नावस्थेत आहे. राजवाड्याची इमारत दुमजली. जुन्या राजवाड्याच्या आतील परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. जव्हार शहराच्या परिसरात निसर्गरम्य देखावे, वारली चित्रकला आदी गोष्टी पाहावयास मिळतात. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळकरी मुले- मुली तसेच पर्यटक आणि गिर्यारोहक येथे निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.

  • हनुमान पॉइंट-

शहरापासून सुमारे १ ते २ कि.मी. अंतरावर शहराच्या पूर्व बाजूला एक ५०० फूट खोल व्हॅली आहे. त्या व्हॅलीत एक मंदिर आहे. त्या मंदिराला कट्टा मारुती मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते , निवडुंगांच्या गडद वनाने वेढलेले असे ते जुने मंदिर आहे. मंदिराचे नूतनीकरण झाले आहे आणि आता तो हनुमान पॉइंट म्हणून ओळखला जातो. रात्रीच्या वेळी या पॉइंटपासून कसारा घाटातून जाणाऱ्या गाड्यांचे दिवे दिसतात. धुके नसेल तर, दिवसा शहापूरचा ऐतिहासिक किल्ला दिसू शकतो.

सिल्व्हासा रोडवरील दाभोसा धबधबा जव्हारपासून १८ कि.मी.वर आहे. हा धबधबा लेॅंडी नदीवर आहे आणि सारसून येथे नदीच्या दुसऱ्या बाजूला दादरकोपरा धबधबा आहे.

  • भूपतगड

भूपतगड हा जव्हार तालुक्यातील झाप या गावाजवळ असणारा एक किल्ला आहे. सुंदर अशी तटबंदी या किल्ल्यात आहे तसेच तेथे गरम पाण्याचे छोटे छोटे कुंड आहेत. सुंदर असे ऐतिहासिक ठिकाण आहे.

जव्हार संस्थानचे राष्ट्रगीतसंपादन करा

जव्हार संस्थानच्या राष्ट्रगीताला दिनांक १३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाली. हे राष्ट्रगीत, बडोद्याचे राजकवी कवी यशवंत यांनी रचले. त्याचे पहिले गायन जव्हार नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज हे दुसऱ्या महायुद्धावरून परत आल्यानंतर त्यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त झाले. जव्हार संस्थानची भौगोलिकता, वनवैभव, राजगुरू कृपाशीर्वाद, राजांची शौर्यगाथा, मायभूमीवरील प्रेम, जनकल्याणकरी राजा अश्या रीतीने जव्हार संस्थानाचा गौरव करणारे हे राष्ट्रगीत आहे. ते दि.१३ नोव्हेंबर १९४४ रोजी राजमान्यता मिळाल्यापासून ते जव्हार संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणापर्यंत, प्रत्येक समारंभात गायले जात असे.

जय मल्हार ! जय मल्हार !
गर्जू या जय मल्हार !!
सह्याद्रीचे हे पठार I
शौर्याचे हे शिवार I
राखाया या बडिवार I
येथे नवोनव अवतार II१II

येथले धनुष्यबाण I
अजून टणत्कार करून I
टाकतात परतून I
कळी काळाचेही वर II२II

साग, शिसव, ऐन दाट I
सोन्याचे बन अफाट I
त्यांत शाह नांदतात I
दीनांचे पालनहारII३II

सदानंद -वरद- हात I
जयबांची शौर्य- ज्योत I
ध्वज भगवा सूर्यांकित I
दावी राज्य हे जव्हारII ४ II

प्यार अशी माय भूमी I
माय भूमी तव कामी I
वाहू सर्वस्व आम्ही I
होऊ जीवावर उदार II ५ II

जय वंशी क्षेम असो I
राजा विर्यो क्षेम असो I
जनता- कल्याण वसो I
त्यात सदा अपरंपार II ६ IIकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
 
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.