राजा बढे (जन्म : नागपूर, १ फेब्रुवारी १९१२; - ७ एप्रिल १९७७) हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती.

राजा बढे यांचा जन्म नागपुरात, प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५मध्ये त्यांनी पंजाबची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.

सुरुवातीला राजा बढे यांनी दैनिक सकाळच्या संपादकीय विभागात नोकरी केली. नंतर ते वर्षभर नागपूरच्या दैनिक महाराष्ट्रमध्ये सहसंपादक आणि त्याच वेळी वागीश्वरी मासिकाच्या संपादक मंडळात होते; आणि पुढे सावधान साप्ताहिकात लागले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून काम करीत होते. या नोकऱ्यांच्या धरसोडीत त्यांचे कॉलेजशिक्षण राहून गेले. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी आकाशवाणीला छोटे छोटे माहितीपट करून दिले.

राजा बढे यांनी १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्षे त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते ’प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले. बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि ’रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला.

राजा बढे यांचा संस्कृत काव्याचा आणि उर्दू शायरीचा चांगला अभ्यास होता. तरीही त्याच्या कवितेतेला भाषा बोजड नव्हती. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या. मुंबईच्या विविधवृत्तात त्या प्रकाशित होत असत.

सावरकरभक्ती

संपादन

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वतःच नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही असे गौरवोद्गार काढले आहेत.

’क्रांतिमाला’तील काही कविता

संपादन
  • ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला',
  • ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले',
  • ‘सुजला सुफला देश आमचा',
  • ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिंधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा'

अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना जनतेने विस्मृतीत टाकल्याचे दुःख व्यक्त केले आहे.

  • ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे.


कौंटुबिक जीवन

संपादन

आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी पालनपोषण यांतच सर्वस्व मानून राजा बढे स्वतः अविवाहित राहिले.

कथाकथन

संपादन

कथाकथनाचे कार्यक्रम आज सर्वत्र होतात. या कथाकथनाचे खरे बीज रोवले राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर यांनी प्रथमच त्यांच्या कथा कथन केल्या होत्या.

राजा बढे यांचे चित्रपट/नाटके

संपादन
  • चित्रपट ’अंगुरी’ (अभिनय)
  • ’कलेसाठी सारस्व” या नाटकात भूमिका
  • गळ्याची शपथ, महात्मा विदुर, रामराज्य, रामायण संत बहिणाबाई, वगैरे चित्रपटांचे गीतलेखन
  • चित्रपट ’रायगडचा राजबंदी’ (निर्मिती)

