प्र.ल. मयेकर
प्रभाकर लक्ष्मण मयेकर (४ एप्रिल, इ.स. १९४६ - १८ ऑगस्ट, इ.स. २०१५:दादर, मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाटककार होते. मालवणी बोलीतील त्यांची नाटके प्रसिद्ध झाली.
मयेकर हे मुंबईत बी.ई.एस.टी. कंपनीत नोकरीला होते तेव्हापासून त्यांनी नाट्यलेखन सुरू केले, ते निवृत्तीनंतर रत्नागिरीला स्थायिक झाल्यानंतरही सुरूच राहिले. सत्यकथेत त्यांच्या काही कथा प्रसिद्ध झाल्या त्यांपैकी ’मसीहा’ ही कथा निवडून मयेकरांनी तिचे नाट्यरूपांतर केले व बेस्टच्या कलाविभागाने स्पर्धेत सादर केले. मयेकरांनी १९७० च्या सुमारास हौशी रंगूमीसाठी एकांकिका आणि नाटके लिहायला सुरुवात केली. दहा वर्षांनी त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होऊ लागली.
प्र.ल. मयेकर यांची मा अस साबरीन, अथ मनुस जगन हं, आद्यंत इतिहास असल्या कल्पनारम्य रूपकात्मक नाटके राज्य नाट्य स्पर्धांमध्ये प्रसिद्ध झाली. या नाटकांच्या रचना आणि त्यातील भाषेचा डौल हा त्यांचा स्वतःचा म्हणून ओळखला जातो.
वसंत कानेटकर यांची नाटके करणाऱ्या चंद्रलेखा या मोहन वाघ यांच्या संस्थेने त्यांची नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आणायला सुरुवात केली. पुढे त्यांची मालवणी बोलीतील नाटके मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेने रंगभूमीवर आणली.
कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, रहस्यप्रधान, थरारक अशी सर्वप्रकारची नाटके मयेकरांनी लिहिली. १९८०नंतर व्यावसायिक रंगभूमीला मरगळ आली होती. मुंबईतील गिरणी संप आणि समाजातील अस्थिर वातावरण यामुळे प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईनासे झाले होते. अशा काळात मयेकरांच्या नाटकांनी प्रेक्षक पुन्हा नाटके पहायला लागले.
प्र.ल. मयेकर हे २०१३ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण विभागातून उभे होते, पण त्यांचा पराजय झाला.
लघुपटसंपादन करा
प्र.ल. मयेकरांवर एक 'प्र.ल.' नावाचा एक लघुपट निघाला आहे.
प्र.ल. मयेकर यांनी लिहिलेली नाटकेसंपादन करा
- अग्निपंख (गुजरातीत जुगलबंदी)
- अंत अवशिष्ट
- अथ मनुस जगन हं (प्रायोगिक नाटक, नाट्यस्पर्धेत चमकले)
- अंदमान (प्रायोगिक)
- अरण्यदाह (प्रायोगिक)
- आतंक (प्रायोगिक)
- आद्यंत इतिहास (प्रायोगिक)
- आसू आणि हसू
- कमलीचं काय झालं (प्रायोगिक); (हिंदीत - कहॉं गुम हो गयी कमली?)
- काचघर
- गंध निशिगंधाचा (गुजरातीत अंतरपट)
- गोडीगुलाबी
- तक्षकयाग
- दीपस्तंभ
- पांडगो इलो रे बा इलो
- मा अस साबरीन (प्रायोगिक नाटक, १९८३ साली नाट्यस्पर्धेत बक्षीसपात्र ठरले)
- मिस्टर नामदेव म्हणे
- रण दोघांचे (गुजरातीत प्रेम घिरय्या)
- रमले मी (गुजरातीत राजराणी)
- रातराणी (गुजरातीत रेशमगाठ)
- रानभूल
- सवाल अंधाराचा
- सोनपंखी
एकांकिकासंपादन करा
- अतिथी
- अधुरी गझल
- अनिकेत
- कळसूत्र
- रक्तप्रताप
मयेकर यांचे कथासंग्रहसंपादन करा
- काचघर
- मसीहा
पुरस्कारसंपादन करा
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेचा राम गणेश गडकरी पुरस्कार (२०११)
- आचार्य अत्रे पुरस्कार
- नाट्यदर्पण पुरस्कार
- गोपीनाथ सावकार पुरस्कार
- गो.ब. देवल पुरस्कार
- यू.आर.एल. फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२३-७-२०१४)
- शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने रत्नागिरीला प्र.ल. मयेकर यांच्या नावाने ३ दिवसांचा नाट्य महोत्सव साजरा झाला होता. (जून २०१५)