धोळावीरा भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले गाव आहे. भचाऊ तालुक्यातील खदीरबेट या मोठ्या गावाजवळ असलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. कच्छ वाळवंटी वन्यजीवन अभयारण्याचा भाग असलेले हे प्राचीन गाव १०० हेक्टरमध्ये पसरलेले असून येथे इ.स.पू. २६५० ते इ.स.पू. २१०० पर्यंत वस्ती होती. काही शतके निर्मनुष्य राहिल्यावर इ.स.पू. १४५०च्या सुमारास येथे पुन्हा एकदा मनुष्यवस्ती आली.