रघुनाथ वामन दिघे
रघुनाथ वामन दिघे (जन्म : कल्याण, २४ एप्रिल किंवा २५ मार्च १८९६; - ४ जुलै १९८०) हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी ते परिचित आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांत वर्णिलेले कोकणातील जीवन, शेतकरी व आदिवासींची दुःखे, त्यांच्या व्यथा-वेदना वेशीवर टांगणारे होते. र.वा. दिघे. हे कोकणातल्या खंडाळा घाटाच्या पायथ्याचे-खोपोलीचे शेतकरी. शॆतकऱ्यांमध्ये व आदिवासींमध्ये प्रत्यक्ष वावरून त्यांच्या जगण्यातली वास्तवता पहिल्यांदा र.वा. दिघे यांनी मराठी कादंबऱ्यांतून मांडली.
रघुनाथ वामन दिघे | |
---|---|
जन्म नाव | रघुनाथ वामन दिघे |
जन्म |
२५ मार्च १८९६ कल्याण, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
४ जुलै १९८० पुणे ,महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | पाणकळा |
वडील | वामन गणेश दिघे |
आई | अन्नपूर्णाबाई वामन दिघे |
पत्नी |
प्रथम पत्नी - [रतन कामथे] द्वितीय पत्नी - लक्ष्मीबाई [यमुना पाटणे] |
अपत्ये | दत्तात्रय,कृष्णा, उल्हास, शबरी, मुरार , वामन ,मालू ,कमल |
जीवन
संपादनदिघे हे बी.ए. एल्एल.बी. होते. त्यांनी पुणे व पनवेल येथे सोळा वर्षे वकिली केली. परंतु एका घरगुती प्रसंगाने दुःखी झालेले दिघे वकिली सोडून कायमस्वरूपी खोपोलीला आले आणि लेखनाकडे वळले. ते स्वतः हाडाचे शेतकरी असल्याने कोकणात न पिकणारा गहू आपल्या शेतात पिकवून दाखवल्याबद्दल १९५४-५५ साली खालापूर तालुका विकास संघाने ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून त्यांचा गौरव केला. १९४०-४५ साली शेतकऱ्यांचे कळीचे प्रश्न त्यांनी आपल्या लेखनातून मांडले. आज २१व्या शतकात शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु हा इशारा र. वां.नी त्याकाळीच दिला होता. नुसत्या शेतीवर अवलंबून उपयोगी नाही, काहीतरी जोडधंदा करा.. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा विचार त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून त्याकाळीच मांडला होता.
वकिलीतून निवृत्ती घेतल्यावर ते अलिबाग जिल्ह्यातील खोपोलीजवळच्या विहारी येथे राहून शेती करू लागले.
प्रकाशित साहित्य
संपादनदिघे यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. हा नायक शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्ये जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी त्यानुसार झगडा देतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची त्या कादंबऱ्यांमध्ये उत्तम वर्णने वाचायला मिळतात.
विशेषतः त्यांच्या पाणकळा आणि पड रे पाण्या या दोन कादंबऱ्यांतून भीमा नदीच्या खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे जीवन समर्थपणे उभे केले आहे. [१].
