तुकडोजी महाराज
तुकडोजी महाराज (पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे )(१९०९-) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज | |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज | |
मूळ नाव | माणिक बंडोजी इंगळे |
जन्म | ३० एप्रिल, १९०९ यावली, जि. अमरावती |
निर्वाण | ११ ऑक्टोबर, १९६८ मोझरी, जि. अमरावती |
गुरू | आडकोजी महाराज |
भाषा | मराठी, हिंदी |
साहित्यरचना | ग्रामगीता, अनुभव सागर भजनावली, सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली |
कार्य | अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन |
वडील | बंडोजी इंगळे |
आई | मंजुळाबाई बंडोजी इंगळे |
तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू.[१] त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मयसेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. [२]
खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.
ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेले लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता या ग्रंथामधील विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.
साहित्य संमेलने
संपादनतुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
विद्यापीठ
संपादननागपूर विद्यापीठाला 'तुकडोजी महाराज विद्यापीठ' असे नाव दिले आहे.
तुकडोजी महाराज यांची आणि त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
संपादन- अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
- आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
- ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
- डंका तुकडोजींचा (राजाराम कानतोडे)
- राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
- राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
- राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
- लहरकी बरखा (हिंदी, कवी - तुकडोजी महाराज)
- सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)
ग्रामगीता
संपादनग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :
संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।
संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :
- या झोपडीत माझ्या
- राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
- ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
- भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
- प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
- पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
- दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
- जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
- भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
- महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
- आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
- येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
- कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
- पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
- शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हणले होते.
हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमित ऐकविले जाते. :-
- हर देश में तू ...
- हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक, तू एकही है ।
- तेरी रंगभुमि यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥धृ॥
- सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
- फ़िर नहर बनी नदियॉं गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
- चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
- कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
- यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
- तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥
बाह्य दुवे
संपादन- ^ "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची माहिती Sant Tukdoji Maharaj Information In Marathi इनमराठी". inmarathi.net. 2021-04-10. 2022-07-27 रोजी पाहिले.
- ^ "तुकडोजी महाराज | अमरावती जिल्हा, महाराष्ट्र शासन | India". 2022-07-27 रोजी पाहिले.