हेमवतीनंदन बहुगुणा

भारतीय राजकारणी

हेमवतीनंदन बहुगुणा (एप्रिल २५,इ.स. १९१९-मार्च १७,इ.स. १९८९) हे भारत देशातील राजकारणी होते.

शिक्षणसंपादन करा

बहुगुणांनी आपले शालेय शिक्षण पौडी येथून पूर्ण केले आणि कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी अलाहाबाद येथील कॉलेजात प्रवेश घेतला.इ.स. १९३९-इ.स. १९४० दरम्यान त्यांनी महात्मा गांधींच्या प्रेरणेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीदरम्यान तुरूंगवास भोगला.ते इ.स. १९४६ पर्यंत तुरूंगात होते. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी आपले शिक्षण अलाहाबाद विद्यापीठातून पूर्ण केले.

राजकीय कारकीर्दसंपादन करा

बहुगुणा इ.स. १९५२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले.त्यांच्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी सभागृहाच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला.इ.स. १९६७ मध्ये त्यांची राज्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली.इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.पुढे इ.स. १९७३ ते इ.स. १९७५ या काळात त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.इंदिरा गांधींनी त्यांना इ.स. १९७५ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला.पुढे इंदिरा गांधींशी मतभेद झाल्यामुळे ते इ.स. १९७६ मध्ये काँग्रेस पक्षातून बाहेर पडले.

इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात बहुगुणांची नियुक्ती पेट्रोलियममंत्री म्हणून केली.इ.स. १९७९ मध्ये जनता पक्षात फूट पडली आणि चरण सिंग यांनी आपला समाजवादी जनता पक्ष स्थापन केला. बहुगुणांनी चरण सिंग यांच्याबरोबर त्या पक्षात प्रवेश केला.जुलै इ.स. १९७९ मध्ये चरण सिंग सरकारमध्ये बहुगुणांनी अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.चरण सिंग सरकार पडल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींशी आपले मतभेद मिटवून परत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते उत्तर प्रदेश राज्यातील गढवाल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

हेमवतीनंदन बहुगुणांनी इ.स. १९८२ मध्ये काँग्रेस पक्षनेतृत्वाबरोबर झालेल्या मतभेदांमुळे पक्षसदस्यत्वाचा आणि लोकसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.त्यांनी लोकशाही समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते इ.स. १९८२ मध्ये परत एकदा गढवाल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून अमिताभ बच्चन यांच्या विरोधात निवडणुक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला.त्यानंतर ते राजकारणात फारसे प्रभावशाली राहिले नाहीत.

मृत्यूसंपादन करा

इ.स. १९८९ मध्ये हृदयावरील बायपास शस्त्रक्रियेसाठी बहुगुणा अमेरिकेतील क्लिव्हलँड येथील रूग्णालयात दाखल झाले.पण शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गुंतागुंतींमुळे त्यांचे मार्च १७,इ.स. १९८९ रोजी निधन झाले.