१९४० साली लिहिलेली ‘पाणकळा’ ही त्यांची पहिली कादंबरी. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथावेदना त्यांनी तीत मांडल्या आहेत. सजलपूर गावातील गावकऱ्यांची आणि तिथल्या डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या भिल्लांची ही कथा आहे. या वेगळ्या ग्रामीण कथानकामुळे कोणीही प्रकाशक ही कादंबरी प्रकाशित करण्यास तयार होईना. शेवटी दिघे यांनी स्वतःच पदरमोड करून या कादंबरीच्या हजार प्रती काढल्या. ‘पाणकळा’ प्रकाशित होऊन पंच्याहत्तर वर्षे लोटली आहेत. २०२० साली या कादंबरीची अकरावी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
‘आई आहे शेतात’ या कादंबरीत शेतकऱ्यांचे खडतर जीवन दिघ्यांनी चितारले आहे. ‘‘शेती ही फुकाची नाही. इथे कौशल्य लागते. त्यात भातशेती म्हणजे कशिदा. गप्पा मारून वा शिरा ताणून भागायचे नाही. इथे नुसते जमीनवाटप करून वा कायदे करून हा प्रश्न सुटायचा नाही. शेतीचे ज्ञान असणाऱ्यांच्या हातात जमीन गेली पाहिजे किंवा ज्यांच्या हातात ती आहे, त्यांनी अद्ययावत शेतकरी बनले पाहिजे. नाहीतर ही काळी आई आपली बाळे खाऊन टाकील..’’ शेतकीच्या यशाचे हे गमक त्यांनी कृषीतज्ज्ञाच्या अधिकारवाणीने शेतकऱ्यांना सांगितले.
दिघे यांनी अनेक सामाजिक विषयही आपल्या लेखणीतून हाताळले. त्यांची ‘कार्तिकी’ ही कादंबरी अस्पृश्यता निवारण या विषयावर आहे. त्यावर पुढे ‘कार्तिकी’ नावाचा चित्रपटही निघाला. लेखनासाठी त्यांनी खूप भटकंती केली. ‘सोनकी’ ही कादंबरी लिहिण्याआधी गोंडवनात जाऊन त्यांनी तिथले आदिवासी जीवन व तो परिसर जवळून न्याहाळला. या कादंबरीत खेड्याचे सुंदर वर्णन आहे. यानंतर त्यांच्या ‘निसर्गकन्या रानजाई’ व ‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. ‘पड रे पाण्या’ या कादंबरीत त्यांनी पावसाची केलेली आळवणी उद्बोधक आहे
‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबरीत त्यांनी ग्वाल्हेर संस्थानचा तोमरवंशीय राजा मानसिंह व त्याची प्रेयसी मृगनयना यांची प्रेमकथा रंगवली आहे. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे तीत ठिकठिकाणी पद्ये पेरली आहेत. यावरून त्यांना संगीत रागदारीचं किती ज्ञान होते हे दिसून येते. त्यांची अपूर्ण राहिलेली ‘हिरवा सण’ ही कादंबरी त्यांचे मित्र ग.ल. ठोकळ यांनी नंतर लिहून पूर्ण केली.
साहित्यकृतीचे नाव | प्रकाशनवर्ष (इ.स.) | साहित्यप्रकार | प्रकाशक |
---|---|---|---|
आई आहे शेतात | कादंबरी | ||
कार्तिकी | कादंबरी | ||
गानलुब्धा मृगनयना | कादंबरी | ||
निसर्गकन्या रानजाई | कादंबरी | ||
पड रे पाण्या | कादंबरी | ||
पाणकळा | कादंबरी | १९४० | |
पावसाचे पाखरू | कादंबरी | ||
पूर्तता | कादंबरी | ||
सराई | कादंबरी | ||
सोनकी | कथासंग्रह | ||
हिरवा सण | कादंबरी | सहलेखक - ग.ल. ठोकळ |
र.वा. दिघे यांच्याविषयीची पुस्तके
संपादन- दिघे यांच्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा कादंबरीकार र.वा. दिघे नावाचा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर ह्यांनी लिहिला आहे.
- ठाकूर यांनी डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली र.वा. दिघे यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून १९९० साली पीएच.डी. मिळवली.
- ‘पाणकळा’ची संक्षिप्त आवृत्ती जोत्स्ना प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहे.
र.वा. दिघे यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- १९४० साली जमखिंडी येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ आणि र. वां.च्या ‘पाणकळा’ या दोन कादंबऱ्यांना विभागून देण्यात आला होता.
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ मोरे, सदानंद. "ग्यानबांची वारी". ४ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
बाह्य दुवे
संपादन- दिघे,रघुनाथ वामन. मराठी विश्वकोश, खंड ७.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |