जॉन मिल्टन (इंग्लिश: John Milton) (९ डिसेंबर, इ.स. १६०८ - ८ नोव्हेंबर, इ.स. १६७४) इंग्लिश भाषेतील एक प्रसिद्ध कवी, तत्त्वज्ञ, आणि ऑलिव्हर क्रॉमवेलाच्या अधिपत्याखालील इंग्लंडच्या राष्ट्रकुलातील एक सनदी अधिकारी होता. उत्तरकालीन अनेक कवी आणि तत्त्वज्ञांवर याच्या विचारसरणीचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. याने लिहिलेले पॅराडाईज लॉस्ट हे दीर्घकाव्य सुप्रसिद्ध आहे.

नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी, लंडन येथे असलेले जॉन मिल्टन याचे व्यक्तिचित्र (चित्रकार: अज्ञात ; निर्मितिकाळ: इ.स. १६२९)

लंडनमधील ब्रॅडफोर्ड स्ट्रीट येथील निवासस्थानी जॉन मिल्टन (थोरले) आणि सारा जेरी या दांपत्याच्या पोटी जॉन मिल्टन याचा जन्म झाला. त्याचे वडील वादक संगीतकार होते. त्याचप्रमाणे लिहितावाचता न येणारांसाठी पत्रे आदी लेखनवाचनाचे काम ते करीत. त्यांतून त्यांना चांगली कमाई होई. जॉन मिल्टन याचे शिक्षण सेंट पॉल्स शाळेत झाले. तेथे लॅटिन, ग्रीक आणि हिब्रू भाषांचे शिक्षण त्याने घेतले. त्यानंतर केंब्रिजच्या ख्राइस्ट्स कॉलेजातून इ.स. १६८१ मध्ये त्याने बॅचलर ऑफ आर्ट्‌स ही पदवी घेतली. त्यानंतर तीन वर्षांनी त्याने मास्टर ऑफ आर्ट्‌स हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.