पुणतांबा

(पुणतांबे या पानावरून पुनर्निर्देशित)

पुणतांबा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले गाव आहे. संत चांगदेव यांची समाधी या गावात आहे. येथे अनेक पुरातन मंदिरे आहेत.[ संदर्भ हवा ]

  ?पुणतांबा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ४५′ ००″ N, ७४° ३८′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या १३,०९८ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 413707
• +०२४२३
• MH-१७ (श्रीरामपूर)

हे गाव शालीवाहन काळात अस्तित्वात होते. पुण्यस्तंभ आणि तांबीलिंदनापूर ही गावे मिळून पुणतांबा अस्तित्वात आले असे मानले जाते.[ संदर्भ हवा ]

प्राचीन इतिहास

संपादन

पुणतांबा गावाच्या पश्चिमेला गोदातीरी चारशे वर्षांपूर्वींचे मंदिर आहे. मंदिरात स्वयंभू देवीमूर्ती आहे. ती देवी नगर जिल्ह्यासमवेतच खानदेशातील भाविकांची कुलदेवता मानली जाते. इसवी सनपूर्व काळात तेथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्या राजाच्या मुलाला जलोदर हा पोटाचा आजार झाला. त्याच्यावर अनेक उपचार करण्यात आले, पण आजार बरा होईना. त्यावर उपाय म्हणून गावाच्या कडेला यज्ञ करून त्यात एका बालकाचा बळी द्यावा, त्यामुळे आजार बरा होईल असे सांगण्यात आले. राजाने यज्ञाची तयारी केली पण बळी देण्यासाठी मुलगा मिळेना, म्हणून मग दवंडी देण्यात आली. तेव्हा शेजारी असलेल्या पुरणगावातील मुद्गल गोऱ्हे नामक मुलगा घरची हलाखीची परिस्थिती ध्यानी घेऊन बळी जाण्यास तयार झाला. धार्मिक विधीनंतर मुलास यज्ञात टाकले जात असताना यज्ञकुंडात देवी प्रकट झाली व देवीने त्या मुलास वरचेवर झेलून सोडून दिले, त्यामुळे त्या देवीचे नाव यज्ञसेनी असे पडले. राजाचा मुलगा आजारातून मुक्त झाला. पुढे यज्ञातून जीवदान मिळालेल्या मुद्गलाने त्याच गावात आश्रय घेतला. त्याला एकशेचाळीस वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्याने देवी मंदिरापासून काही अंतरावर समाधी घेतली. देवी मंदिराशेजारी सुरेख असे मुद्गलेश्वर (मुंजाचे) मंदिर आहे.[ संदर्भ हवा ]

गाव रचना

संपादन
 
पुणतांब्यातील रेल्वे क्रॉसिंग

पुणतांबा गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. १८ व्या शतकातील इंदूर येथील राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांनी नदीकाठी घाट बांधला आहे. जुन्या गावाभोवती दगडी संरक्षण भिंत असून तिची पडझड झालेली आहे. गावात अनेक जुने वाडे आहेत. मनमाड-दौंड लोहमार्ग तसेच शिर्डी लोहमार्ग गावातुन जातात.

 
पुणतांब्यातील होळकर वाडा

अर्थव्यवस्था आणि संस्कृती

संपादन

२००१ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १२४२५ आहे. एकूण लोकसंख्येपैकी ६३६६ पुरुष आणि ६०५९ स्त्रिया आहेत. पुणतांबा ही बाजारपेठ असून दर सोमवारी येथे आठवडी बाजार भरतो. कोपरगावच्या दक्षिण-पूर्वेस १२ मैलावर गाव वसलेलं आहे.गावात मनमाड-दौंड लोहमार्गावरील स्टेशन आहे तसेच शिर्डीला जोडणारा नवीन लोहमार्ग आहे. गावातील बहुतेक रहिवाशांचा शेती हा व्यवसाय आहे. नदी आणि विहिरी हे पाण्याचे मुख्य स्रोत आहेत आणि गावाचे पूर्ण विदयुतीकरण झालेले आहे. गावामध्ये बसस्थानक, पोस्ट ऑफिस, बँका, सहकारी संस्था आणि गोदाम ह्या सुविधा व व्यावसायिक केंद्रे आहेत. तसेच अनेक दवाखाने व एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे. २०० एकर जमीन असलेले शेतकी विदयालय, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा आहेत. व्यायामशाळा, दोन धर्मशाळा, तीन मठ, चर्च, मशिदी आणि दर्गा हे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्रे आहेत.

