सूर्य मंदिर (मोढेरा)

मोढेराचे सूर्य मंदिर

मोढेराचे सूर्य मंदिर भारताच्या गुजरात राज्यातील महेसाणा जिल्ह्यातील मोढेरा गावातील सूर्यमंदिर आहे. पुष्पावती नदीच्या काठावर असलेले हे दुर्मिळ मंदिर इसवीसन १०२६-२७ साली चालुक्य राजा भीम पहिला याने बांधले.[]

भूगोल

संपादन

मोढेरा गाव महेसाणा पासून २६ किलोमीटर तसेच अहमदाबाद शहरापासून १०१ किमी अंतरावर आहे.[]

इतिहास

संपादन

स्कंद पुराणानुसार मोढेरा जवळील भागाला रामायण काळी 'धर्मारण्य' असे संबोधले जायचे. रावणाचा वध करून परतलेल्या श्रीरामाने गुरू वसिष्ठाना ब्रह्म हत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी काय करावे असे विचारले. गुरू वसिष्ठांनी धर्मारण्यात जाऊन यज्ञ करण्याचा सल्ला दिला. मोढेरा येथील जन धारणेनुसार प्रभू श्रीराम आणि सीता यांनी या ठिकाणाला भेट देऊन यज्ञ केला आणि 'मोढेरक' या गावाची स्थापना केली. याचा गावाला पुढे मोढेरा असे म्हणले जाऊ लागले. [] सुर्यमंदिराबाहेर असणाऱ्या कुंडाला राम कुंड असेही म्हणले जाते.

इसवी सन १०२४-२५ च्या सुमारास गझनीच्या महमूदचे आक्रमण चालुक्य वंशीय राजा भीम पहिला याने मोढेरा येथे युद्ध करून परतवून लावले होते. इतिहासकारांचे असे मत आहे की या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ मोढेरा येथे सूर्यमंदिर उभारण्यात आले.

वास्तू विशेष

संपादन

मोढेरा येथील सूर्य मंदिर संकुलात तीन विभाग आहेत. प्रवेश करताच दिसते ते रामकुंड हे पाण्याचे मानव निर्मित तळे, त्यानंतर सभामंडप आणि शेवटी गूढमंडप अथवा गर्भगृह. सभामंडपामध्ये अतिशय सुरेख असे कोरीव खांब आहेत. गर्भगृहात प्रदक्षिणेसाठी चिंचोळा मार्ग आहे.

रामकुंड

संपादन

प्रवेश करताच दिसणारे रामकुंड हे उत्तर दक्षिण १७६ फुट लांब आहे तर पूर्व पश्चिम लांबी १२० फुट आहे. रामकुंडाची रचना ' वाव ' किंवा पायऱ्यानी बनलेल्या विहीरीप्रमाणे असल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण भासते. या पायऱ्यावर विविध देवतांची १०८ छोटी मंदिरे आहेत.[]

सभामंडप

संपादन

सभामंडपात प्रवेश करताना आधी कीर्ती तोरण लागते. काळाच्या ओघात तोरण नष्ट झाले असले तरी त्याचे दोन खांब अजूनही वैभवाची साक्ष देतात. सभामंडपाला चारही बाजूनी प्रवेशद्वारे आहेत. सभागृहाच्या छताला आधार देणारे खांब दोन प्रकारचे आहेत. बाहेरील बाजूस असणारे छोटे खांब आणि जमिनीपासून छतापर्यंत असणारे मोठे खांब.

गूढ मंडप

संपादन

गूढ मंडपाच्या बाहेरील भिंती सूर्याच्या १२ प्रतिमांनी तसेच विश्वकर्मा, अग्नी, गणेश, सरस्वती, अष्ट दिक्पाल यांच्या मूर्तींनी सजवलेल्या आहेत. गूढ मंडपास तीन बाजूनी प्रत्येकी एक खिडकी आहे. विशिष्ट दिवशी या खिडक्यातून सूर्यकिरण प्रवेश करत आणि मध्यभागी असणाऱ्या सूर्य मूर्तीवर पडत. गूढ मंडपातील काही मूर्तीवर इराणी पद्धतीचा संस्कार दिसतो. गूढ मंडपात काही मिथुन शिल्पेही आढळतात. गूढ मंडपावर आज शिखर आढळत नाही. चित्र टाका

  1. ^ http://asi.nic.in/asi_monu_tktd_gujarat_suntemple.asp
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-04-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-02-26 रोजी पाहिले.
  3. ^ https://www.templepurohit.com/hindu-temple/sun-temple-modhera-gujarat/
  4. ^ https://www.inditales.com/architecture-of-sun-temple-modhera/