मराठी नावे
मराठी लोकांच्या संपूर्ण नावाची रचना सामान्यत: व्यक्तिनाम, वडलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव अशी असते. असे असले तरी काही मराठीजन आपली नावे वेगळ्या पद्धतीने लिहितात.
पाळण्यातले नाव, व्यवहारातले नाव, व्यवसायासाठी घेतलेले नाव, टोपण नाव, सूचीमध्ये दाखल करण्यासाठीचे नाव असे नावाचे अनेक प्रकार आहेत.
- महाराष्ट्रीय किंवा मराठीभाषक असणाऱ्या व्यक्तीच्या नावांचे प्रकार आणि नाव लिहिण्याच्या पद्धती
- ह
मूल जन्माला येते तेव्हा त्याला किंवा तिला देण्यात येणारे तात्पुरते नाव म्हणजे जन्म नाव. ज्या प्रसूतिगृहात आईची प्रसूती होते होते तिथे हे नाव त्यांच्या नोंदणी वहीत नोंदण्यासाठीच्या उपयोगाचे असते.
अनेकदा हे नाव बालकाच्या जन्माच्या वेळी असलेल्या सूर्य, चंद्र, ग्रह, आणि नक्षत्रांच्या अंतराळातील स्थितीवर आधारलेल्या कुंडलीच्या अभ्यासातून मिळालेल्या आद्याक्षरापासून सुरू होणारे असते. मुलाच्या बारशाच्या वेळी हेच नाव मुक्रर करण्याचीही पद्धत अनेक समाजांत असते. त्यामुळे सारख्याच अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्तींची रास एकच असते, असे महाराष्ट्रात आणि विशेषतः महाराष्ट्राबाहेर आढळून येते.
पाळण्यातले नाव
संपादनहिंदू समाजात बालकाच्या जन्मानंतरच्या बाराव्या दिवशी मुलाचे नामकरण किंवा बारसे करण्याची पद्धत आहे. त्या दिवशी शक्य नसले तर हे बारसे नंतरही केले जाते. त्यादिवशी ठेवल्या जाणाऱ्या नावाला ‘पाळण्यातले नाव’ असे म्हणतात. कधीकधी एकाऐवजी ‘हे’ ऊर्फ ‘ते’ असे जोडनावही ठेवले जाते. कारवार-मंगलोरकडे अशा वेळी पाच नावे ठेवण्याची पद्धत आहे.
ख्रिश्चनधर्मीय बालकांचे पाळण्यातले नाव कधीकधी दुहेरे किंवा तिहेरी जोडनाव असते. उदा० थॉमस अल्व्हा (एडिसन), रॉबर्ट लुई बॅलफोअर (स्टीव्हन्सन), जॉर्ज बर्नार्ड (शॉ), फर्दिनांद व्हिक्टर यूजीन (डेलाक्रॉइक्स) वगैरे. यांतले कंसात दिले आहे ते आडनाव आणि बाकीच्या त्या व्यक्तीचीच नावे. या नावप्रकारात क्रमाने दुसरे येणारे नाव हे ’मधले नाव’ समजले जाते. दक्षिणी भारतातही अशी पद्धत आहे. उदाy० दासिग वेंकट सच्च सांब शिवर राव. यांतले हे दासिग हे गावाचे नाव किंवा आडनाव, राव हे तेलुगू किंवा कानडी असल्याचे दाखविण्यासाठी लावायचे उपपद आणि बाकीचे शब्द त्या व्यक्तीच्या नावाचे तुकडे. लिहिताना हे नाव D.V.S,अ.S.S. Rao असे लिहिले जाते.