हिंदू धर्मसंस्था, प्रार्थना व तीर्थक्षेत्र ठिकाणे

संपादन

पुणतांब्यात सोळा मारुती मंदिरे, सहा महादेव मंदिरे, तीन विठ्ठल मंदिरे, दोन दत्त मंदिरे व एक लक्ष्मी-नारायण मंदिर आणि चांगदेव महाराज मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर व शिवराम दुमल यांनी बांधलेले घाट आहेत.

 
चांगदेव मंदिरापासून दिसणारी कोरडी पडलेली गोदावरी नदी

चांगदेव मंदिर

संपादन
 
संत चांगदेव महाराज यांची समाधी

१४०० वर्ष जगलेल्या चांगदेव यांचे मंदिर हे येथील मुख्य मंदिर आहे. दर शंभर वर्षांनी संत चांगदेव वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करीत आणि पुणतांबा हे चौदावे ठिकाण आहे जेथे त्यांनी समाधी घेतली, असे म्हणले जाते. एक आख्यायिका अशी आहे की, संत चांगदेवांना आपल्याकडील असलेल्या शक्तीचा गर्व होता. ते वाघावर आरूढ होऊन व हातात सर्प चाबुक धरून संत ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेले. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांचे गर्वहरण करण्याचे ठरवले. ते आपल्या भावंडासह भिंतीवर बसून चांगदेवांच्या दिशेने मार्गस्थ झाले. हे दृष्य बघून चांगदेवांचे गर्वहरण झाले. त्यांनी त्या भावंडासमोर नतमस्तक होऊन क्षमा मागितली.

 
पुणतांब्यातील एक रस्ता

चांगदेव मंदिर १७ व्या शतकात बांधण्यात आले. मंदिर जरी जुने असले तरी त्याची रचना साधी आहे. मंदिराच्या खालील भागात विठ्ठल - रखुमाई यांच्या पूर्वाभिमुख मूर्ती असून समोर मंडप आहे. त्याचे १० लाकडी खांब आहेत. छतावरती पन्हाळी पत्रे आहेत व ते चारही बाजूंनी उतरते आहेत. चांगदेवांची समाधी याच्या मागील बाजूस आहे. समाधीजवळ चांगदेवांची संगमरवरी मूर्ती व पादुका आहेत. मंदिराभोवती संरक्षक भिंत आहे. समाधीच्या पश्चिमेला गोदावरी नदीचे मोहक दृश्य दिसते. दरवर्षी येथे कार्तिक मासात यात्रा भरते.[ संदर्भ हवा ]

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

संपादन

हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीत दिग्दर्शक रामचंद्र चितळकर यांचा जन्म पुणतांबा येथे झाला होता.

शेतकरी संप

संपादन

२०१७ साली पुणतांब्यामध्ये ऐतिहासिक शेतकरी संप झाला होता. एप्रिल २०१७ मध्ये ग्रामसभेत ठराव पारित करून १ जून २०१७ पासून संपावर जाण्याचे ठरवण्यात आले आणि शहराकडे जाणारा अन्नधान्य, दुध पुरवठा रोखण्याचे ठरले. पेरणी देखील न करण्याचे ठरविण्यात आले. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करणे, पिकाला आणि दुधाला योग्य हमीभाव मिळावा, कर्जमाफी आणि जेष्ठ शेतकऱ्यांना पेंशन इत्यादी प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. संपाचे रूपांतर नंतर राज्यव्यापी आंदोलनात झाले होते. शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी जाहीर केली.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

संपादन

पुणतांबा गावामधील यात्रा माहिती व्हिडिओ येथे उपलढ आहे

तसेच फेसबुक वारा हा आहे


https://www.facebook.com/profile.php?id=100029735630310&mibextid=eHce3h