महाबोधी विहार

बिहारमधील बोध गया येथे असलेले मंदिर.
(महाबोधी मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

महाबोधी विहार हे बिहार राज्यातील बोधगया (बुद्ध गया) मधील एक महा बौद्ध विहार आहे. यास जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. शाक्य वंशाचे राजकुमार सिद्धार्थ गौतमांना या ठिकाणी पूर्णज्ञान (संबोधी/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते सम्यक संबुद्ध’ बनले, व ‘बुद्ध’ म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. बोधगया ही बिहार राज्यातल्या पाटना शहरापासून ९६ कि.मी. अंतरावर आहे. महाबोधी विहाराच्या पुढे, पश्चिम दिशेला पवित्र असा बोधीवृक्ष आहे. पाली भाषेत या ठिकाणाला ‘बोधीमांद’ असे म्हणतात आणि तीथे असलेल्या मठाला ‘बोधीमांद–विहार’ असे म्हणतात. येथील सर्वात उंच गोपुराची उंची ५५ मीटर म्हणजे १८० फूट आहे.

महाबोधी बौद्ध विहार
महाबोधी वृक्ष - या झाडाखाली बसलेले असतांना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे

बांधकाम

संपादन

साधारणपणे, इ.स.पू. २५० मध्ये, म्हणजे बुद्धांना पूर्णज्ञान प्राप्ती नंतर २५० वर्षांनी बौद्ध सम्राट सम्राट अशोकांनी बोधगयेला भेट दिली होती. तिथे बुद्धांच्या स्मरणार्थ एक पवित्र स्थान निर्माणाचा व महा-विहार स्थापन्याचा त्यांचा मानस होता. तिथे त्यांनी विहार बांधले आणि बुद्धांना ज्या जागी ज्ञानप्राप्ती झाले होते, तीच नेमकी जागा लोकांना कळावी या हेतूने तिथे एका हिरेजडित सिंहासनाची स्थापना केली. हे सिंहासन ‘वज्रासन’ म्हणून ओळखले जाते.

सम्राट अशोकांना या महाबोधी विहाराचा संस्थापक समजले जाते. आता जे मंदिर उभे आहे, ते मात्र ५ व्या - ६ व्या शतकात बांधलेले असावे. गुप्त घराण्याच्या राजवटीच्या उत्तरार्धात आणि पूर्णपणे विटांनी बांधलेले हे विहार, अगदी सुरुवातीला बांधलेल्या बौद्ध धर्मीयांच्या विहारांपैकी एक आहे.


उतरती कळा

संपादन

गोऱ्या कातडीच्या हूण वंशातील लोकांनी आणि मोहम्मद बिन कासिमसारख्या इस्लाम धर्मांच्या राज्यकर्त्यांनी घातलेल्या धाडींमुळे आणि केलेल्या हल्ल्यांमुळे बौद्ध धर्माला आश्रय देणाऱ्या राजघराण्यांना जेव्हा उतरती कळा लागू लागली तेव्हा बौद्ध धर्माचाही ऱ्हास होऊ लागला; पण नंतर महाबोधी विहार असलेल्या भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागात पाल साम्राज्यात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. ८ व्या ते १२ व्या शतकापर्यंत या पाल राजघराण्याच्या आश्रयाने, बौद्ध धर्माच्या ‘महायान’ पंथाची भरभराट झाली.

पण पुढे ‘हिंदू सेना’ नावाच्या राजघराण्याने जेव्हा पाल सम्राटाचा पराभव केला, त्यानंतर परत बौद्ध धर्माचे महत्त्व कमी कमी होत गेले आणि हिमालयीन प्रदेश वगळता संपूर्ण भारतातून बौद्ध धर्म जवळजवळ लोपच पावला. बाराव्या शतकात बोधगया आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशावर मुस्लिम सैन्यांनी आक्रमण केले. या सगळ्या धुमश्चक्रीच्या काळात महाबोधी विहाराची दुरवस्था झाली आणि ते खूपच दुर्लक्षिले गेले. पुढील काही शतकांत, हिंदू मठाधिपती किंवा महंतच विहाराच्या जागेचे आपण मूळ मालक आहोत असा दावा करू लागले व तिथे त्यांनी आपला हक्क प्रस्थापित केला.

