विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१६०५२०
हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.
उत्खननात हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.
हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती.
हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत. (पुढे वाचा...)