उत्तरी भारतीयांत पाळण्यातल्या नावाचे दोन किंवा तीन तुकडे करून पूर्ण नाव बनते. उदा० हरि वंश राय बच्चन. यांतले बच्चन हे काव्यरचनेसाठी घेतले टोपणनाव आणि हरिवंशराय हे पाळण्यातले नाव. त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव वापरलेच नाही. त्यांच्या मुलानेही तेच केले. त्याने अमिताभ बच्चन असे नाव धारण केले. त्यामुळे मूळची ऐश्वर्या राय असलेली सून, ऐश्वर्या राय बच्चन झाली. लाल बहादुर शास्त्री श्रीवास्तव. यांच्या नावातली शास्त्री ही पदवी, श्रीवास्तव हे आडनाव आणि लाल बहादुर हे व्यक्तिनाव. लालबहादुर शास्त्री यांची मुले आता ’शास्त्री’ हेच आडनाव लावतात. जगदीशचंद्र बोस हे नाव J.C. Bose असे, तर श्रीधरलाल हे नाव S,D. Lal असे लिहितात.
अनेक भारतीय आपल्या जातीचे नाव आडनाव म्हणून वापरतात. सोनार, कुंभार, भट, भट्ट, अय्यर, नायर, आगरवाल (अग्रवाल), वगैरे. पंजाबी शीख आणि अनेक दक्षिणी भारतीय आपल्या खेड्याचे नाव आडनाव म्हणून वापरतात. उदा० लढ्ढा. महाराष्ट्रात गावाच्या नावानंतर कर किंवा वार लावून आडनाव बनते. उदा० मुळगावकर, हमपल्लीवार वगैरे. पारशी किंवा बोहरी लोकांनी गावाच्या नावानंतर ’वाला’ लावून आपले आडनाव बनवले आहे. नडियादवाला, कोलंबोवाला ही त्याची उदाहरणे. राजस्थानात ’इया’ प्रत्यय लावून आडनावे बनतात. कटारा गावचा माणूस आपले आडनाव कटारिया सांगतो. व्यवसायाच्या नावाला आडनाव लावूनही आडनावे बनतात. बंदुकीचा व्यवसाय करणारा बंदूकवाला, दारूचा व्यवसाय करणारा दारूवाला, सोड्याच्या बाटल्यांचे ओपनर बनवणारा तो सोडाबॉटलओपनरवाला, वगैरे. काही आडनावे पूर्वजांचे वैशिष्ट्य सांगतात. द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, पुरोहित, उपाध्याय, वंद्योपाध्याय, मुखोपाध्याय वगैरे. अनेक उत्तरी भारतीयांत नावातला सिंह हा शब्द Singh, सिंग, सिन्हा, वगैरे बनून आडनाव बनतो. उदा० मिल्खासिंह हा मिल्खा सिंग होतो. असेच शत्रुघ्न सिन्हा, राजनाथ सिंह वगैरे.
व्यवहारातले नाव
संपादनपाळण्यातले नाव हेच बहुधा व्यवहारातले नाव असते, आणि त्याच नावाने मुलाला शाळेत दाखल करतात. पण क्वचित प्रसंगी मुलाचे शाळेतले नाव पाळण्यातल्या नावापेक्षा भिन्न असते. पाळण्यातले नाव किंवा व्यवहारातले नाव काहीही असले तरी मुलाला हाक मारायचे नाव तिसरेच असू शकते. महादेव गोविंद रानडे यांचे घरात वापरायचे नाव माधव होते. याशिवाय हाका मारण्याच्या सोयीसाठी मूळ नावांत किंचित बदल करून बनलेल्या नावाने मूल ओळखले जाते. उदा० विजयचे विजू, अलकनंदाचे अलका, बळवंतचे बाळ वगैरे. मुलाच्या कुटुंबातील स्थानानुसार त्याला अण्णा, भाऊ, ताई, अक्का असे एखादे टोपण नावही मिळते. तुकाराम भाऊ साठे यांना घरात अण्णा म्हणत आणि पुढे ते अण्णा भाऊ साठे म्हणून प्रसिद्धीस आले.
मुंजीतले नाव
संपादनज्या समाजांत मौंजीबंधनाचा विधी होतो त्यांतल्या मुलग्यांना मुंजीच्या वेळी गुरुजी एक नाव देतात. हे नाव पुढील आयुष्यात एखाद्या धार्मिक गुरूकडून दीक्षा घेण्याचा प्रसंग आला तर त्या वेळीच फक्त कामाला येते.
विवाहित स्त्रीचे नाव
संपादनलग्न झाल्यानंतर मुलीचे आडनाव बदलते आणि वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव येते. त्याशिवाय अनेकदा, लग्नसमारंभादरम्यान मुलीचे व्यक्तिनामही बदलून दुसरे ठेवले जाते. असे झाले तर स्त्रीच्या नावामधील प्रत्येक घटकात बदल होऊन तिला संपूर्णपणे वेगळेच नाव मिळते. या नव्या नावात तिच्या लग्नापूर्वीच्या नावातला कोणताही अंश शिल्लक नसतो.
नुसतेच व्यक्तिनाव
संपादननाट्यचित्रपट सृष्टीतले कलावंत अनेकदा फक्त व्यक्तिनावाचेच ओळखले जातात. अभिनेत्री गौरी, सीमा, सुलोचना ही त्यांतली काही उदाहरणे. अभिनेते धुमाळ, वाटवे हे फक्त आडनावाचे ओळखले जात. यशवंत यांच्यासारखे काही कवीही फक्त व्यक्तिनावाने प्रसिद्ध आहेत. (कवी) कालिदास, (गणिती) भास्कराचार्य, शिवाजी, महादू, म्हादू, रघू (कऱ्हाडकर) ही आणखी काही उदाहरणे. काही वर्षांपूर्वी ईव्ह्ज वीकली या स्त्रियांच्या नियतकालिकाने स्त्रियांना त्यांचे व्यक्तिमत्त्व असावे, त्यासाठी त्यांनी आपल्या नावानंतर वडिलांचे नाव, पतीचे नाव वा आडनाव लिहू नये असा खूप प्रचार केला होता. त्याला त्याकाळी काही बायका बळी पडल्या होत्या. पण त्या पद्धतीतला फोलपणा दिसून आल्यामुळेच बहुधा ती पद्धत निदान महाराष्ट्रात तरी चालली नाही.
ऐतिहासिक कवींची काही खास नावे
संपादनरामदास हे काही दाशरथी रामाचे भक्त नव्हते, मारुतीचे होते. त्यांनी ’रामदास’ हे मारुतीसाठी वापरले जाणारे विशेषण स्वतःचे नाव म्हणून घेतले. तुकारामांनी आपल्या अभंगांत गोवण्यासाठी ’तुका’ वापरले,तर नामदेवाने ’नामा’. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पद्यरचनेत गोवण्यासाठी ’बापरखुमादेवीवरू’ हे, तर एकनाथांनी त्यांच्या गुरूची आठवण म्हणून ’एकाजनार्दन’ हे नाव घेतले.
टोपण नाव
संपादनसाहित्य लेखनासाठी अनेकजण एक वेगळेच नाव घेतात, त्याला टोपणनाव म्हणतात. टोपणनावानुसार मराठी कवी येथे लेखक-कवींची एक यादी वाचता येईल.
इतिहासकाळात ही पद्धत अतिशय लोकप्रिय होती. खंडो चिमणाजी, चिंतो विठ्ठल, चिंतो विश्वनाथ, दादोजी कोंडदेव, खंडो बल्लाळ ही काही उदाहरणे.
आजही मनोरंजन क्षेत्रातील स्त्री-पुरुष अशी नावे लावतात. उदा०
अभिनेत्री : अमृता सुभाष, केतकी विलास, ज्योती सुभाष, पल्लवी सुभाष, मधुमाला प्रथमेश, स्पृहा शिरीष, रसिका सुनील, रेशम प्रशांत; गायिका : सावनी रवींद्र, सायली संजीव, अभिनेते : ललित प्रभाकर इत्यादी.uy
नाव आणि आडनाव
संपादनहीही एक इतिहासकालीन पद्धत असून ती मराठी समाजात अजूनही प्रचलित आहे. तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, राजा गोसावी, राजा परांजपे, माधव वझे, शांता शेळके, हरी नरके, लता मंगेशकर, दुर्गा भागवत वगैरे अनेक जणांचे नाव या पद्धतीचे आहे.
आदरार्थी प्रत्ययांकित नावे
संपादनकाही लोकांच्या नावाला जोडलेला ’जी’, ’राव’, महाराज यांसारखा आदरार्थी प्रत्यय त्यांच्या नावात इतका मिसळून गेलेला असतो की, त्या प्रत्ययाशिवाय उच्चारलेले नाव त्या व्यक्तीचे वाटतच नाही.
अशी काही नावे : शिवाजी-येसाजी-बहिर्जी-तानाजी-मालोजी, शिवाजीराव (पटवर्धन, भोसले), नानाजी (देशमुख), (केशव) भिकाजी (ढवळे), महादजी (शिंदे), रावबाजी, बाजीराव (पेशवे), मल्हारराव (होळकर), जयंतराव (टिळक), श्यामराव (ओक), हिराबाई (बडोदेकर), गायत्रीदेवी (मानसिंग), नानासाहेब (पेशवे, परुळेकर), भिकुसा (यमासा क्षत्रिय), महादेवशास्त्री (जोशी), दाजीशास्त्री (पदे), जोतिबा (फुले), राघोबा, ज्ञानबा-तुकोबा, गोरोबा (कुंभार), म्हादबा, बाबामहाराज (सातारकर), वगैरे. संस्थाने संपून काळ लोटला तरी संस्थानिकांचे वंशज स्त्रीपुरुष अजून ’राजे’ लावतात. उदा० वसुंधराराजे सिंदिया, रामराजे निंबाळकर वगैरे.
जोड आडनावे
संपादनकाही विवाहित स्त्रियांच्या ’नाव आणि आडनाव अशा पद्धतीने लिहिलेल्या नावांत आधी माहेरचे आडनाव आणि नंतर सासरचे आडनाव लिहिलेले आढळते. उदा० अलका कुबल आठल्ये, निवेदिता जोशी सराफ, पद्मजा फेणाणी जोगळेकर, भक्ती बर्वे इनामदार, रंजना पेठे जोगळेकर, लीला मस्तकार रेळे, विजया जोगळेकर धुमाळे, वैष्णवी कानविंदे पिंगे, सई परांजपे जोगळेकर, सुकन्या कुलकर्णी मोने, वगैरे. कधी काळी व्यवसायाने पाटील वा कुलकर्णी असणाऱ्या व्यक्ती आपल्या नावात दोन आडनावांचा समावेश करतात. विखे पाटील, बुट्टे पाटील, रेडे कुलकर्णी, (नारायण) कुलकर्णी कवठेकर आदी. विनोदी मराठी लेखक वि.मा.दी. पटवर्धन यांच्या नावातला ’दी’ म्हणजे दीक्षित. महाराष्ट्रातील काही कुटुंबांची आडनावे मुळातच जोडनावे असतात. कदमबांडे, गुर्जपाध्ये, जोशीराव, ठाकुरदेसाई, देवपुजारी, नाईक नवरे, नाईक निंबाळकर, नाईक साटम, पंतवैद्य, पाठकपुजारी, पैधुंगट, प्रभुचिमुलकर, प्रभुदेसाई, प्रभुमिराशी, बाळसराफ, मानेशिंदे, मानेशिर्के, रावकवी, रावजोशी, रावराणे, रावराजे, राजेशिर्के ही तसली काही उदाहरणे. दासगुप्ता, सेनगुप्ता, रायचौधरी, रायभौमिक, रायसेन ही बंगाली जोडआडनावे प्रसिद्धच आहेत. काही बंगाली आडनावे तिहेरी असतात. उदा० बसू राय चौधरी, घोष रॉय चौधरी वगैरे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्तची पत्नी असलेली प्रसिद्ध गायिका गीता दत्त, हिचे माहेरचे आडनाव घोष रॉय चौधरी होते, सासरचे खरे तर पदुकोण, पण ती दत्त लावीत असे..
