पहिले इंग्रज-मैसूर युद्ध

पहिले इंग्रज-मैसूर युद्ध (मराठी नामभेद: पहिले ब्रिटिश-मैसूर युद्ध ; इंग्रजी: First Anglo-Mysore War, फर्स्ट ॲंग्लो-मायसोर वॉर) हे म्हैसूरच्या राज्याचा शासक हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये इ.स. १७६७ ते इ.स. १७६९ या कालखंडात घडलेले युद्ध होते. उत्तरी सरकारांवर वर्चस्व वाढवण्याचे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हैदराबादचा निजाम दुसरा आसफजाह अली खान याच्या चिथावणीमुळे या युद्धाची ठिणगी पडली. इ.स. १७६९ साली दोन्ही पक्षांनी मद्रासचा तह करून हे युद्ध थांबवले.

पहिल्या व दुसऱ्या इंग्रज-मैसूर युद्धांची व्याप्ती दर्शवणारा आधुनिक नकाशा

पार्श्वभूमी

संपादन

मैसूरच्या राजाच्या घोडदळाचा एक वरिष्ठ अधिकारी या नात्याने हैदरअलीने फ्रेंचांशी सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धात त्याने फ्रेंचांना ब्रिटिशांविरूद्ध सहकार्य केले होते. इ.स. १७६१ मध्ये हैदरअली म्हैसूरचा लष्करी हुकूमशहा झाला[] आणि त्याच्या दरबारात फ्रेंचांचा प्रभाव वाढू लागला. हैदरअलीने ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली असलेल्या महंमदअलीच्या भावाला आश्रय देऊन ब्रिटिशांचा आणखी राग ओढवून घेतला. इ.स. १७६६च्या आरंभी हैदरअलीने मलबारवर आक्रमण केल्याने त्याच्या महत्त्वाकांक्षेची ब्रिटिशांना कल्पना आली. हैदरअलीच्या वाढत्या शक्तीने हैदराबादचा निजाम आणि मराठ्यांनाही भीती वाटू लागली होती. इ.स. १७६३ च्या सप्टेंबरमध्ये मराठ्यांनी निजामाला राक्षसभुवनच्या लढाईत पराभूत केले व त्यानंतर निजाम व मराठे यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर १२ नोव्हेंबर, १७६६ रोजी ब्रिटिशांनी निजामाशी एक करार केल्याने हैदरअलीविरूद्धच्या भावी संघर्षात निजामाच्या सहकार्याची वातावरणनिर्मिती झाली. पेशवा माधवरावाचेही निजामाशी सख्य असल्याने हैदरअलीने मराठ्यांशी तह केला व निजामाला ब्रिटिशांच्या गोटातून फोडले. ब्रिटिशांना हे वृत्त कळेपर्यंत निजाम व हैदरअलीच्या संयुक्त फौजांनी इ.स. १७६७ च्या सुरुवातीला कर्नाटकात स्वारी करून कावेरीपट्टणमला वेढा दिला आणि पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची नांदी झाली.

युद्धातील घटना

संपादन

हैदरअलीने कावेरीपट्टणमला वेढा दिला त्यावेळी मद्रास येथे असलेला ब्रिटिशांचा वरिष्ठ अधिकारी कर्नल स्मिथ याच्याजवळ फारच थोडी फौज होती त्यामुळे कावेरीपट्टणमच्या मदतीला जाण्याऐवजी तो त्रिचनापल्लीहून येणाऱ्या वूडच्या फौजेला त्रिनोम्मली येथे जाऊन मिळण्यास निघाला. हैदरअलीला ही खबर मिळताच त्याने चंगमा येथे स्मिथच्या फौजेला अडविले. तेथे अटीतटीच्या झालेल्या युद्धात हैदरअली व निजामाच्या संयुक्त फौजेचा पराभव झाला. त्याननंतर स्मिथ आणि वूडच्या सेना त्रिनोम्मली येथे एकत्र आल्या व त्यांनी २६ सप्टेंबर, इ.स. १७६७ रोजी हैदरअली व निजामाच्या फौजांचा परत एकदा दारुण पराभव केला. मुसळधार पासामुळे हैदरअलीला युद्धभूमीवरून मताघार घ्यावरी लागली. ब्रिटिशांनीही त्यांच्या फौजा मागे घेतल्या. यानंतर फेब्रुवारी, इ.स. १७६८ साली ब्रिटिशांनी निजामाला परत आपल्या गोटात ओढले. नंतर मार्च १७६९ मध्ये हैदरअली मद्रासजवळ आला व तेथील ब्रिटिश फौजेला त्याने युद्धाचे आवाहन दिले. हैदरअलीच्या अचानक हल्ल्याने ब्रिटिश भयभीत झाले आणि त्यांनी हैदरअलीशी सामना करण्याऐवजी त्याच्यापुढे तहाचा प्रस्ताव ठेवला[]. ३ एप्रिल, इ.स. १७६९ रोजी झालेल्या या मद्रासच्या तहामुळे पहिले इंग्रज-मैसूर युद्ध संपुष्टात आले.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ घोलम, मोहम्मद. द हिस्ट्री ऑफ हैदर शाह अलाइस हैदरअली खान बहादुर (इंग्रजी भाषेत). १० फेब्रुवारी, २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ ब्राऊन, चार्ल्स फिलीप. मेमरीज ऑफ हैदर अँड टिपू, रूलर्स ऑफ श्रीरंगपट्टम (इंग्रजी भाषेत). १० फेब्रुवारी, २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)