कृष्णा बोरकर (इ.स. १९३३ - ) हे एक मराठी नाट्यसृष्टीतले निवृत्त रंगभूषाकार आहेत. वयाच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांनी हे काम करायला सुरुवात केली.[]

बोरकर यांचे मूळ गाव गोव्यातले बोरी असून, पोर्तुगीजांच्या राजवटीत ज्या काही कुटुंबांनी गोवा सोडले त्यांत कृष्णा बोरकरांचे कुटुंब होते. ते रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिंचखरी गावी आले व वडिलांचे निधन झाल्याने आई त्यांना व त्यांच्या बहिणीला घेऊन इ.स. १९३८च्या सुमारास मुंबईत आली. काही दिवसांसाठी कृष्णा बोरकर यांना त्यांचे ज्योतिषी असलेले चुलतकाका यांचेकडे रहावे लागले. नंतर मात्र, ते आईसह मुंबईत सिद्धिविनायक मंदिराजवळच्या कलकत्तावाला चाळीत राहू लागले.

नाटकाचे पडदे रंगवण्याचे काम करणारे पांडुरंग हुले कलकत्तावाला चाळीच्या जवळच रहात असत. त्यांचे काम बोरकर न्याहाळीत असत. एकदा पांडुरंग हुले यांनी कृष्णा बोरकरांना दामोदर हॉलमधे एका नाटकाला नेले. त्या नाटकासाठी हुले सांगतील ते काम कृष्णाने केले आणि त्याबद्दल त्यांना आठ आणे मिळाले. हुलेंबरोबर असेच काम करीत असताना कृष्णा बोरकर यांना पात्रांच्या रंगभूषांमध्ये रस निर्माण झाला. आणि त्यांनी कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या 'सूडाची प्रतिज्ञा’' या नाटकासाठी पहिल्यांदा स्वतंत्रपणे रंगभूषा केली. त्यावेळी त्यांचे वय फक्त ११ होते. त्या अनुभवावर कृष्णा बोरकर यांना केव्हाकेव्हा रंगभूषाकाराची कामे मिळू लागली.

पुढे काही वर्षे कृष्णा बोरकर हे भुलेश्वर येथील विविध प्रकारचे ड्रेस भाड्याने देणाऱ्या एका दुकानदाराकडे काम करत होते. या प्रकारचे दुकान चालवणारे ते एकमेव मराठी दुकानदार होते. तेथे त्यांना महाराष्ट्र नाटक कंपनीचे रंगभूषाकार कमलाकर टिपणीस भेटले. त्यांच्या शिफारशीमुळे कृष्णा बोरकर यांना चित्रपटातील नटांना रंगवण्याचे काम मिळाले. राजकमल चित्रपटसंस्थेचे रंगभूषाकार बाबा वर्दम एकदा कामावर आलेले नसताना कृष्णा बोरकर यांना अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा करायला मिळाली आणि ती पाहून व्ही. शांताराम यांनी स्वतःची रंगभूषाही त्यांच्याकडून करून घेतली.

बोरकर यांची रंगभूषा असलेली नाटके आणि चित्रपट

संपादन
  • गगनभेदी
  • गरुडझेप
  • गारंबीचा बापू
  • गुडबाय डॉक्टर
  • दीपस्तंभ
  • दो ऑंखे बारा हाथ (चित्रपट)
  • नवरंग (चित्रपट)
  • पृथ्वी गोल आहे
  • मौसी (चित्रपट)
  • रमले मी
  • रणांगण : या नाटकातील १७ कलावंतांना ६५ प्रकारच्या रंगभूषा कराव्या लागल्या.
  • शिवसंभव
  • सूडाची प्रतिज्ञा
  • स्वामी
  • हे बंध रेशमाचे

बोरकर यांनी रंगभूषाकार म्हणून काम केलेल्या नाट्यसंस्था आणि चित्रसंस्था

संपादन
  • चंद्रलेखा
  • नाट्यसंपदा
  • रंगशारदा
  • श्री रंगशारदा
  • राजकमल चित्रसंस्था

कृष्णा बोरकर यांनी रंगभूषा केलेले प्रसिद्ध कलावंत

संपादन

पुरस्कार

संपादन
  • १९९२ च्या २४व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेवेळी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक
  • गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार
  • भारताचे राष्ट्रपती प्रणव मुकर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
  • यांशिवाय अनेक अन्य संस्थांनी केलेले सन्मान आणि दिलेले पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ जोशी, शेखर. "चेहर्‍याचा किमयागार". लोकसत्ता. २५ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.