जीर्णोद्धार

संपादन

१८८० च्या दशकात, भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकारने सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या मार्गर्शनाखाली महाबोधी विहाराचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. यानंतर काही दिवसांनी इ.स. १८९१ मध्ये श्रीलंकेतील बौद्ध नेते अनागरिक धर्मपाल यांनी या विहाराचा ताबा हिंदूंकडून बौद्धांकडे परत द्यावा या मागणीसाठी एक मोहिम सुरू केली. हिंदू महंतांनी यावर आपेक्ष घेतवा पण मोहिम सुरूच ठेवली गेली. इ.स. १९४९ साली या मोहिमेला काही प्रमाणात यश आले; कारण तेव्हा विहाराचा ताबा हिंदू महंतांकडून काढून घेऊन बिहार सरकारकडे देण्यात आला आणि या सरकारने ‘मंदिर व्यवस्थापन समिती’ स्थापन केली. या समीतीत ९ सदस्य होते आणि अध्यक्षासह जास्त सभासद हिंदू होते. म्हणजेच या विहाराचा ताबा हिंदूंकडेच होता. या व्यवस्थापन समीतीने नेमलेले महाबोधीचे पहिले प्रमुख भिक्खू होते अनागरिक मुनिंद्र हे बंगाली गृहस्त, जे बऱ्याच दिवसांपासून महाबोधी मंडळाचे एक कार्यक्षम सदस्य होते.

अनागरिक धर्मपालानंतर जपानी वंशाचे भारतीय भिक्खू भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी महाबोधी विहाराचा ताबा हिंदूंकडून बौद्धांकडे यावा यासाठी व्यापक आंदोलने व संघर्ष केला.

बांधकामाची शिल्पशास्त्रीय शैली

संपादन

महाबोधी विहार विटा वापरून बांधलेले आहे आणि भारतातल्या अजूनही तग धरून असलेल्या विटांच्या सर्वात जून्या बांधकामांपैकी हे एक बांधकाम आहे. भारतीय वीटकामाचा हा एक सुरेख नमुना मानला जातो आणि नंतरच्या काळात शिल्पशास्त्राच्या परंपरेत जे काही बदल झाले किंवा प्रगती झाली, त्यावर या शैलीचा खूपच प्रभाव पडलेला दिसतो. युनेक्सोच्या म्हणण्यानुसार, “हे आताचे बौद्ध विहार म्हणजे, गुप्त साम्राज्यच्या राजवटीदरम्यान पूर्णपणे विटांचा उपयोग करून बांधलेले अगदी सुरुवातीच्या विहारांपैकी एक असलेले भव्य आणि मनोवेधक असे बांधकाम आहे.”

महाबोधी विहारावर मध्यभागी असणारा मनोरा किंवा गोपुर बरेच उंच असून ही उंची ५५ मीटर (१८० फूट) आहे. १९ व्या शतकात त्याचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले. या मध्यवर्ती गोपुराभोवती त्याच शैलीत बांधलेली आणखी चार लहान गोपुरे आहेत.

महाबोधी विहाराच्या चारही बाजूंना जवळपास २ मीटर उंचीचे दगडी कुंपन आहे. या कुंपनासाठी तयार केलेल्या कठड्यांमध्येही दोन अगदी वेगवेगळे प्रकार आहेत; म्हणजे ते तयार करण्याच्या शैलीतही फरक आहे आणि त्यात वापरलेले साहित्यही दोन वेगळ्या प्रकारचे आहे. त्यातही काही करडे इ.स.पू . १५०च्या दरम्यान वाळूच्या दगडांचा वापर करून बांधलेले आहेत आणि इतर करडे पॉलिश न केलेल्या खडबडीत ग्रॅनाईटपासून बनवलेले आहेत आणि ते गुप्तकाळातील (इ.स.पू. ३ रे शतक) असावेत असे समजले जाते.

बोधीवृक्ष

संपादन
मुख्य लेख: बोधीवृक्ष
 
बोध गयाच्या महाबोधी विहारातील महाबोधी वृक्ष

बोधीवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधीवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधीवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधीवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसऱ्या शतकात पुष्पमित्र शुंगने आणि इ.स. ६०० मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधीवृक्ष पुन्हा तोडला होता.

चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधीवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधीवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधीवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.[१]

 
बोधीवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ J. Gordon, Melton. Religions of the World: A Comprehensive Encyclopedia of Beliefs and Practices, Second edition. p. 358. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन