अंबागड किल्ला

(आंबागड किल्ला (भंडारा) या पानावरून पुनर्निर्देशित)

आंबागड किल्ला (अंबागड किल्ला) हा महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात असणारा हा किल्ला आहे. हा सातपुडा पर्वतश्रेणीत एका डोंगरावर आहे. हा तुमसरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेस आहे. तुमसर सिवनी रस्त्यावरील गायमुख फाट्याने गेल्यास येथे पोचता येते. नागपूर पासून १०० किलोमीटर अंतरावर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आंबागड नावाचा सुंदर पण अल्पपरिचित किल्ला आहे.[१] किल्ल्याचे बांधकाम त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने मजबूतीकरण केल्यामुळे किल्ला उत्तम अवस्थेत आजही उभा आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झालेले आहे. या किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा रखरखाव करण्यात येत नाही व हे ठिकाण दुर्लक्षित आहे.[२] गडावर अंबागडीया देव या गोंड, कोष्टी व इतर समाजाचे स्थान असून दरवर्षी येथे यात्रा भरत असते.

आंबागड किल्ला (भंडारा)

आंबागड किल्ला (भंडारा)
नाव आंबागड किल्ला (भंडारा)
उंची अंदाजे १,५०० फूट (४६० मी) उंच डोगरावर
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण भंडारा जिल्ह्याच्या तुमसर, महाराष्ट्र
जवळचे गाव आंबागड
डोंगररांग सातपुडा
सध्याची अवस्था दुर्व्यवस्था
स्थापना १७००

इतिहास संपादन

आंबागड जिल्ह्याची निर्मितीच मूळात राज्य घाटरस्ता यासाठी झाली. सातपुडा पर्वतरांगामुळे जिल्ह्याचे संरक्षण नैसर्गिकरीत्या झाले. विदर्भातील गोंडवनाच्या संरक्षणासाठी असलेला आंबागड किल्ला त्यापैकी एक आहे. मध्यप्रदेशातील गढांडला, खेरला, देवगड, चांदा ही गांडांची चार राज्य होती. गोंड राजघराण्यातील महिपत शहा देवगडच्या गादीवर बसला. भाऊबंदकीत त्याला हद्दपार व्हावे लागले. त्यामुळे मदतीकरिता तो औरंगजेबाकडे गेला. औरंगजेब बादशहाने त्यास मुस्लिम धर्म स्वीकारण्यात सांगितले. त्याने बादशहापुढे आपली अट ठेवली. रोटी व्यवहार होईल, परंतु बेटी व्यवहार होणार नाही. महिपत शहा नाव असलेल्या या राजास औरंगजेबाने बख्त बुलंद असे नाव दिले. पुढे त्यांनी बैतुल, सिवनी, छिंदवाडा, बालाघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया असा राज्यविस्तार केला. अत्यंत सुरक्षित आंबागड किल्ला अत्यंत सुरक्षित व तेवढाच अवघड स्थळी असलेल्या जंगलव्याप्त परिसरात बख्त बुलंदने सिवनीचे दिवाण राजखाण पठाण यास आंबागड किल्ला बांधण्याचा आदेश दिला. इ.स. १७०० मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला. इ.स. १७०२ मध्ये बख्त बुलंदने आपली राजधानी देवगडहून नागपूर येथे हलवली. बख्त बुलंदनंतर त्याचा मुलगा चाँद सुलतान १७०६ मध्ये देवगडच्या गादीवर बसला. त्याची राणी रेतनकुंबर अनेक वर्षे आंबागडावर वास्तव्यास होती. राणीने इ.स. १७३९ मध्ये रघुजी भोसले यांना हा किल्ला देवगडला दिला.चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; निनावी संदर्भांमध्ये माहिती असणे गरजेचे आहे

तळघराचा वापर तुरुंगासारखा

गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या कारकीर्दीत त्यांचा शिवनी येथील राजखान नामक पठाण सुभेदाराने हा किल्ला इ.स. १७०० च्या सुमारास राजे बख्त बुलंद यांच्या आदेशाने उभारला. गोंडानंतर हा किल्ला भोसल्यांकडे आला त्यावेळी या किल्ल्याचा उपयोग तुरुंगा प्रमाणे करण्यात येत होता. आणि हया किल्ल्यात कैदी डांबल्यानंतर येथील विहीरीचं घाणेरडे साचलेले पाणी कैद्यांना प्यावे लागे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडून ते मृत होत असत, अशी या किल्ल्या विषयी आख्यायीका आहे. किल्ल्याला भुयारी मार्ग आहे, असे सांगण्यात येते.

