मराठी साहित्य महामंडळ

१९६०साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि नागपूरचा विदर्भ साहित्य संघ ह्या त्यात्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय.

वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या सामाविष्ट संस्था आहेत. याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात.

दर तीन वर्षांनी बदलणारे कार्यालय

संपादन

मराठी साहित्य महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. पुढील क्रमानुसार ते फिरते: १. मुंबई मराठी साहित्य संघ. २. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. ३. विदर्भ साहित्य संघ, नागपूर. ४. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद. महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे १९८६, १९९८ आणि २०१० या साली तीन तीन वर्षांकरिता आले होते. २०१३साली ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे.

इतिहास

संपादन

सर्व मराठी भाषिक मुलुख एका राज्य छ्त्राखाली आणण्याचा विचार राजकीय क्षेत्रामध्ये गतिमान झाला होता. त्या विचाराला बळ देण्यासाठी आणि मराठी भाषा व साहित्य ह्या संदर्भातील समान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसकट वेगवेगळ्या मराठी साहित्य संस्थांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांची मिळून एक प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या प्रयत्नांची परिणती १९५१ मध्ये सर्व साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींची मिरज येथे बैठक होण्यात झाली. कविवर्य अनिल उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा त्यात पुढाकार होता. मिरजेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानीही अनिलच होते. या बैठकीत सर्व संस्था मिळून तयार होणाऱ्या संघ-संस्थेच्या घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. संकल्पित संस्थेला 'मराठी साहित्य महामंडळ' असे नाव द्यावे अशी अनिलांनीच सूचना केली.[]

महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात.

पहिले काम

संपादन

या चारही संस्थांनी मिळून स्थापन केलेल्या या संस्थेचे पहिले अध्यक्ष प्रा. दत्तो वामन पोतदार हे होते. १९६२मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या लेखनात एकसूत्रीपणा आणण्यासाठी भाषा लेखनाचे काही नियम तयार केले तेच मराठी शुद्धलेखनाचे नियम होत. हे नियम १९६२ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण, यांनी सरकारच्या वतीने स्वीकारले. हे महामंडळाने केलेले भाषाविषयक पहिले काम होय.

स्थापना दिवस

संपादन

दरवर्षी महामंडळ आपला स्थापना दिवस साजरा करीत असते. महनीय वक्त्यांचे भाषण आणि दिवसभराचे चर्चासत्र असे त्याचे स्वरूप असते. ज्या मोठ्या लेखकांची किंवा विद्वानांची साहित्य संमेलनाचे किंवा महामंडळाचे अध्यक्ष होण्याची इच्छा नाही अशा लेखकांचा सन्मान व्हावा म्हणून, गेल्या सुमारे १५ वर्षांपासून, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने, आपल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात महनीय वक्ता म्हणून अशा साहित्यिकाला सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यास सुरुवात केली. या प्रसंगी एखाद्या वाङ्मय प्रकाराचा किंवा त्या त्या कालखंडातील वाङ्मयावर चर्चा घडवून आणली जाते.

महाराष्ट्रात वेळोवेळी भाषाविषयक किंवा संस्कृतीविषयक जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांचा समाजाकडे किंवा शासनाकडे पाठपुरावा करून ते प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ प्रयत्न करीत असते.

साहित्य संमेलने

संपादन

महामंडळाच्या स्थापनेपर्यंत मराठीची जी साहित्य संमेलने भरत होती ती पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद भरवीत असे. या संमेलनांना 'महाराष्ट्र साहित्य संमेलन` असेच तोपर्यंत म्हणले जात होते. साहित्य महामंडळाने काम सुरू केल्यानंतर शक्यतो दरवर्षी एक साहित्य संमलेन भरवावे असा निर्णय १९६४मध्ये मडगांवमध्ये झालेल्या ४५व्या साहित्य संमेलनात घेतला आणि १९६५ मध्ये हैदराबाद येथे जे ४६ वे साहित्य संमेलन झाले ते महामंडळाचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय.

