इंडियन प्रीमियर लीगचा २०१६ मोसम हा आयपीएल ९ किंवा विवो आयपीएल २०१६ म्हणूनही ओळखला जातो. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा नववा हंगाम होता. सदर स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे २०१६ दरम्यान खेळवली गेली.

२९ मे २०१६ रोजी एम. चिन्नास्वामी मैदान, चेन्नई येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला पराभूत करून विवो आयपीएल, २०१६ चषक जिंकला. सनरायझर्स हैदराबादचे हे पहिलेच आयपीएल विजेतेपद होते.

अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार सनरायझर्स हैदराबादच्या बेन कटिंग ह्याला देण्यात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विराट कोहलीला स्पर्धेतील सर्वात मौल्यवान खेळाडू तर सनरायझर्स हैदराबादच्याच, मुस्तफिजूर रहमान याला आयपीएल २०१६ चा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

१४ जुलै २०१५ रोजी, आरएम लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या मालकांना २०१३ आयपीएल स्पर्धेतील स्पॉट फिक्सींग आणि बेटींग प्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबीत केले. त्यामुळे हे दोन संघ आयपीएल २०१६ आणि २०१७ मध्ये खेळू शकणार नाहीत. पुढच्या दोन आयपीएल मोसमांमध्ये दोन नवीन संघ त्यांची जागा घेतील असे बीसीसीआयने जाहीर केले. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स या २ वर्षांसाठी वगळण्यात आलेल्या संघांऐवजी पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे वेळापत्रक १० मार्च २०१६ रोजी जाहीर झाले. स्पर्धेत ५६ साखळी सामने आणि ४ प्ले ऑफ सामने असे एकूण ६० सामने खेळवण्यात आले.

२०१६च्या स्पर्धेत प्रथमच एलईडी यष्ट्या वापरण्यात आल्या. आयपीएल फॅन पार्कांची संख्या १६ वरून वाढवून ३६ करण्यात आली, ज्या मध्ये न्यू जर्सीमधील एका पार्काचा समावेश होता.

ऑक्टोबर २०१५ मध्ये, २०१७ मध्य समाप्त होणार्‍या पाच-वर्षाच्या करारामधून पेप्सिको कंपनीने मुख्य प्रायोजक म्हणून अंग काढून घेतले. त्याऐवजी चीनमधील स्मार्टफोन निर्माते व्हिवो इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला २०१६ आणि २०१७ चे मुख्य प्रायोजक म्हणून पुरस्कृत करण्यात आले.

नोव्हेंबर २०१५, मध्ये बीसीसीआयने अज्ञात कारणांमुळे जयपूर (राजस्थान रॉयल्स) आणि कोची (रद्दबातल कोची टस्कर केरळ) या दोन शहरांना वगळून नऊ शहराची नवीन संभाव्य फ्रँचायझीच्या यादीत निवड केली. निवड झालेली ही नऊ शहरे होती - चेन्नई, धरमशाला, इंदूर, नागपूर, पुणे, राजकोट, रांची आणि विशाखापट्टणम्. ३ डिसेंबरला दिल्या गेलेल्या माहितीनुसार लिलाव प्रक्रियेसाठी १२ कंपन्याच्या निविदा घेतल्या गेल्या होत्या.

८ डिसेंबर २०१५ रोजी घोषित केल्यानुसार, न्यू रायझिंग (संजीव गोएंका यांचे प्रतिनिधीत्व असलेली कंपनी) आणि इंटेक्स टेक्नॉलॉजिस ह्या कंपन्यांनी नवीन संघाच्या लिलावाचे अधिकार जिंकले. न्यू रायझिंग कंपनीने पुणे स्थित संघ निवडला तर इंटेक्सने राजकोटची निवड केली. १५ डिसेंबर २०१५ रोजी दोन नवीन फ्रँचायझींनी ड्राफ्ट मधून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स मधील प्रत्येकी ५ खेळाडूंची निवड केली. प्रत्येक फ्रँचायझीने त्यांचा ड्राफ्ट आणि लिलावामधून संघ विकत घेण्यासाठी ६६ कोटींचे वाटप केले.

महाराष्ट्रात तीन ठिकाणी होत असलेल्या २० सामन्यांवरून, ६ एप्रिल २०१६ रोजी, 'महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना आयपीएल सामन्यांसाठी पाण्याचा होत असलेला अपव्यय ही "गुन्हेगारी स्वरूपाची" बाब आहे' अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला फटकारले. मुंबई, नागपूर आणि पुणे येथे खेळवण्यात येत असलेल्या या सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना जवळपास ६० लाख लिटर पाणी वापरले जाणार आहे.

८ एप्रिल २०१६ रोजी, 'आयपीएल राज्याबाहेर गेली तरी चालेल, पण क्रिकेट सामन्यांसाठी राज्य सरकार पाणी देणार नाही' अशी भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. ९ एप्रिल २०१६ रोजी, स्पर्धेच्या पहिल्या सामन्याला काही तास शिल्लक असताना, मुंबई क्रिकेट असोसिएशनने दावा केला की, वानखेडे मैदानासाठी जे पाणी वापरले गेले ते बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून नाही तर खासगी कंपन्यांकडून आणले गेले आहे.

पुढे वाचा... २०१६ इंडियन प्रीमियर लीग