स्थापत्य शैली संपादन

 
आंबागड किल्ला माहिती फलक
 
आंबागड किल्ला परकोट

या स्थानाचे सामरिक महत्त्व जाणून, बख्त बुलंद शहा याने येथे अंदाजे १,५०० फूट (४६० मी) उंच डोगरावर हा किल्ला बांधला. मुख्य प्रवेशद्वार अतिशय व देखणे आहे. परकोट, नगारखाना, शत्रुवर मारा करणाऱ्या मोठ्या तोफा ठेवण्याचे १० बुरुज, मिनार, सोपानमार्ग, बावडी विहीर, दिवाणखाना, निवासी महल, तळघर असे पुरातन वैभवाची साक्ष आजही हा किल्ला देत आहे. आंबागड किल्ला हा विदर्भातील उत्तम गिरिदुर्ग असुन उत्तर मध्ययुगीन काळातील स्थापत्याचे उत्तम उदाहरण आहे. या किल्ल्याचा विस्तार सुमारे १० एकर परिसरात आहे. आंबागड किल्ला हा किल्ले स्थापत्य प्रकारापैकी हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारातील आहे. या किल्ल्यास एकच मुख्य प्रवेशद्वार असुन त्यास महादरवाजा म्हणुन ओळखला जातो. दरवाजा त्रिकोणीय कमानयुक्त असून पुष्प नक्षी आणि पिंपळ पानांच्या नक्षीने अलंकृत आहे. कमानीच्या वरच्या बाजूस दोन कमळ कोरली आहेत. मुख्य दरवाच्या मधे सुरक्षेच्या दृष्टकोनातुन रक्षकांच्या खोल्या निर्मित केल्या आहेत. अंबागड किल्ला दोन स्वतंत्र भागात बांधला असून किल्ला व बालेकिल्ला असे त्याचे दोन भाग आहेत. बालेकिल्ल्यात राजघराण्यशी संबंधित व्यक्तीचे निवास करण्याची जागा आणि मसलत खाना, दारूगोळा, धान्य कोठार इत्यादी वस्तु आहेत. तसेच स्वतंत्र पाण्याची व्यावस्था केली आहे. बालेकिल्ला वगळुन इतर परिसरात अधिकाऱ्यांची निवासस्थाने, विहीरी आणि बांधीव तळी आहेत. या शिवाय हत्तीखाना म्हणुन एक प्रसिद्ध स्थळ आहे. किल्ल्याच्या तटबंदीस एकूण ९ बुरूज असुन बालकिल्ल्याचा तटबंदीत २ बुरुज आहेत, त्यापैकी किल्ल्याच्या तटभिंतीस चार टेहाळणी बुरुज असुन बुरुजावर तोफ ठेवली जात असे. विस्तृत तटबंदी, स्थापत्य शस्त्राचा अद्भूत नमुना, नैसर्गिक हिरवे सौंदर्य, सातपुड्यांचा पर्वत रांगा येथे पर्यटकांना सदैव खुणावते. पूर्वजांच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्यात यासाठी येथे भेटी देतात.

संवर्धन कार्य संपादन

महाराष्ट्र शासनाच्या गड किल्ले संवर्धन समिती आणि पुरातत्व वस्तु संग्रहालय संचालनालय याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील १४ किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम काही अंशी पूर्ण करण्यात आले होते. शासनाने या कामासाठी अंदाजे ३० कोटी रुपये खर्च केले होते. यामध्ये औसा, माणिकगड (विदर्भ), माहूर, कंधार, धारूर, परांडा, खर्डा, आंबागड यासारख्या किल्ल्यांचे संवर्धन करण्यात आले. या किल्ल्यातील सर्व साहित्यांची तसेच दरवाज्याची पडझड मोठ्या प्रमाणात झालेली होती. त्याचे संवर्धन करण्याचे काम २०१५-१६ साली करण्यात आले. या कामाचा खर्च अंदाजे ४ कोटी होता.[३]

छायाचित्र दालन संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "अंबागड". Maharashtra Information (इंग्रजी भाषेत). 2017-09-29. Archived from the original on 2023-01-07. 2023-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Ambagad, Bhandara District, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra". trekshitiz.com. 2023-01-07 रोजी पाहिले.
  3. ^ "किल्ल्यांचे संवर्धन अंतिम टप्प्यात". eSakal - Marathi Newspaper. 2023-01-08 रोजी पाहिले.