जेम्स ऑगस्टिन अलोशियस जॉइस (इंग्लिश: James Augustine Aloysius Joyce ;) (फेब्रुवारी २, इ.स. १८८२; डब्लिन, आयर्लंड - जानेवारी १३, इ.स. १९४१; त्सुरिख, स्वित्झर्लंड) हा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील नवमतवादी व प्रभावशाली लेखकांपैकी एक आयरिश लेखक व कवी होता. स्वतः विकसवलेल्या 'जाणिवेचा प्रवाह(स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस)' या तंत्राचा व जवळपास सर्व ज्ञात लेखनप्रकारांचा वापर करून त्याने लिहिलेले युलिसिस हे नवीन धाटणीने ओडिसीच्या कथानकाची मांडणी करणारे पुस्तक साहित्यविश्वात मैलाचा दगड मानले जाते. डब्लिनर्स(इ.स. १९१४) हा लघुकथांचा संग्रह, 'अ पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट अ‍ॅज अ यंग मॅन'(इ.स. १९१६) व 'फिनिगन्स वेक'(इ.स. १९३९) या कादंबऱ्या ह्या त्याच्या इतर प्रसिद्ध साहित्यकृती होत. त्याने लिहिलेले तीन काव्यसंग्रह, एक नाटक, नैमित्तिक पत्रकारिता आणि त्याची प्रकाशित झालेली पत्रे यांचाही समावेश त्याच्या साहित्ययादीत आहे.

जेम्स जॉइस
जन्म नाव जेम्स ऑगस्टिन अलोशियस जॉइस
जन्म फेब्रुवारी २, इ.स. १८८२
डब्लिन, आयर्लंड
मृत्यू जानेवारी १३, इ.स. १९४१
त्सुरिख, स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्व आयरिश
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा इंग्लिश
साहित्य प्रकार कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती युलिसिस, फिनिगन्स वेक
वडील जॉन स्टॅनिस्लाउस जॉइस
आई मेरी जेन मरे
Dubliners, 1914

जॉइसाचा जन्म डब्लिन येथे एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबात झाला. क्लोंगोवेस आणि बेल्वेदेअर येथील जेसुइट शाळांमध्ये आणि नंतर डब्लिनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजात त्याने उत्तम विद्यार्थी म्हणून लौकिक मिळवला. वयाच्या विशीत तो कायमचा मुख्यभू युरोपात स्थलांतरित झाला. त्याचे वास्तव्य प्रामुख्याने त्रिएस्ते(इटली), पॅरिस(फ्रान्स) व त्सुरिख(स्वित्झर्लंड) येथे होते. त्याचे बरेचसे आयुष्य हे आयर्लंडबाहेर गेले असले तरी त्याच्या बहुतांश कादंबऱ्या या डब्लिन पार्श्वभूमीवर बेतलेल्या आहेत. तसेच त्याच्या साहित्यकृतींतील व्यक्तिरेखा या समकालीन नातेवाईक, मित्र व हितशत्रूंवर बेतलेल्या आढळतात. डब्लिनच्या गल्लीबोळांचे नेमके वर्णन हे युलिसिस कादंबरीत प्रकर्षाने आढळून येते. "मी नेहमीच डब्लिनबद्दल लिहितो. कारण जर मी डब्लिनच्या अंतरंगात शिरू शकलो तर जगातील कोणत्याही शहराच्या अंतरंगात शिरल्यासारखेच आहे. जितके तपशीलवार तितके वैश्विक." असे विवेचन युलिसिसच्या प्रकाशनानंतर एकदा त्याने, त्याच्या या वैशिष्ट्याबद्दल केले होते.

बाह्य दुवे

संपादन