कबरा गप्पीदास

जल्पकाद्य कूळातील पक्ष्यांची प्रजाती

कबरा गप्पीदास किंवा कवड्या वटवट्या(शास्त्रीय नाव: Saxicola caprata, सॅक्सिकोला कॅप्राटा ; इंग्लिश: Pied Bushchat, पाइड बुशचॅट ;) ही पश्चिममध्य आशियापासून दक्षिणआग्नेय आशियापर्यंतच्या भूभागात आढळणारी जल्पकाद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे पक्षी साधारणपणे १३ सें. मी. आकारमानाचे, चिमणीपेक्षा लहान असतात. यांतील नर आणि मादी वेगवेगळ्या रंगाचे असतात. नराच्या पाठीचा रंग काळा, पोटाचा भाग पांढरा आणि पंखावर पांढरा पट्टा असतो, तर मादी तपकिरी-तांबुस रंगाची असते.

Pied bush chat,Saketarri, near Sukhna Lake Chandigarh, India)


कबरा गप्पीदास
शास्त्रीय नाव सॅक्सिकोला कॅप्राटा [टीप १]
कुळ जल्पकाद्य [टीप २]
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश पाइड बुशचॅट [टीप ३]
संस्कृत कृष्णपीत स्थूलचंचू
हिंदी काला पिद्दा

कबऱ्या गप्पीदासाच्या शास्त्रीय नावातील सॅक्सिकोला या शब्दाचा अर्थ खडकाळ प्रदेशांत राहणारा असा होतो, तर कबरा हा शब्द काळा आणि पांढरा हे दोन रंग असलेल्या रूपासाठी योजला जातो.

आढळ संपादन

कबरा गप्पीदास हा निवासी आणि हिवाळी स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो २५०० मी. उंचीपर्यंतच्या डोंगराळ भागापासून मैदानी भागात भारतभर सर्वत्र आढळतो. तसेच बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान या देशांतही आढळतो. रंग आणि चोचीच्या प्रकारावरून याच्या किमान चार उपजाती आहेत.

शेतीचा प्रदेश, पाण्याजवळील झुडपी जंगले, गवताळ प्रदेश, डोंगराळ प्रदेश येथे राहणे यांना पसंत असते.

प्रजनन काळ संपादन

फेब्रुवारी ते मे हा काळ कबऱ्या गप्पीदासांच्या विणीचा हंगाम असून याचे घरटे गवत, कापूस, केस इ. साहित्य वापरून तयार केलेले असते. असे घरटे जमिनीत किंवा खडकाच्या छिद्रात लपलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ निळसर त्यावर लाल-तपकिरी ठिपके असलेली पांढऱ्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्याचे काम एकटी मादी करते, तर घरटे बांधणे, पिलांना खाऊ घालणे ही कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन संपादन

तळटिपा संपादन

  1. ^ सॅक्सिकोला कॅप्राटा (रोमन: Saxicola caprata)
  2. ^ जल्पकाद्य (इंग्लिश: Muscicapidae, म्युसिकापिडे)
  3. ^ कबरा गप्पीदास (इंग्लिश: Pied Bushchat, पाइड बुशचॅट)

बाह्य दुवे संपादन

  • "कबऱ्या गप्पीदासांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)