प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतांनाही महाराष्ट्र साहित्य संमेलनाचेच ते नवे रूप असल्यामुळे संमेलनाचा अनुक्रमांक जुन्यावरूनच पुढे असा चालू ठेवण्यात आला आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नाव देण्यात आले. तेच आजवर चालू आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित साहित्य संमेलनाशिवाय राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :

संलग्न संस्था

संपादन

१. मराठी साहित्य संघ (मुंबई) -कार्यक्षेत्र मुंबई शहर व उपनगरे. आजीव सभासद २०००. मतदारसंख्या १७५.
२ महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) -कार्यक्षेत्र कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश (एकूण १४ जिल्हे). आजीव सभासद : ९०००. मतदारसंख्या १७५.
३. मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद) -कार्यक्षेत्र मराठवाडा (आठ जिल्हे). आजीव सभासद २४००. मतदारसंख्या १७५.
४. विदर्भ साहित्य संघ (नागपूर)-कार्यक्षेत्र विदर्भ (११ जिल्हे). आजीव सभासद ६०००. मतदारसंख्या १७५.

या संस्थेचे रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्हे, नवी मुंबई, ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर व उपनगरे हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र आहे. साहित्य क्षेत्रात काम करणारी आणि साहित्य संमेलने भरविणारी ही संस्था अखिल भारतीय मराठी महामंडळाशी संलग्न नाही.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर

संपादन

साहित्य क्षेत्रात काम करणारी आणि साहित्य संमेलने भरविणारी ही संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्न नाही.

अनुदान

संपादन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व महामंडळाच्या चार घटक संस्था, तसेच वर नावे दिलेल्या पण संलग्न नसलेल्या दोन संस्था यांना दरवर्षी रु.५ लाख इतके अनुदान ’महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती महामंडळ’ या सरकारी संस्थेमार्फत देण्यात येते. शिवाय प्रत्येक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुमारे २५ लाख रुपयांचे अनुदान असते. भारताबाहेर भरलेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनांनासुद्धा सरकारी अनुदान मिळाले आहे.

बृहन्महाराष्ट्र

संपादन

महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राबाहेर असलेल्या ज्या साहित्य संस्था महाराष्ट्रालगतच्या आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये काम करीत होत्या, त्या साहित्य संस्थांनी महामंडळामध्ये समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली. त्या संस्थांच्या इच्छेचा, मूळ चार घटक संस्थांनी गंभीरपणाने विचार केला आणि त्यांना साहित्य महामंडळात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयानुसार मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्यानंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या. या तिन्ही संस्था समाविष्ट झाल्यानंतर साहित्य महामंडळाचे रूपांतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात झाले. मात्र या संस्थांच्या सभासदांना मताधिकार नाही.

महामंडळाचे अध्यक्ष

संपादन

साहित्य महामंडळाची स्थापना झाल्यानंतर बरीच वर्षे दत्तो वामन पोतदार हेच महामंडळाचे अध्यक्ष होते. काही वर्षांनंतर(?) महामंडळाचे पदाधिकारी निवडणुकीने ठरू लागले. आणखी काही वर्षे गेल्यानतर(?) महामंडळाचे कार्यालय एकाच ठिकाणी ठेवण्याऐवजी ते चारही घटक संस्थांकडे म्हणजे मूळ संस्थांकडे फिरते असावे असा निर्णय महामंडळाने घेतला आणि त्यानंतर प्रत्येक तीन वर्षांनी संस्थांच्या ज्येष्ठतेनुसार पुणे, नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या क्रमाने हे कार्यालय दर तीन वर्षांनी स्थलांतरित होणे सुरू झाले.