बदललेली आडनावे
संपादनदक्षिणी भारतीयांना आडनाव नसते, त्यामुळे नावांवरून त्यांची जात ओळखता येत नाही, म्हणून ती आदर्श पद्धत आहे, असे काहीजण समजतात. आडनावावरून जात किंवा गाव समजू नये म्हणून, किंवा अन्य कारणाने काही मराठी माणसे आपले जुन्या काळापासून चालत आलेले आडनाव बदलतात. पण असे असले तरी त्यांची नाव लिहिण्याची एकूण पद्धत बदलत नाही. अशी काही आडनावे म्हणजे आंबेडकर, साठे वगैरे. चाफेकर बंधूंनी रॅन्डचा खून केल्यानंतर अनेक चाफेकरांनी आपले आडनाव चापेकर केले. (कोकणात चापे नावाचे गाव नसल्याने चापेकर हे नाव असण्याची शक्यता तशी कमीच.)
नावांची आद्याक्षरे आणि आडनाव
संपादनही पुरुषांचे नाव कागदोपत्री लिहिण्याची रूढ पद्धत आहे. प्र.के. अत्रे, ग.त्र्यं. माडखोलकर, वगैरे. यांत एक उपप्रकार म्हणजे स्वतःचे नाव आणि आणि आडनाव पूर्ण लिहून मधल्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावाचे आद्याक्षर लिहिणे. राम कृ, जोशी, बाळ ज. पंडित, दिनकर द. पाटील वगैरे नावे या प्रकारातली. पुरुषोत्तम शिवराम रेगे आपले नाव एक तर पु.शि. रेगे असे लिहीत किंवा पुरु.शिव.रेगे असे.
आणखी तिसरा उपप्रकार म्हणजे स्वतःच्या नावाचे आद्याक्षर लिहून, वडिलांचे नाव आणि आडनाव पूर्ण लिहिणे. उदा० के. नारायण काळे, यातले केशव हे नाव गाळले आहे. यांतही एक उपप्रकार म्हणजे आडनाव गाळणे. उदा० भगवान रघुनाथ कुलकर्णी आपले नाव बी. रघुनाथ असे लिहीत. काहीजण स्वतःच्या नावातली एकदोन अक्षरे लिहून नंतर आडनाव लिहितात. दत्ता वाळवेकर, विजू खोटे ही काही उदाहरणे.
आडनावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहून आधी किंवा नंतर स्वतःचे नाव लिहिणारी मराठी माणसे अनेक आहेत.उदा० व्ही.शांताराम, पी.बाळू (क्रिकेटखेळाडू), सी. रामचंद्र, जयश्री टी., मीना टी., एन.दत्ता, के.दत्ता, वगैरे. स्वतःचे घरगुती नाव लिहून नंतर आडनाव लिहिणारे अण्णा हजारे, नाना फडणीस, बापू गोखले, तात्या टोपे, दादा धर्माधिकारी हे, तर मध्ये वडिलांचे घरगुती नाव लिहिणारे अण्णा भाऊ साठे, ह्याही मराठीभाषकांच्या नाव लिहिण्याच्या तऱ्हा आहेत.
नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव
संपादननाव, वडिलांचे (किंवा पतीचे) नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नाव लिहिणारे अनेक जण आहेत. कोणत्याही पोलिसी किंवा कायद्याच्या व्यवहारात असे नाव लिहिणेच आवश्यक असते. अच्युत बळवंत कोल्हटकर, दत्तो वामन पोतदार ही तसली उदाहरणे. वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव लिहिले तरी चालते. उदा० किशोर शांताबाई काळे, संजय लीला भन्साळी, वगैरे.
