गजानन पेंढरकर
गजानन केशव पेंढरकर (१२ सप्टेंबर, इ.स. १९३४ - ८ ऑक्टोबर, इ.स. २०१५) हे एक मराठी उद्योजक होते. हे विको (विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी) या कंपनीचे मालक होते. त्यांनी आपले आयुर्वेदाच्या ज्ञानाचा उपयोग करून आपले वडिल, केशव विष्णू पेंढरकर यांनी स्थापन केलेल्या या कंपनीची अनेक नवीन उत्पादने लोकप्रिय केली. अहमदाबादमध्ये फार्मसीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, १९५७ मध्ये पेंढरकर वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले.
त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मीळ जडीबुटी, वनस्पती आणि इतर औषधे वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक दंतमंजन व टूथपेस्ट तयार केली. मुंबईत परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत विकोची उत्पादने तयार होत असत. नंतर त्यानी डोंबिवलीत ८० हजार चौरस फूट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारला. विकोची नागपूर आणि गोव्यातही कारखाने आहेत. विकोच्या उत्पादनांना देश-विदेशातून मागणी आहे. आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील ४० देशांत विकोची उत्पादने विकली जातात. १९८० साली 'विको'ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती, २०१५ साली ती एक हजार कोटीच्या आसपास आहे.
प्रतिस्पर्धी कंपन्यांनी विकोची उत्पादने सौंदर्यप्रसाधनेच आहेत, तेव्हा त्यांच्यावरही कर हवा, असा दबाव सरकारवर आणला. त्यामुळे त्या उत्पादनांवर कर लादला गेला. विकोने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन ही आयुर्वेदिक उत्पादने आहेत, मान्य करून घेतले.
पेंढरकरांनी दिलेल्या देणगीतून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळीने डोंबिबलीत के.व्ही. पेंढरकर आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज काढले आहे. पेंढरकरांनी नागपुरात सारथी नावाची संस्था काढून अनेक मराठी तरुणांना उद्योगात मदत केली.
दूरचित्रवाणीच्या सुरुवातीच्या काळात मराठी मालिकांना काळात पेंढरकरांनी अनेक अशा मालिका प्रायोजित केल्या. पेंढरकर यांनी अनेक संस्थांना मदत केली. इंदूरची कर्करोग संशोधन संस्था त्यापैकी एक आहे.
विको कंपनीची उत्पादने
संपादन- विको वज्रदंती टूथ पावडर आणि टूथपेस्ट
- विको टर्मरिक (स्किन) क्रीम
- विको हर्बल शेव्हिंग क्रीम
- विको नारायणी तेल
आत्मचरित्र
संपादनगजानन पेंढरकरांनी कर्म चाले संगती नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
गजानन पेंढरकर यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- निर्वाण संस्थेचा मराठी उद्योजक जीवनगौरव पुरस्कार (मे, २०१५)