नायाग्रा धबधबा

(नायगारा धबधबा या पानावरून पुनर्निर्देशित)

नायगारा धबधबा हा जगातील सर्वांत मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा अमेरिकेतील नायगारा नदीवर असून अमेरिका आणि कॅनडा ह्या देशांच्या सरहद्दीवर आहे. न्यू जर्सीपासून नायगारा साधारण ४०० मैल दूर असून अमेरिकेतील बफेलो या शहराच्या जवळ आहे. ज्यात प्रत्येक मिनिटाला ४० लाख घनफूट पाणी पडते. पडणाऱ्या पाण्याच्या घनतेनुसार नायाग्रा जगातील सर्वांत मोठा धबधबा आहे.

नायगारा धबधबा

गोट आयलंडने या धबधब्याचे २ मोठे भाग केले आहेत. हॉर्स शू फॉल्स आणि अमेरिकन फॉल्स. हॉर्स शू फॉल्स हा कॅनडाच्या सीमेला लागून असून त्यानंतर अमेरिकन प्रदेश चालू होतो आणि नंतर दुसरा म्हणजे अमेरिकन फॉल्स. हिमयुगामध्ये झालेल्या विविध भौगोलिक हालचालींमध्ये, या परिसरातील प्रस्तर एकावर एक चढल्याने हा प्रदेश तयार झाला असून त्यामुळे नायगारा नदीला इतका मोठा धबधबा प्राप्त झाला आहे. साधारणपणे १०००० वर्षांपूर्वी नायगारा धबधबा आणि अमेरिकेतील ग्रेट लेक्स तयार झाले आणि हा मोठा पाण्याचा प्रवाह तयार झाला.

अतीव सौंदर्य आणि आणि प्रचंड वीजनिर्मिती या दोनही कारणांसाठी हा धबधबा प्रसिद्ध असून दर वर्षी कोट्यवधी पर्यटक केवळ हा धबधबा पाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांत येतात. १९८० सालानंतर कॅनडा सरकारने नायगारा आणि पर्यटन यांच्यावर खूप विचार करून कॅनडाच्या बाजूला अनेक चांगली हॉटेल्स आणि पर्यटकांना आवडेल अशा अनेक गोष्टी केल्या. येथे दोन्ही देश जोडणारा एक मोठा पूल असून पूर्वी हा धबधबा अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही बाजूंनी एकाच व्हिसा वर पाहता यायचा. पण ७/११ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व प्रकार बंद झाले आणि आता दोन्ही देशांचा व्हिसा असल्याशिवाय दोन्ही बाजूंनी हा पाहता येत नाही. हॉर्स शू फॉल्सची उंची १७३ फूट असून तो २६०० फूट लांब आहे. तर अमेरिकन फॉल्स ८० ते १०० फूट उंच असून त्याची लांबी १०६० फूट आहे. या धबधब्यातून १८७ मेगावॉट एवढी वीजनिर्मिती होते. या धबधब्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात झीज होते. ती टाळण्यासाठी १९६९ मध्ये अमेरिकन फॉल्स काही काळासाठी पूर्ण बंद करण्यात आला होता !!! जास्तीचे पाणी तेव्हा हॉर्स शू फॉल्समधून सोडण्यात आले होते. जमिनीखालचे पाण्याचे प्रवाह काळजीपूर्वक बंद करून जमिनीची झीज होणार नाही याची काळजी घेतली गेली. यासाठी एक छोटेसे तात्पुरते धरण अमेरिकन फॉल्सच्या अलीकडे बांधण्यात आले होते. त्याचे तेव्हाचे फोटो त्यांनी जतन करून ठेवले आहेत. सर्व डागडुजी करून झाल्यावर बॉम्बने हे धरण उडवून देण्यात आले आणि परत अमेरिकन फॉल्सचा जलप्रवाह सुरू झाला.

मेड ऑफ द मिस्ट टूर

संपादन

१८४८ साली सुरू झालेली या नावाची ही बोट आजही आपल्याला 'नायगाराची सफर घडवते. धबधब्याचे पाणी पडल्यावर खालच्या नदीतल्या पाण्यामध्ये सफर करायची बोट म्हणजे 'मेड ऑफ द मिस्ट टूर' (Maid of the mist Tour). तिकीट काढायचे आणि निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवायचा आणि 'मेड ऑफ द मिस्ट टूर'च्या बोटीत डेकवर जाऊन उभे राहायचे. ही बोट आपल्याला दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून चक्कर मारून आणते. दोन्ही धबधब्यांच्या फेसाळणाऱ्या प्रवाहाचे उडणारे पाणी अंगावर घेत या बोटीतून फिरायचे. पाण्याचे तुषार इतके जोरात अंगावर येत असतात की आपण त्यात चिंब भिजूनच जातो. त्यामुळे धबधब्याच्या जवळून फोटो काढणे हे जरा अवघडच जाते. दोन्ही धबधब्यांच्या अगदी जवळून जाता येत असल्याने फार मजा येते.

केव्ह ऑफ द विंड्स

संपादन

केव्ह ऑफ द विंड्स येथूनही निळ्या किंवा पिवळ्या रंगाचा रेनकोट अंगावर चढवून नायगारा धबधबा अगदी जवळून न्याहाळता येतो.

नायगारावरती एक छान फिल्म ही आयनॉक्स थियेटर येथे दाखवण्यात येते. नायगारा धबधब्याच्या अनेक रंजक कथा आहेत. अनेक जणांनी या धबधब्यात उडी मारून खाली जिवंत राहण्याचा पराक्रम केला आहे. याची सुरुवात १८२९ साली झाली. १९०१ साली ६३ वर्षीय एनी एड्सन या एका शाळेच्या शिक्षिकेने पहिल्यांदा ड्रममधून या धबधब्यात उडी मारायचा पराक्रम केला. तिला यात खूप त्रास झाला पण फारशी इजा झाली नाही. तिच्यानंतर एकूण १४ जणांनी असे उपद्व्याप केले.

नायगारा धबधबा पहायची खरी मजा आहे रात्री. आणि ती कॅनडाच्या बाजूने. हॉर्स शू फॉल्स मधून पडणाऱ्या पाण्यावर कॅनडाच्या बाजूने प्रकाशाचे झोत सोडलेले आहेत आणि नायगारा धबधब्यावर सोडलेले लाईट त्या बाजूनेच चांगले दिसतात, अमेरिकेच्या बाजूने एवढे छान दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्याचा पडणारा आवाज आणि वेगवेगळ्या रंगात दिसणार पाणी पाहताना नजर तेथून ढळत नाही. कितीही वेळ तिथे थांबलात तरी तिथून निघावेसे वाटत नाही. दर मिनिटाला पाण्याचे बदलणारे रंग आणि वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघालेला नायगारा धबधबा हे खरोखर जगातील एक आश्चर्यच आहे. एका सर्वेक्षणानुसार या वर्षी एकूण २ कोटी ८० लाख लोक नायागाराचे दर्शन घेण्यासाठी अख्या जगातून येतील असा अंदाज आहे.


पर्यटन स्थळे

संपादन

बाह्य दुवे

संपादन

जगातील धबधबे Archived 2011-07-12 at the Wayback Machine.

नायगारा फॉल्स अमेरिकन अधिकृत संकेतस्थळ

नायगारा फॉल्स कॅनेडियन अधिकृत संकेतस्थळ