झीरो ए.डी. हा एक विनामूल्य, मुक्त-स्रोत, अनेक प्लॅटफॉर्म असलेला वास्तव-काल डावपेच प्रकारचा संगणकीय खेळ आहे. हा खेळ सध्या विकसनशील अवस्थेत आहे व वाइल्डफायर गेम्स हे त्याचे विकासक आहेत. हा ऐतिहासिक युद्धे व प्राचीन अर्थव्यवस्था यांवरील खेळ असून यात ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन ५०० या काळावर लक्ष केंद्रित केले आहे[१]. हा खेळ मायक्रोसॉफ्ट विंडोज, मॅक ओएस एक्सलिनक्स यावर खेळता येतो.[२] हा खेळ विनामूल्य व मुक्त-स्रोत असून खेळाच्या इंजिनासाठी जीपीएल २+ हा परवाना तर खेळातील दृश्य व चित्रे यासाठी सीसी-बीवाय-एसए हा परवाना वापरण्यात आला आहे. मायक्रोसॉफ्टने बनवलेल्या एज ऑफ एम्पायर्स खेळापासून स्फुरण घेऊन इ.स. २००० सालापासून झीरो ए.डी. विकसित होत आहे व त्याचे प्रत्यक्ष काम २००३ सालापासून सुरू झाले आहे. संपूर्ण आवृत्तीसाठी कोणतीही अधिकृत तारीख ठरलेली नाही.[३]

झीरो ए.डी.

विकासक वाइल्डफायर गेम्स
प्रकाशक वाइल्डफायर गेम्स
रचनाकार ओम्री लाहाव
इंजिन पायरोजेनेसिस
प्लॅटफॉर्म विंडोज, लिनक्स, मॅक ओएस एक्स
पूर्वावलोकन आवृत्ती अल्फा २२ व्हीनस्टास / नोव्हेंबर ८, २०१६
प्रकार वास्तव-काल डावपेच
खेळण्याचे प्रकार एक-खेळाडू, अनेक-खेळाडू
माध्यमे/वितरण उतरवणे

खेळ खेळताना संपादन

 
एका कार्थेजियन गावाची झलक

झीरो ए.डी. मध्ये वास्तव - काल डावपेच प्रकारातील खेळांचे तळ उभारणे, सैन्य प्रशिक्षित करणे, लढाई व तंत्रज्ञान शोध हे घटक आहेत. हा खेळ आर्थिक विकास व लढाया यांच्याशी संबंधित आहे. या खेळात प्रत्येक संस्क्रुतीसाठी विशिष्ट इमारती, सैनिक, नौका व युद्धनौका इत्यादी आहेत.

अनेक-खेळाडू एकाचवेळी खेळण्याची सुविधाही या खेळात उपलब्ध असून त्यामध्ये केंद्रीय सर्व्हरविरहित असलेले आंतरजाल वापरले जाते.

संस्कृत्या संपादन

 
खेळामधील द्वीपसमूहातील एका बेटाची झलक

झीरो ए.डी. खेळाडूला अकरा प्राचीन संस्कृत्यांपैकी कोणतीही संस्कृती निवडण्याची मुभा देते. पुढच्या आवृत्त्यांमध्ये विकासकांनी जर्मेनिक, व्हॅन्डाल, हूण, डॅसियन, सर्मॅशियन, नंतरचे रोमन प्रजासत्ताक, रोमन साम्राज्य, बायझेंटाईन साम्राज्य, सॅक्सन, पार्थियन साम्राज्य, गॉथ या संस्कृत्या उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.[४]

प्राचीन कार्थेज संपादन

कार्थेजकडे खेळातील सर्वांत शक्तिशाली नौदल व सर्वांत चांगला व्यापार आहे. त्यांच्या सैन्यदलात लढाऊ हत्ती वा कार्थेजचा पवित्र वाद्यवृंद यांचा समावेश होतो. त्यांच्या रक्षक भिंती या सर्वांत शक्तिशाली असतात. मात्र त्यांच्या प्रशिक्षित सैन्यदलात लिबियन, न्युमिडियन, आयबेरियन व ग्रीक या महाग भाडोत्री सैनिकांचा समावेश होतो. कार्थेजची भव्य वास्तू ही "बाल अम्मोन"चे देऊळ आहे.

