दलित पँथर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे इ.स. १९७२ साली उदयास आली. सामाजिक विचारांचे प्रबोधन हा संघटनेचा गाभा आहे. दलित पॅंथर 'लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, विज्ञानी व एकजिनसी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत आहे. प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना म्हणून समाजात ओळखली जाते. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या निधनाने रिक्त झालेल्या दलित पॅंथरच्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
संपादनडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मरणोत्तर काळात दलित चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करणारी जहाल युवक चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळातील दलितांच्या प्रश्नांवर सतत संघर्ष करणारी संघटना म्हणजे दलित पॅंथर होय. अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॅक पॅंथर या संघटनेचा प्रभाव दलित पॅंथरवर होता. १९६६ साली ह्यू.पी. न्यूटन आणि बॉबी जी. सील या कृष्णवर्णीय तरुणांनी ब्लॅक पॅंथरची स्थापना कॅलिफोर्निया मधील ऑकलॅंड येथे केली. दरम्यानच्या काळात त्यावर अनेक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांतून (अस्मितादर्श, टाईम आणि अन्य समकाल्रीन साप्ताहिके) येत असत. सिद्धार्थ विहार मधील विद्यार्थ्यांमधे ब्लॅक पॅंथर या संघटनेविषयी उत्सुकतेपोटी चर्चा होत असे. वास्तविक अशा प्रकारच्या संघटनेने आपले नेतृत्व करावे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.
उदय
संपादनदलित पंथरची निर्मिती का झाली इ.स. १९७० च्या आसपास मागासवर्गीय जातींवरील अत्याचारांनी कळस गाठला. पेरुमल समितीने त्याचा स्पष्ट निर्देश केला. हे प्रकरण (मागासवर्गीय जातींवरील अत्याचार) इतके गंभीर बनले की २४ मे १९७२ला मधु लिमयेंनी लोकसभेत त्याविरूद्ध आवाज उठविला.[१] या सगळ्यांचा परिणाम म्हणून दलित समाजातील संतप्त युवकांनी बंडखोरी केली[२] आणि पॅंथरची पहिली बैठक सिद्धार्थ नगर (मुंबई) येथे ९ जुलै १९७२ रोजी भरली. बैठकीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दलितांवरील वाढत्या अत्याचारास थांबविण्यास सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी सर्व दलित युवकांनी चळवळीच्या झेंड्याखाली एकत्र जमावे, असे आवाहन झाले. "माणूस म्हणून जगणे हा आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही चित्याचा पवित्रा घेऊन त्या हक्कांसाठी लढू" हे सूचित करणार नामाभिधान त्यांनी स्वीकारले.[३] १५ ऑगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा "काळा स्वातंत्र्यदिन" हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडली व दलित पॅंथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पॅंथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पॅंथरमधे प्रवेश केला. प्रत्येकाला पॅंथरही आपल्या मनातील असंतोषाचे व्यासपीठ वाटत होती. सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाऱ्या तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पॅंथर चळवळीकडे पाहिले गेले.
पॅंथरने आपल्या जाहीर केलेल्या भूमिकेत म्हणले आहे :
- दलितांचा मुक्तिलढा सर्वंकष क्रांती इच्छितो. भागश: बदल आम्हाला नको... आम्हाला आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत वरिष्ठ स्थानांवर आमचे प्रभुत्व स्थापन करावे लागेल. आता आम्ही अल्पसंतुष्ट राहणार नाही. आम्हाला ब्राह्मण आळीत जागा नको. आम्हाला साऱ्या देशाचे राज्य पाहिजे. आमचे लक्ष्य केवळ व्यक्ती नसून व्यवस्था आहे. हृदयपरिवर्तनाने, शिक्षणातील उदारमतवादाने आमच्यावरील अन्याय, आमचे शोषण थांबणार नाही. आम्ही क्रांतिकारक समूह जागे करू, संघटित करू. या प्रचंड समूहांतील संघर्षामधून क्रांतीची लाट येईल. सनदशीर अर्ज, विनंत्या, सवलतीच्या मागण्या, निवडणुका, सत्याग्रह यामधून समाज बदलणार नाही. आमच्या समाजक्रांतीच्या कल्पना व बंड या कागदी जहाजाला पेलणार नाही. त्या मातीत रुजतील, मनात फुलतील, पोलादी वहानातून सणसणत अस्तित्वात येतील -
दलित पॅंथर या चळवळीचे लढाऊ आणि आक्रमक रूप वरळी दंगलीमुळे लोकांच्या पुढे आले.
संरचना
संपादनपॅंथरच्या संरचनेत छावणी हा प्रमुख घटक आहे. राष्ट्रीय अध्यक्षाकडून सर्व सुसूत्रीकरण होते. सर्व पदांची नियुक्ति ही निवडणुकीच्या माध्यमातून केली जाते.