नाव, आईचे आडनाव आणि वडिलांचे आडनाव
संपादनह्या प्रकारचे ठळक उदाहरण म्हणजे, पूर्वी रवींद्र थत्ते असे लिहिणारे प्रसिद्ध मराठीतील साहित्यिक डॉक्टर थत्ते. ते आपले नाव आता रविन मायदेव थत्ते असे लिहितात. यांतले ’मायदेव’ हे रवींद्र थत्ते यांच्या आईचे आडनाव आहे.
नावांच्या सूचीसाठी नाव लिहिण्याची पद्धत
संपादनकोणत्याही नोंदवहीत किंवा अशाच कागदपत्रांत मराठीभाषकांचे नाव लिहिण्याची एकच पद्धत आहे. ती म्हणजे नाव लिहिताना ते आडनांव, स्वतःचे नाव आणि वडिलांचे(किंवा पतीचे) नाव या क्रमानेच लिहिणे. अपवादात्मक परिस्थितीत वडिलांच्या नावाच्या जागी आईचे नाव असू शकते.
नाव लिहिण्याच्या काही खास मराठी पद्धती
संपादन- गावाचे नाव आणि मग व्यक्तिनाव : उदा० गारंबीचा बापू
- व्यक्तिनाव आणि नाते : उदा० कृष्णाबाईचा बाप
- नदीचे नाव आणि व्यक्तिनाव : उदा० पवनाकाठचा धोंडी
- जातीचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव :उदा० मुलाण्याचा बकस
- व्यक्तिनाव आणि नंतर जातीचे नाव : उदा० गोरा कुंभार, नरहरी सोनार इत्यादी.
- मालकाचे नाव आणि नंतर दासीचे नाव : उदा० नामयाची जनी
- व्यक्तिनाव आणि मग मालकाचे नाव : उदा० जनी नामयाची
- वडिलांचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव : उदा० शाहसूनो: शिव(स्य मुद्रा भद्राय राजते)
- स्वतःचे नाव आणि गुरूचे नाव : एकाजनार्नन
नावाऐवजी उपाधी
संपादनअनेकजणांच्या नावाआधी किंवा आडनावाआधी किंवा नंतर, त्यांना जनतेने किंवा जनतेच्या प्रतिनिधींनी दिलेली उपाधीच फक्त येते. उदा० लोकमान्य टिळक, लोकनायक बापुजी अणे, आचार्य अत्रे, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, मास्तर कृष्णराव, मास्टर परशुराम, साने गुरुजी, गोळवलकर गुरुजी, घैसास गुरुजी वगैरे. काही मराठी माणसे फक्त उपाधीनेच ओळखली जातात. उदा० बालकवी, बालगंधर्व, सवाई गंधर्व, आनंद गंधर्व वगैरे.
महाराष्ट्रातील मुसलमानांची आणि ख्रिश्चनांची नावे
संपादनजे मुसलमान मराठी संस्कृतीशी पूर्णपणे समरस झाले आहेत, त्यांची नाव लिहिण्याची पद्धत इतर मराठी भाषकांसारखीच असते. पण काहीजण अब्दुल कासीम शेख हे नाव शेख अब्दुल शेख कासीम शेख असे लिहितात, तर काहीजण अब्दुल मोहंमद कासीम मोहंमद शेख असे लिहितात. कोकणी मुसलमानांचे नाव व वडिलांचे नाव मुसलमानी पद्धतीचे तर आडनाव हिंदू असते. उदा० अब्दुल रहमान अंतुले, दाऊद इब्राहीम कासकर, इ.इ. मराठीभाषक प्रॉटेस्टंट ख्रिश्चनांच्या नावांवरून त्यांचा धर्म ओळखता येत नाही. उदा० (रेव्हरंड) नारायण वामन टिळक, (डॉ.) अनुपमा निरंजन उजगरे, शांत्वनराव लक्ष्मण साळवी, सुमंत धोंडो रामटेके. यांतला एक उपप्रकार वसईच्या ख्रिश्चनांचा. त्यांचे आडनाव ख्रिश्चन पद्धतीचे असले तरी नाव हिंदू असू शकते, किंवा उलट. उदा० विनोद पीटर, डेव्हिड जे. तिवडे.