पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर
डॉ. पांडुरंग सखाराम शेणवी - पिसुर्लेकर (३० मे, १८९४; (पिसुर्ले) - १० जुलै, १९६९; पणजी) हे गोवेकर इतिहास संशोधक व मराठी-कोंकणी लेखक होते. मराठा साम्राज्य व भारतातील पोर्तुगीज वसाहतींच्या परस्परसंबंधांवर त्यांनी लिहिलेला "पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास" हा ऐतिहासिक ग्रंथ मराठ्यांच्या इतिहास-साधनांमध्ये महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
पांडुरंग पिसुर्लेकर | |
---|---|
जन्म नाव | पांडुरंग सखाराम शेणवी - पिसुर्लेकर |
जन्म |
३० मे, १८९४ पिसुर्ले, गोवा |
मृत्यू |
१० जुलै, १९६९ (वय ७५) पणजी, गोवा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहास |
भाषा | कोकणी, मराठी, पोर्तुगीज, इंग्रजी |
साहित्य प्रकार | इतिहास |
विषय | पोर्तुगीज इतिहास,मराठा इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती | पोर्तुगीज मराठे संबंध: अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास |
प्रभाव | विश्वनाथ काशीनाथ राजवाडे[१] |
वडील | सखाराम पिसुर्लेकर |
आई | कृष्णाबाई पिसुर्लेकर |
पत्नी | रमाबाई बोरकर (माहेरचे नाव) |
अपत्ये | लीलावती |
पुरस्कार | नाइट ऑफ द मिलिटरी ऑर्डर ऑफ सॅंटिएगो, पोर्तुगाल |
जीवन
संपादनपांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म ३० मे १८९४ रोजी गोव्यातल्या सत्तरी तालुक्यातल्या पिसुर्ले या गावी झाला. त्यांचे वडील एका गावाचे वतनदार कुलकर्णी होते, तरी ते सरकारी नोकरी करत होते. पांडुरंग पिसुर्लेकरांचे शिक्षण पोर्तुगीज भाषेत झाले. त्यांचे उच्च व माध्यमिक शिक्षण गोव्यातील 'साखळी' (Sanquelim) येथे झाले. सामान्य शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. दोन वर्षे त्यांनी पोर्तुगीज भाषेचे शिक्षण घेतले. त्यांना शिक्षकी पेशाची आवड असल्यामुळे त्यांनी पोर्तुगीज शाळेत प्राथमिक शिक्षकाची नोकरी पत्करली.[२]
इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांच्यामुळे पिसुर्लेकरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. संशोधनासाठी विश्वनाथ काशीनाथ राजवाडे एकदा गोव्यात आले होते. पिसुर्लेकारांनी त्यांना पाहिले, त्यांचे संशोधन कार्य पाहिले व त्याचा ठसा त्यांच्या मनावर उठला. राजवाडेंपासून त्यांनी प्रेरणा घेतली व ते इतिहाससंशोधनाच्या क्षेत्रात उतरले.[१]
पिसुर्लेकरांना संशोधनाची कितीही इच्छा असली तरी पोर्तुगीज दफ्तरखान्यात प्रवेश मिळणे अतिशय कठीण होते. त्यांनी अनेक विनंत्या सरकारला केल्या, परंतु नकारच मिळत होता. अखेर, मोठ्या मिनतवारीने त्यांना १९२४मध्ये विनावेतन दफ्तरात काम करण्याची परवानगी मिळाली व त्यांनी ते मान्य केले. पोर्तुगीज सरकारच्या या दफ्तरखान्यात पोर्तीगीज, डच, फारसी, कन्नड, तमिळ, मराठी, बंगाली इत्यादी भाषांतील कागदपत्रांचे ढीग होते. पण त्यांची कोणतीही व्यवस्था नव्हती. या कागदपत्रांची योग्य मांडणी करण्यासाठी ज्या भाषेत ती कागदपत्रे आहेत त्या भाषा शिकणे आवश्यक होते, म्हणून पिसुर्लेकरांनी उर्दू व कन्नड भाषा व मोडी लिपीचे शिक्षण घेतले. अनेक खराब कागदपत्रांच्या स्वतःच्या हाताने नकला उतरवून घेतल्या. अहोरात्र खपून त्यांनी या दप्तराची सूची तयार केली, व ती 'गोवा अर्काइव्हज् मार्गदर्शक' नावाने पोर्तुगीज भाषेत प्रकाशित केली.[३]