नेतृत्व
संपादनदलित पॅंथरची चळवळ ही आधीच्या दलित चळवळीपेक्षा वेगळी होती. एकूणच या चळवळीच नेतृत्व युवक आणि विद्यार्थ्यांकडे असल्याकारणाने पॅंथरची वाटचाल जबरदस्त वेगाने झाली. पॅंथर मधील नेते हे उच्च साहित्यिक असल्यामुळे पॅंथरने आंबेडकरी चळवळ व साहित्याला नवसंजीवनी दिली.
दलित पॅंथरचे कार्य
संपादन१) दलित पॅंथरने दलितावरील अत्याचाराच्या विरोधात आंदोलने केले.
२) झोपडपट्टयांचा विस्तार व विकास घडवून आणला असून झोपडपट्टयांमधील रहिवाशांचे प्रश्न सोडविले.
३) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर लढे दिले.
४) मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलने केले.
५) राखीव जागांच्या प्रश्नावर आंदोलन केले.
६) नवबौद्धांना सवलतीची मागणी केली.
७) बेरोजगारी दूर करण्यासाठी आंदोलने केली.
[४]
दलित पॅंथरने इत्यादी प्रश्नांवर आंदोलने उभारून अनेक प्रश्न धसास लावले. शासनावर दबाव निर्माण केला. पॅंथरच्या या कार्यामुळे दलितांवर अन्याय
फूट
संपादनपॅंथर संघटनेचे नेते नामदेव ढसाळ कम्युनिस्टवादी व राजा ढाले हे आंबेडकरवादी असा वाद पुढे आला.४६ १९७४ साली नामदेव ढसाळ यांनी नागपूर येथे दलित पॅंथरचे अधिवेशन भरविले व स्वतःचा गट वेगळा केला; तर १९७६ साली राजा ढाले यांच्या गटातून भाई संगारे व अविनाश महातेकर बाहेर पडले; त्यांनी संगारे, महातेकर गट निर्माण केला. दि. ७ मार्च १९७७ला राजा ढाले यांनी नाशिक येथे आपल्या गटाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन तेथे पॅंथर बरखास्तीचा निर्णय घेतला. व ‘मासमुव्हमेंट' या संघटनेची स्थापना केली. ढाले गटाच्या या कृतीचा निषेध करून अरुण कांबळे,मनोहर अंकुश, रामदाम आठवले, दयानंद म्हस्के, ज. वि. पवार, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगांवकर इत्यादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन दि. २८ एप्रिल १९७७ला औरंगाबाद येथे भारतीय दलित पॅंथरची निर्मिती करून आपले कार्य चालू ठेवले.[५]
आंदोलने
संपादन- वरळी दंगलीत जशास तशे उत्तर
- इंदापूरच्या बावड्यातील दलित बहिष्कार विरोधी आंदोलन
- अत्याचार निषेधार्थ केलेले गीतादहन आंदोलन
- इ.स. १९७३ कोल्हापूरला शंकराचार्य मिरवणूकीवर चप्पलफेक आंदोलन
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॅंपीटेशन फि विरोधी आंदोलन.
- चौधरी चरणसिंग यांच्या विरोधात संघर्ष व आंदोलन.
पॅंथर चळवळीतील भागवत जाधव यांच्या डोक्यावर भोईवाड्यातील मोर्चादरम्यान एका इमारतीतून दगडी पाटा फेकल्याने त्यांचा मृत्यू झाला. वरीळी दंगलीसाठी नेमलेल्या भस्मे आयोगातील काही शिफारशी स्विकारल्यानंतर पॅंथरचा दरारा वाढला. पॅंथरच्या गुजरात दिल्ली पंजाब व लंडन येथेही शाखा स्थापन झाल्या.
पॅंथरचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशीत साहित्य प्रकाशित करण्यास सरकारला भाग पाडले. पॅंथरच्या रेट्यामुळे बाबासाहेबांचे २४ खंड, मूकनायक बहिष्कृत भारत हे साहित्य प्रकाशित झाले.
महत्त्वाच्या घटना
संपादनवरळी दंगल
संपादनबाह्य दुवे
संपादनग्रंथ
संपादन- दलित पॅंथर चळवळ - डॉ.लता मुरुगकर
- दलित पॅंथर - संपादन शरणकुमार लिंबाळे
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ 'ए लोकसभा स्पीच ' जनता मधील संपादकीय, संपादक - एन्.जी.गोरे, XXVII क्रं.२०, ४ जून १९७२
- ^ १९ जून १९७२ नवाकाळ
- ^ हायकोर्टाने वरळी आणि बी.डी.डी.चाळ, नायगाव दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या कमिशन पुढे श्री.ज.वी.पवार यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.(पा.८)
- ^ मुरुगकर, लता (१५ ऑगस्ट १९९५). दलित पॅंथर चळवळ. पुणे: सुगावा प्रकाशन. pp. १६१ ते १७४.
- ^ मुरुगकर, लता (१५ ऑगस्ट १९९५). दलित पॅंथर चळवळ. पुणे: सुगावा प्रकाशन. pp. ९३.