मनुष्यजातीचा पहिला पूर्वज किंवा पहिला मनुष्य असे ऋगवेदात व अन्य वेदांमध्ये मनूला म्हटले आहे . म्हणूनच मानव, मनुष्य, मनुज असे मनुष्यवाचक शब्द संस्कृत व अन्य भारतीय भाषांमध्ये रूढ आहे.

वैदिक साहित्यात विवस्वत किंवा विवस्वान याचा पुत्र म्हणून वैवस्वत असे मनुचे विशेषण निर्दिष्ट केलेले आढळते. वैदिक साहित्यात मरणशील मनुष्यांमधील पहिला मनुष्य म्हणून हा मनुचा उल्लेख आहे.

यजुर्वैदाच्या शतपथ ब्राम्हणामध्ये मनु-वैवस्वत हा मनुष्यांच्या पहिला राजा आणि त्याचाच सख्खा भाऊ यमवैवस्वत हा मृतांचा म्हणजे पितरांचा पहिला राजा म्हणून वर्णिलेला आहे. (ऋगवेद -८.५२.१ शतपथ ब्राम्हण-१३.४.३) मनू हा यज्ञसंस्थेचा पहिला प्रवर्तक आणि सगळ्या माणसांना प्रकाश मिळावा म्हणून अग्नीची स्थापना करणारा पहिला मनुष्य असे ऋग्वेदामध्ये सांगितले आहे . (ऋग्वेद – १.३६.७६).

पौराणिक कालगणनेप्रमाणे सृष्टीनिर्मितीपासून सृष्टीच्या अंतापर्यंतच्या कालाचे विभाग १४ विभागांना मन्वंतर अशी संज्ञा दिली आहे. एकेका मन्वंतराची कालमर्यादा ४३ लाख २० हजार वर्ष इतकी मानलेली आहे.

१४ मनूंची नावे खालिलप्रमाणे ː

  1. स्वायंभुव
  2. स्वारोचिष
  3. उत्तम
  4. तामस
  5. रैवत
  6. चाक्षुष
  7. वैवस्वत
  8. सावर्णि (अर्क-सावर्णि)
  9. दक्षसावर्णि
  10. ब्रम्हासावर्णि (मेरू सावर्णि
  11. धर्मसावर्णि
  12. रूद्रसावर्णि(ऋतसावर्णि किंवा ऋभु)
  13. रौच्य (देवसावर्णि ऋतधामन)
  14. भौत्य (विश्वकसेन, इंद्रासावर्णि, चंद्रसावर्णि)

हल्लीचे मन्वंतर सातवे असून वैवस्तव मनू या मन्वतराचा अधिपती आहे. याचा उल्लेख भगवदगीतेमध्ये आलेला आहे. भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश प्रथम विविस्वानाला केला. विवस्वानाने स्वतःचा पुत्र मनू यास केला. मनुने आपल्या पुत्र ईक्ष्वाक याला केला, असे तेथे म्हटले आहे.

पृथ्वीवर फार प्राचीन काळी मोठा जलप्रलय झाला आणि त्या जलप्रलयातून कथा जगातील प्राचीन भिन्न भिन्न साहित्यांमध्ये व लोककथांमध्ये निरनिराळ्या फरकांनी ग्रथित केलेली आढळते. ग्रीक आणि रोमन लोककथांमध्ये ही ग्रथित केलेली आहे. बॅबिलोनियाच्या गिलगामेश महाकाव्याचा एक विषय हा जलप्रलय आहे. बायबलमध्ये जलप्रलयातून तारणाऱ्याए मनूप्रमाणेच नोहाचीही कथा विस्ताराने आली आहे. कुराणातही त्याच कथेचा थोडा बदल करून विस्तार केलेला सापडतो.

यजुर्वेदांच्या शतपथ ब्राम्हणामध्ये ही कथा तपशीलवार आली आहे. साऱ्या सृष्टीतील स्थावर-जंगम पदार्थ मोठ्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात उलटे-सुलटे वाहत जाऊ लागले. वैवस्वत मनूने विचार केला, की यांतील काही प्राणी, वनस्पती वगैरे आपण सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले, तर वाचू शकतील. त्याने एका मत्स्याच्या शिंगाला नाव तयार करून बांधली. ती नाव हिमालयाच्या एका शिखरापर्यंत नेऊन त्या शिखरास बांधली. प्रलयाचा लोंढा उतरल्यानंतर मनूने आपली कन्या इला हिच्या ठिकाणी १० पूत्र निर्माण केले व मनुष्यवंश सुरू केला, असे महाभारतात (अनुशासन १४७.२७) म्हटले आहे. हा मस्त्य मनूनेच लहानाचा मोठा करून समुद्रात सोडला होता. तोच या प्रलयाच्या वेळी सृष्टीला तारण्याकरिता मनूच्या उपयोगी पडला.