सेल्टिक संस्कृती संपादन

झीरो ए.डी.मधील ब्रिटन्स व गॉल्स या दोन सेल्टिक तुकड्या या जवळच्या अंतरावरील लढाईत प्रवीण असून ते शिकारी करण्यामध्ये उत्तम आहेत. सेल्टिक लोक प्राचीन काळी धनुष्यबाणाचा वापर कमी करत असल्याने सेल्टिक तुकड्या या धनुर्धर प्रशिक्षित करू शकत नाहीत. ते मुख्यतः दगडी इमारती न बांधता लाकडी इमारती बांधू शकतात. त्यांच्या लाकडी इमारती या लवकर बांधता येतात तसेच त्या स्वस्तही असतात, पण दगडी इमारतींइतक्या मजबूत नसल्याने त्या लवकर नष्ट करता येतात.

ब्रिटन्स संपादन

ब्रिटन्स हे लढाईसाठी रथ व लढाऊ कुत्रे वापरू शकतात तसेच क्रॅनग नावाची लाकडी घरे बांधू शकतात. ते लांब तलवारी चालवणारे पायदळ व जवळच्या संतराच्या लढाईत निपुण असलेले सैन्यदल प्रशिक्षित करू शकतात.

गॉल्स संपादन

गॉल्सकडे पहिली फिरती पीठ गिरणी असल्याने त्यांना शेतीतून जास्त उत्पन्न मिळते. तसेच त्यांच्याकडे शक्तिशाली चिलखती घोडदळ व पायदळ आहे.

प्राचीन ग्रीक संपादन

झीरो ए.डी. मधील अथेन्स, मॅसिडोन्स व स्पार्टन्स या तीन ग्रीक तुकड्यांमध्ये अनेक समान वैशिष्ट्ये आहेत, उदाहरणार्थ शक्तिशाली इमारती, शक्तिशाली मध्यम युद्धनौका, स्वस्त तंत्रज्ञान आणि फॅलॅंक्स रचना, ज्यामुळे ग्रीक हॉपलाइट सैन्यदल पुढून येणाऱ्या हल्ल्यापासून सुरक्षित राहते.

अथेन्स संपादन

अथेन्स नगरराज्याच्या तुकडीकडे शक्तिशाली संस्कृती आहे. अथेन्सलाच उपलब्ध असणाऱ्या इमारतींमध्ये थिएटर व जिम्नॅशियम यांचा समावेश होतो. अथेन्स जिम्नॅशियमपासून शक्तिशाली सैन्यदळे प्रशिक्षित करू शकतात तसेच काही तंत्रज्ञानही विकसित करू शकतात. ग्रीक संस्कृत्यांमधील सर्वांत शक्तिशाली नौदल अथेन्सकडे असून ते आपल्या मध्यम युद्धनौकेतून नौसैनिक प्रशिक्षित करू शकतात.

मॅसिडोनियन्स संपादन

मॅसिडोनियन्स हे ग्रीक सैन्यदळ तसेच अलेक्झांडरच्या साम्राज्याचे सैन्यदळ प्रशिक्षित करू शकतात. त्यांच्याकडे विविध प्रकारची सैन्यदळे व वेढ्यासाठीची यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांच्या वेढ्याच्या क्षमता चांगल्या असून ते फक्त त्यांनाच उपलब्ध असलेले प्रचंड लाकडी वेढ्यासाठीचे मनोरे बांधू शकतात, ज्यामध्ये अनेक धनुर्धर ठेवता येतात.

स्पार्टा संपादन

स्पार्टा नगरराज्याचे सैनिक, विशेषतः हॉपलाइट हे अत्यंत शक्तिशाली असतात. त्यांना दगडी भिंती बांधता येत नाहीत, पण त्यांचे शक्तिशाली सैनिकच रक्षणासाठी वापरावे लागतात. त्यांच्याकडे इतर ग्रीक तुकड्यांइतकी सैन्यदलात विविधता नसली तरी ते आपले शक्तिशाली पायदळ फॅलॅंक्स रचनेत वापरू शकतात.

आयबेरियन्स संपादन

आयबेरियन्सचे पायदळ हे खेळातील सर्वांत वेगवान असून ते, विशेषतः बॅलिरिक गोफण पायदळ, अत्यंत वेगाने लांब अंतरावर मारा करते. काही लांब अंतरावर मारा करणाऱ्या सैनिकांना तर जळणारे भाले फेकण्याचे तंत्र उपलब्ध आहे. टोलेडो स्टील या तंत्रामुळे त्यांच्या धातूची शस्त्रे वापरणाऱ्यांना अधिक शक्तिशाली हल्ला करता येतो.

मौर्य साम्राज्य संपादन

भारतीय मौर्य साम्राज्य ही खेळातील एक शक्तिशाली संस्कृती आहे. ते कोणतीही वेढ्यासाठीची यंत्रे प्रशिक्षित करू शकत नसले तरी त्यांना धनुर्धर हत्ती, लढाऊ हत्ती व इमारती दुरुस्त करू शकणारा व उत्पादिन अन्न, धातू, दगड, लाकूड इ. साठवू शकणारा कामगार हत्ती असे तीन प्रकारचे हत्तींचे दळ प्रशिक्षित करता येते. तसेच त्यांचे धनुर्धर हे इतर संस्कृत्यांच्या धनुर्धरांपेक्षा अधिक लांब अंतरावर बाण मारू शकतात.

पर्शियन संपादन

खेळातील पर्शियन संस्कृती ही सर्वांत समतोल संस्कृती आहे. त्यांच्य मांडलिक राज्यांकडून त्यांना वेगवेगळी सैन्यदले उपलब्ध होतात. त्यांचे पायदळ हे दुर्बल असले तरी ते स्वस्त दरात प्रशिक्षित होत असल्याने ते खूप मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित करता येते. खेळातील सर्वांत शक्तिशाली (तसेच सर्वांत महाग) घोडदळ त्यांना उपलब्ध आहे. घोडदळाचे सर्व प्रकार त्यांना उपलब्ध असून घोडेस्वार धनुर्धर त्यांना रथाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यांच्या इमारतीही खेळातील सर्वांत शक्तिशाली आहेत. जमीनीवरच्या व्यापरातून त्यांना इतर संस्कृत्यांपेक्षा अधिक नफा मिळतो.

रोमन संपादन

रोमन संस्कृती ही खेळातील हॅस्टॅटस हे सर्वांत शक्तिशाली तलवार वापरणारे पायदळ प्रशिक्षित करू शकते. तसेच "सेज बॅलिस्टा" व "स्कॉर्पियन" ही वेढ्यासाठीची सर्वांत शक्तिशाली यंत्रे ते प्रशिक्षित करू शकतात. तसेच ते शत्रूच्या प्रदेशाच्या सभोवती वेढ्यासाठीच्या भिंती बांधून शत्रूच्या शहरांना घेरून टाकू शकतात.

टॉलेमिक राजतंत्र संपादन

टोलेमिक सांस्कृतिकडे शेतीची शक्तिशाली तंत्रे आहेत. ते लढाऊ हत्ती व उंट प्रशिक्षित करू शकतात. त्यांचे नौदल कार्थेज संस्कृतीइतकेच शक्तिशाली असून ते मोठ्या युद्धनौका बांधू शकतात. त्यांना प्रशिक्षणासाठी उपलब्ध ग्रीक सैनिक हे महाग व शक्तिशाली असतात, तर इजिप्शियन सैनिक हे स्वस्त व दुर्बल असतात.

सेल्युसिद साम्राज्य संपादन

या खेळातील सेल्युसिद साम्राज्याला प्रशिक्षणासाठी ग्रीक तसेच पौर्वात्य सैन्यदले उपलब्ध असून ते मॅसिडोनियन पद्धतीचे शक्तिशाली चिलखती पायदळ व घोडदळ व पौर्वात्य पद्धतीचे चिलखत नसलेले घोडदळ, पायदळ, चिलखती भारतीय लढाऊ हत्ती व रथ प्रशिक्षित करू शकतात.

तंत्रज्ञान संपादन

झीरो ए.डी. मध्ये विविध प्राचीन तंत्रज्ञाने विकसित करता येतात. बहुतांस तंत्रज्ञाने त्यांच्याशी संबंधित इमारतींमध्ये संशोधित करता येतात.

इतिहास संपादन

 
झीरो ए.डी.मधील पाणी, मासे व झाडे यांचे चित्रण व नौदलातील मध्यम युद्धनौका

झीरो ए.डी.ची सुरुवात जून २००१ मध्ये एज ऑफ एम्पायर्स २: द एज ऑफ किंग्स या खेळाचे सर्वसमावेशक संपूर्ण रूपांतर करणारे विस्तारक म्हणून झाली. पण रचनेच्या मर्यादित क्षमतेमुळे विकासकांचा संघ लवकरच त्यांच्या कल्पनांवर आधारित पूर्णपणे स्वतंत्र दृश्य खेळ तयार करण्याकडे वळला.[५][६]

नोव्हेंबर २००८ मध्ये विकासकांनी जाहीर केले की ते हा प्रकल्प लवकरच खुला-स्रोत म्हणून प्रकाशित करतील.[७] १० जुलै २००९ रोजी वाइल्डफायर गेम्स यांनी झीरो ए.डी.चा स्रोत ह जीपीएल २+ या परवान्याखाली प्रकाशित केला तर खेळातील चित्रे, कला हे सीसी-बीवाय-एसए या परवान्याखली प्रकाशित केले.[८]

२३ मार्च २०१०ला झीरो ए.डी.वर दहा ते पंधरा लोक काम करत होते, पण विकासानंतर सध्या शंभराहून अधिक लोकांनी विकासात सहभाग घेतला आहे.[९]

५ सप्टेंबर २०१३ रोजी एक १,६०,००० डॉलर इतक्या रकमेसाठी निधी गोळा करणे सुरू झाले. त्यांना त्यातून ३३,२५१ इतका निधी मिळाला, जो त्यांनी प्रोग्रामरला नोकरीवर ठेवण्यासाठी वापरला.[१०]

झीरो ए.डी.च्या ख्रिस्तपूर्व ५०० ते इसवीसन १ या काळावर आधारित "असेन्डन्ट एम्पायर्स" (Ascendant Empires) व इसवीसन १ ते इसवीसन ५०० या कालखंडावर आधारित "एम्पायर्स बिसेज्ड" (Empires Besieged) अशा दोन आवृत्त्या ठरवण्यात आल्या आहेत.

आवृत्त्यांचा इतिहास संपादन

अल्फा-पूर्व संपादन

आवृत्ती तारीख नवीन सुविधा
२ एप्रिल २०१० विकासकांसाठी खेळाचा संकेत स्रोत खुला करून दिला व पहिली सर्वांसाठी उपलब्ध आवृत्ती प्रकाशित केली.
१२ जून २०१० खेळातील सैन्यदलाच्या हालचालीत मोठी सुधारणा केली.
११ जुलै २०१० अनेक खेळाडूंना परस्परांत खेळण्याची सुविधा उपलब्ध.

अल्फा संपादन

आवृत्ती नाव दिनांक नवीन सुविधा
ॲर्गोनॉट (Argonaut) १६/०८/२०१० नवीन नकाशे, प्राणिदलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, दलांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेची पुनर्रचना व अनेक खेळाडू एकमेकांशी खेळत असताना प्रतिस्पर्ध्याशी संवाद साधण्याची सुविधा.
बेलेरोफॉन (Bellerophon) १९/१०/२०१० ?
सर्बेरस (Cerberus) ११/१२/२०१० खेळण्यामध्ये सुधारणा
डिडॅलस (Daedalus) कृत्रिम बुद्धिमत्तेचा संगणक प्रतिस्पर्धी
एडिटॅनिया (Edetania) २०/०५/२०११ नवीन आयबेरियन संस्कृती
फॉर्च्युना (Fortuna) १०/०७/२०११ सैन्यदलांसाठी सहा वेगवेगळ्या स्थिती
जेरोनियम (Geronium) १७/०९/२०११ नवीन कार्थेजियन संस्कृती
हाखामनिश (Haxāmaniš) २३/१२/२०११ वस्तू देवाणघेवाणीची सुविधा, नवीन पर्शियन संस्कृती
आयडेस ऑफ मार्च (Ides of March) १५/०३/२०१२ नवीन रोमन संस्कृती
१० झेलम (Jhelum) १६/०५/२०१२ नवीन तंत्रज्ञान, संस्कृतीचे टप्पे, अथेन्स, मॅसिडोन, स्पार्टा या नवीन संस्कृत्या
११ क्रोनॉस (Kronos) ०७/०९/२०१२ नवीन ब्रिटन्स व गॉल्स संस्कृत्या, खेळाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेत सुधारणा
१२ लोसेटिऑस (Loucetios) १६/१२/२०१२ नवीन आंतर-संस्कृती संबंध हाताळणे, वेढ्यासाठीची यंत्रे
१३ मगध (Magadha) ०३/०४/२०१३ नवीन मौर्य संस्कृती व खेळातील पार्श्वसंगीत
१४ नॉक्रॅटिस (Naukratis) ०४/०९/२०१३
१५ ओसायरिस (Osiris) २४/१२/२०१३ नवीन टॉलेमिक व सेल्युसिद संस्कृत्या
१६ पतंजली (Patañjali) १७/०५/२०१४ नवीन कृत्रिम बुद्धिमत्तेचा पेट्रा नावाचा बॉट, सुधारित सदस्य व्यक्तिरेखा
१७ क्वेर्कस (Quercus) १२/१०/२०१४ सैनिकांना भिंतींवर ठेवण्याची सुविधा
१८ ऱ्होडोडॅक्टिलोज (Rhododactylos) १३/०३/२०१५ भटक्यांची खेळ पद्धत (Nomad Game Mode)
संस्कृतीची तंत्रज्ञात वृक्षाकृती (Technology Tree)
सेल्युसिद संस्कृतीच्या नवीन इमारती
१९ सिलेप्सिस (Syllepsis) २६/११/२०१५ सैन्यदळांना इमारती व वेढ्याची यंत्रे ताब्यात घेण्याची सुविधा
२० टिमोस्थेन्स (Timosthenes) ३१/०४/२०१५
२१ ऱ्होडोडॅक्टिलोज (Rhododactylos) ०८/११/२०१६ सेल्युसिद साम्राज्य संस्कृतीचा विकास पूर्ण
२२ व्हीनस्टास (Venustas) २६/०७/२०१७ हेरगिरीचे तंत्रज्ञान, निशाण ताब्यात घेण्याची खेळ पद्धत (Relic game mode)

पायरोजेनेसिस संपादन

 
पायरोजेनेसिसचे सर्व परिणाम चालू करून गॉल संस्कृतीची घेतलेली झलक

झीरो ए.डी.च्या सध्या विकसनशील अवस्थेत असलेल्या खेळ इंजिनाचे नाव पायरोजेनेसिस आहे.[११](ग्रीक संस्कृतीमधील पायर अग्नीची व genesisची सुरुवात यावरून). ज्याने अग्नी चोरून मानवजातीला दिला त्या पहिल्या ग्रीक पुराणातील प्रसिद्ध व्यक्तीचे, प्रोमोथियसचे नाव देण्यात आले होते. पण दुसऱ्या एका विकासकांच्या संघाने प्रोमोथियसचा आपल्या खेळात वापर करून त्याची जाहिरात केल्यावर हे नाव बदलण्यात आले.

पायरोजेनेसिस मुख्यतः सी++मध्ये लिहिण्यात आले असून ते मोझिलाचे स्पायडरमंकी जावास्क्रिप्ट इंजिन वापरते.[११] ते ओपनजीएल, ओपनएएल, बूस्ट, एसडीएल, व्हॉर्बिस व डब्ल्युएक्सव्हिड्जेट्स हे मुक्त-स्रोत संग्रहसुद्धा वापरते. कोलाडा (COLLADA), एक्सएमएल, जेएसओएन या खुल्या माहिती स्वरूपांना हे समर्थन देते. ते मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्समॅक ओएस एक्स या मुख्य संचालन प्रणाल्यांवर चालू शकते.

प्रतिसाद संपादन

झीरो ए.डी.ला २००८ मध्ये मॉडडीबीच्या "१०० लवकरच येणारी सर्वोत्कृष्ट विस्तारके" यामध्ये पहिल्या शंभरात येण्याइतकी मते मिळाली.[१२] २००९ मध्येसुद्धा झीरो ए.डी.ला मॉडडीबीच्या "१०० लवकरच येणारी सर्वोत्कृष्ट विस्तारके" मध्ये स्थान मिळाले[१३] तसेच "खेळाडूंचा सर्वांत आवडता खेळ" मध्ये तिसरा क्रमांक मिळाला.[१४] २०१० मध्ये झीरो ए.डी.चा "या वर्षातील खेळाडूचा सर्वांत आवडता लवकरच येणारा खेळ" यामध्ये आदरपूर्वक उल्लेख झाला[१५] व या खेळास २०१२ मध्ये तिसरा क्रमांक मिळाला[१६]. सोर्सफोर्जचा जून २०१२चा "या महिन्याचा प्रकल्प" म्हणून झीरो ए.डी.ची निवड झाली.[१७]. लिनक्सक्वेश्चन्स.ऑर्ग या संकेतस्थळाचा "२०१३ सालचा खुला-स्रोत दृश्य खेळ" म्हणूनही झीरो ए.डी.ची निवड झाली.[१८]

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ http://www.joystiq.com/2010/07/13/the-joystiq-indie-pitch-0-a-d/
  2. ^ http://www.thevarguy.com/2009/10/13/0-ad-promises-real-gaming-for-ubuntu/
  3. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2011-06-28. 2014-04-14 रोजी पाहिले.
  4. ^ "0 A.D. | A free, open-source game of ancient warfare". play0ad.com. 2018-04-25 रोजी पाहिले.
  5. ^ "Articles and Tutorials". GameDev.net (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2011-09-28. 2014-04-14 रोजी पाहिले.
  7. ^ "Does everyone like the Revision Log?". Wildfire Games Community Forums (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  8. ^ "0 A.D. Goes Open Source - Slashdot". games.slashdot.org (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  9. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2012-03-30. 2014-04-14 रोजी पाहिले.
  10. ^ online, heise. "Neues Release des Echtzeitstrategiespiels 0 A.D." heise online (जर्मन भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  11. ^ a b "WfgAcademiaInto – Wildfire Games". trac.wildfiregames.com. 2018-04-25 रोजी पाहिले.
  12. ^ "Top 100 - 2008 Mod of the Year Awards". Mod DB (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  13. ^ "Top 100 - 2009 Mod of the Year Awards". Mod DB (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  14. ^ "Players Choice - Indie Game of the Year feature". Mod DB (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  15. ^ "Players Choice - Upcoming Indie feature". Indie DB (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  16. ^ "IOTY Players Choice Upcoming 2012 feature - 0 A.D. Empires Ascendant". Mod DB (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.
  17. ^ "0 AD: Project Of The Month, June 2012 - SourceForge Community Blog". SourceForge Community Blog (इंग्रजी भाषेत). 2012-06-04. 2018-04-25 रोजी पाहिले.
  18. ^ "2013 LinuxQuestions.org Members Choice Award Winners". www.linuxquestions.org (इंग्रजी भाषेत). 2018-04-25 रोजी पाहिले.