आतापर्यंत दत्तो वामन पोतदार, वि.भि.कोलते(एक महिन्याकरिता), कवि अनिल, गंगाधर गाडगीळ श्री.पु.भागवत, राजेंद्र बनहट्टी, सुरेश द्वादशीवार, डॉ. सुधीर रसाळ, वसुंधरा पेंडसे-नाईक, गं.ना.जोगळेकर, मनोहर म्हैसाळकर हे अध्यक्ष झालेले आहेत. २००७ पासून श्री. कौतिकराव ठाले पाटील हे अध्यक्ष होते. १ एप्रिल २०१३ रोजी संस्थेचे कार्यालय पुण्यात आल्यानंतर माधवी वैद्य या महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या होत्या. समहामंडळाचे कार्यालय नागपूरला आल्यानंतर ज्येष्ठ कवी-समीक्षक श्रीपाद भालचंद्र जोशी हे २०१६ ते २०१९ या काळासाठी अध्यक्ष झाले आहेत.

सध्याचे कार्यालय

संपादन

२०१३ सालापूर्वी महामंडळाचे कार्यालय मुंबईत होते. तेव्हा कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार दर तीन वर्षांनी संस्थेचे कार्यालय एखाद्या घटकसंस्थेकडे जाते. त्याप्रमाणे ते १ एप्रिल २०१३ रोजी पुण्यात आले आहे. तेव्हापासून माधवी वैद्य या महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या आहेत. २०१७ साली डॉ. श्रीपाद जोशी हे अध्यक्ष आहेत.

सदस्य

संपादन

सध्या (इ.स. २०१२) प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अध्यक्ष, हैद्राबादच्या डॉ. विद्या देवधर महामंडळाच्या उपाध्यक्षा, मराठवाडयातील डॉ. अरुण प्रभुणे कोषाध्यक्ष तर श्री. कुंडलिक अतकरे हे कार्यवाह आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे डॉ. वि.भा. देशपांडे, डॉ. माधवी वैद्य, श्री. मधु नेने, मुंबईच्या साहित्य संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रा. सुहासिनी कीर्तीकर, श्रीमती कुंदा पडळकर, नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचे श्री. मनोहर म्हैसाळकर, प्रा. श्रीपाद भालचंद्र जोशी, श्रीमती शोभा उबगडे हे प्रत्येकी तीन सभासद आहेत. गुलबर्ग्याच्या कर्नाटक मराठी साहित्य परिषदेचे जे.एन.कदम, भोपाळच्या मध्यप्रदेश साहित्य संघाचे अनिल निगुडकर, पणजीच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे सुरेश नाईक, विलासपूरच्या छत्तीसगड साहित्य संघाचे श्री. कपूर वासनिक आणि बडोद्याच्या मराठी वाङमय परिषदेच्या डॉ. वनिता ठाकूर हे प्रत्येकी एक एक सभासद आहेत. शिवाय साहित्य संमलेनाचा अध्यक्ष हा पदसिद्ध सभासद असतो. प्रत्येक वर्षात महामंडळाच्या किमान चार सभा होत असतात. आणि या सभांमधून सर्व निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेण्यात येतात.

महाराष्ट्र शासनाचे आर्थिक साहाय्य

संपादन
  • महाराष्ट्र शासनाचे वार्षिक ५ लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त होते.
  • महामंडळाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी आयोजक संस्थेला राज्य शासनाच्या वतीने २५ लक्ष रुपयांचे अनुदान मिळते. संमेलनाखेरीज महाराष्ट्राबाहेर होणाऱ्या महामंडळाच्या चर्चासत्रादी उपक्रमांसाठी महामंडळ समाविष्ट संस्थांना आर्थिक साह्य करते.

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Google's cache of http://www.sahityasagarsangli.com/index.php?option=com_content&task=view&id=17&Itemid=63 Archived 2009-05-27 at the Wayback Machine.. It is a snapshot of the page as it appeared on 2 Jul 2009 16:36:02 GMT

नोंदी

संपादन

आता महामंडळ कार्यालय नागपूर येथे आहे. त्याचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत.