रामशेज किल्ला

(रामसेज किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)


रामशेज किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरला १४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा १० मैलाच्या अंतरावर आहे.

रामशेज
रामशेजचे ठिकाण दाखविणारा नकाशा
रामशेजचे ठिकाण दाखविणारा नकाशा
रामशेज
नाव रामशेज
उंची ३,२०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना

हा किल्ला मराठ्यांनी साडेसहा वर्ष मुघलांविरुद्ध लढवला होता. ह्या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगतली जाते की येथे श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे जात होते तेव्हा येथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले होते.

श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे.रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड, परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. ही सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.

मार्ग संपादन

गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नाशिक-पेठ मार्गावरील आशेवाडी ह्या गावातून किल्ल्यावर जायला मळलेली वाट आहे. तासाभरात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असला तरी पाण्याचे टाके, स्थानिक देव-देवतांची मंदिरे आणि पडझड झालेली तटबंदी ह्याखेरीज किल्ल्यावर फारसे बघण्यासारखे काही नाही. हा किल्ला मराठ्यांनी मुघल सैन्याला केलेल्या चिवट प्रतिकाराबद्दल प्रसिद्ध आहे.[१][२]

इतिहास संपादन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो इ.स. १६८२ला महाराष्ट्रावर चाल करून आला. आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) नावाचे किल्लेदार होते. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.

शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) ५००-६०० मावळ्यांसोबत गडावर होता. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू. पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले. गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत.

संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनारावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगरून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.

मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ८०-९० तोफा आणि 200 सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला. (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात). या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.

दोन वर्षांनंतरही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रामसेज किल्ला पूर्ण इतिहास Archived 2020-02-05 at the Wayback Machine. विसीट करा

फतेह खान संपादन

मग मात्र औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून घेतले. त्याने रामशेजची मोहीम फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर सोपविली. मग फतेहखान २० हजारीची फौज घेऊन आला. आणि त्याने रामशेजवर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे की बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे. त्या फतेहखानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. या मरहट्ट्यांनी फतेहखानच्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेहखानच्या हाती फक्त निराशा, अपमान आणि माघारच आली.

फतेहखानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सरून सकाळ झाली की ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरूज परत बांधून झालेला असायचा. ते दृश्य पाहून फतेहखान आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच ही पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेहखानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले की या मरहट्ट्यानां जादूटोणा येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.

अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खूपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेहखानच्या एका सरदाराने फतेहखानाला सांगितले की युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेहखानला हे पटले नाही, पण किल्ला जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदाराकडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेहखानला म्हणाला, – -हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हूॅं – मग त्या मांत्रिकाने मागितल्याप्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.

मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याजवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेहखानाचे सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्यावरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या छाताडाला जोरात लागला.मांत्रिक डोळे पांढरे करून पडला. मांत्रिक तिसरीकडे, सोन्याच्या नांग दुसरीकडे , फत्तेखान पळत मागे.

फतेहखानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरू केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येऊन फतेहखानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेहखान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेहखानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, – -उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा- – वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेहखान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जिवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेऊन झाडाझुडपाच्या साहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जाऊ लागले.

एकंदरीत फतेहखानाचा बेत असा होता की, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्यांमध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेहखानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) पुढच्या बाजूला मुख्य बुरुजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेहखानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेहखानाने रात्रीचा मारा सुरू केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते आहे. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेहखानचा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुजावर दबा धरून मोगल सैनिकांवर पाळत ठेवून बसले.

वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला की तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्युतांडवामुळे सगळे मोगल सैनिक जिवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होऊन मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावरून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेहखान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देऊ लागले, – -हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!- –

कासम खान संपादन

औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खानला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेऊन रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रूपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते. पण कासमखानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते. ही परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासमखानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस सडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येऊ लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होऊ लागले. मग कासमखानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.

तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रही सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासमखानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले की, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्यांच्या जिवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळेहीहि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधीमुळे त्याने पहारे क्मी केले होते, त्याच्याच फायदा घेऊन दबा धरून बसलेली रूपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासमखानाला कळून चुकले की रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे.

दिवसा किल्ल्यावरून मराठे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची.

किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो की पळो करून सोडले होते.

कासमखान देखील किल्ला जिंकू शकला नाही. तब्बल साडेसहा वर्षे हा किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला होता. आणि रामशेज शेवटपर्यंत अजिंक्य राहिला. }}

संदर्भ संपादन

  1. ^ महाराष्ट्र टाइम्स मधील लेख
  2. ^ लोकसत्तेतील लेख[मृत दुवा]