पोर्तुगीज सरकारने पिसुर्लेकरांनी वर्षभर बिनपगारी केलेले काम पाहून त्यांना १९२५पासून तीस रुपयांचे वेतन सुरू केले. त्यानंतरही पिसुर्लेकरांचे काम चालूच होते व पोर्तुगीज सरकारदेखील त्यांच्या कामांची नोंद घेत होते. अखेर १९३० साली सरकारने त्यांना दफ्तरखान्याचे प्रमुख केले. तसेच सरकारने त्यांना अधिक संशोधनासाठी लिस्बन व पॅरिसला पाठवले.[४]
कोकणी, मराठी, पोर्तुगीज, इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच इत्यादी भाषांचे जाणकार असलेल्या पिसुर्लेकरांनी पोर्तुगीज दप्तरांतील कागदपत्रांवरून इतिहास संशोधन केले व ते शोधनिबंध, पुस्तके इत्यादी प्रकारे प्रकाशित केले.
पुस्तके
संपादनत्यांचे पुढील ग्रंथ महत्त्वाचे आहेत :
- अ आन्तिगिदादि दु क्रिश्नाईज्मु
- अ आन्तीग् ईन्दिय् ई ऊ मून्दु इश्तेर्नु (१९२२)
- आजॅन्तिश् दा दिप्लोमासीय पुर्तुगेझना ईन्दिय् (१९५२)
- आश्पॅक्तुश् दा सिव्हिलिझासांव् दा ईन्दिय् आन्तीग् (१९२४)
- आस्सेन्तुश् दु कोंसेल्यु दु इश्तादु दा ईन्दिय् (१९५३-५७)
- पुर्तुगेझिश् ई मारातश् (१९२६-३९)
- पोर्तुगीज मराठे संबंध : अर्थात पोर्तुगीजांचा दप्तरातील मराठ्यांचा इतिहास (मराठी)
- रेजिमॅन्तुश् दश् फोर्तालेझस् दा ईन्दिय् (१९५१)
यांखेरीज त्यांनी अनेक पोर्तुगीज कागदपत्रे प्रसिद्ध केली. अ आन्तिगिदादि दु क्रिश्नाईज्मु या पुस्तकाद्वारे कृष्णसंप्रदाय हा इसवी सनापूर्वीपासून अस्तित्वात होता, हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
याशिवाय पिसुर्लेकर यांच्या १२५ वी जयंती व ५० वी पुण्यतिथी चे निमित्ताने २०१९ मध्ये "डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर स्मारक ग्रंथ" (Dr. Pandurang Pisurlencar Commemoration Book) प्रसिद्ध करण्यात आला आहे.[५]
गौरव व मानसन्मान
संपादन- पिसुर्लेकरांच्या इतिहास संशोधनाबद्दल लिस्बन विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी देऊन गौरवले.
- १९४७मध्ये बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटी या संस्थेने जदुनाथ सरकार सुवर्णपदक देऊन गौरव केला.
- १९५३मध्ये मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने कॅम्बेल मेमोरियल सुवर्णपदक दिले.
- पोर्तुगीज सरकारने नाईट ऑफ दि मिलिटरी, ऑर्डर ऑफ एस. आयगो ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्ट्स, 'शेव्हेलियर' हे उच्च किताब दिले.
- १९२३मध्ये पॅरिसच्या पौरस्त्य सोसायटीने त्यांना सदस्यत्व दिले.
- १९२६मध्ये पणजीच्या 'इन्स्टिट्यूट वास्को दि गामा' या सरकारी संस्थेचे सभासद झाले.[६]
निधन
संपादन१० जुलै १९६९ रोजी पणजी येथे कर्करोगामुळे पिसुर्लेकरांचे निधन झाले.
संदर्भ
संपादनसंदर्भसूची
संपादन- पुराणिक, शरदचंद्र. ऋषितर्पण.