राजा बढे यांच्या गाजलेल्या कविता

संपादन
  • अजून यौवनात मी (विडंबन कविता)
  • अभिरामा सुखधामा (गायक जितेंद्र अभिषेकी)
  • आनंद मनि माईना (गायिका सुमन कल्याणपूर)
  • उधं ग अंबे उधं । दार उघड बये दार उघड ॥ (गायक शाहीर पिराजीराव नाईक)
  • कधी न पाहिले तुला ()
  • कधी भेटेन वनवासी (गायक अरविंद पिळगावकर)
  • कशी रे तुला भेटू (गायिका मालती पांडे)
  • कशी ही लाज गडे (गायिका मालती पांडे)
  • कळीदार कपूरी पान (गायिका सुलोचना चव्हाण)
  • काय कोणी पाहिले ()
  • कुणी ग बाई चोरुनी (गायिका मालती पांडे)
  • कोणा कशी कळावी (गायक कुमार गंधर्व)
  • घाई नको बाई अशी (नाट्यगीत - गायिका आशा खाडिलकर)
  • चांदणे शिपीत जाशी चालता तू चंचले (गायिका आशा भोसले)
  • छत आकाशाचे आपुल्या (नाट्यगीत - गायक अजित कडकडे)
  • छेडून गेले मधुर स्वर (नाट्यगीत - गायक शौनक अभिषेकी)
  • जय जय महाराष्ट्र माझा (गायक शाहीर साबळे, १९६०)
  • जाग बन्सिधरा जाग (गायिका श्यामा चित्तार)
  • डोळे मोडित गौळण राधा (नाट्यगीत - गायिका आशा भोसले)
  • ती तूचना ()
  • ती लोचने कुरंगी ()
  • तुझा शतरंज जोरीचा ()
  • तुझ्या मनात कुणितरी लपलं (गायिका माणिक वर्मा)
  • तू कुठे अन्‌ मी कुठे ()
  • ते आठवे आता पुन्हा()
  • त्या चित्त-चोरट्याला का (गायिका माणिक वर्मा)
  • दे मला गे चंद्रिके (गायिका लता मंगेशकर)
  • नका मारु खडा (गायक गजानन वाटवे)
  • प्रेम केले काय हा झाला गुन्हा (गायक कुमार गंधर्व)
  • मंद मंद ये समीर (गायक अरविंद पिळगावकर)
  • मला मोहू नका ()
  • माझिया माहेरा जा (ज्योत्स्ना भोळे)
  • मोहुनिया तुजसंगे नयन (गजानन वाटवे) (रवींद्र साठे)
  • लेऊ कशी वल्कला (नाट्यगीत - गायिका आशा खाडिलकर)
  • वाट कशी चुकले रे ()
  • शांत दांत कांते (नाट्यगीत गायक जितेंद्र अभिषेकी)
  • सुजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा (रामायण चित्रपटातले गीत)
  • हसताच नार ती अनार मनी फुले (गायक गजानन वाटवे)
  • हसतेस अशी का मनी (गायिका लता मंगेशकर)
  • ही मिठी तोडून जा ()
  • होशी तू नामानिराळा ()

शाहीर साबळे यांनी त्यांच्या यशस्वी गान-कारकिर्दीचे श्रेय राजा बढे यांच्या ’जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला दिले आहे.

राजा बढे यांचे पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्य

संपादन

राजा बढे यांच्या नावे १८ कवितासंग्रह, ४ नाटके, ९ संगीतिका, ५ एकांकिका, एक कादंबरी आणि शिवाय विविध प्रसिद्ध साहित्याचे भावानुवाद आहेत.

  • अशी गंमत आहे (नाटक)
  • ओहोळ (कवितासंग्रह)
  • किती रे दिन झाले (पत्रमय कादंबरी)
  • क्रांतिमाला (१९५२) - २१ कवितांचा संग्रह
  • चतुर किती बायका (नाटक)
  • छंदमेघ (मेघदूताचा काव्यमय अनुवाद)
  • पेचप्रसंग, (नाटक)
  • रसलीना (बिहारी नावाच्या व्रजभाषी कवीच्या सतसईचा अनुवाद)
  • मखमल (१९७६)
  • मंदिका (१९७६)
  • माझिया माहेरा जा (१९५१)(काव्य)
  • योजनगंधा (कवितासंग्रह)
  • वीणागीते (कवितासंग्रह)
  • शृंगार श्रीरंग (गीत गोविंदचा काव्यानुवाद)
  • शेफालिका - गाथा सप्तशतीचा काव्यानुवाद
  • स्वप्नगंधा (नाटक)
  • हसले मनी चांदणे (काव्यसंग्रह) (१९४१)
  • ही रात सवत बाई (नाटक), वगैरे, वगैरे.

समग्र राजा बढे

संपादन

नागपूरची नंदिनी पब्लिकेशन्स ही संस्था राजा बढे यांचे समग्र साहित्य नोव्हेंबर २०१५ च्या सुमारास प्रकाशित करणार आहे.

स्मारक

संपादन

नागपूरमध्ये राजा बढे यांचे स्मारक निर्माणाधीन आहे.

चरित्र

संपादन

कवी गंगाधर महांबरे यांनी लिहिलेले ’कविश्रेष्ठ राजा बढे :व्यक्ती आणि वाङ्‍मय’ या नावाचे पुस्तक नंदिनी पब्लिकेशन्सने प्रकाशित केले आहे.