गुलशन कुमार मेहता

(गुलशन बावरा या पानावरून पुनर्निर्देशित)

गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा (एप्रिल १२, इ.स. १९३७ - ऑगस्ट ७ , इ.स. २००९) हे प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हे हिंदी चित्रपट अभिनेते होते. पाकिस्तानात जन्म झालेले गुलशन यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात वास्तव्यास आले. आपल्या ४२ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत त्यांनी एकूण २४० चित्रपट गीते लिहिली. त्यापैकी निम्म्याहून अधिक गीतांना आर.डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरसाज चढविला. जंजीर या चित्रपटातील प्राण आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी आणि उपकार या चित्रपटातील मेरे देश की धरती.. ही त्यांची प्रसिद्ध गीते होत. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या हकीकत या चित्रपटासाठी त्यांनी शेवटचे गीत लिहिले.

गुलशन बावरा

गुलशन बावरा
पूर्ण नावगुलशन कुमार मेहता
जन्म १२ एप्रिल, १९३७
लाहोर (पाकीस्थान)
मृत्यू ७ ऑगस्ट, २००९
मुंबई
अन्य नाव/नावे बावरा
कार्यक्षेत्र गीतकार
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा हिंदी
कारकीर्दीचा काळ १९५९ - १९९५

नामकरण - बावरा

संपादन

चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतिभाई पटेल यांनी त्यांचे नामकरण बावरा असे केले. तेव्हापासून ते गुलशन बावरा या नावाने ओळखले जाऊ लागले. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते.

कारकीर्द

संपादन

गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. पाकिस्तानात लाहोर पासून ३० किलोमीटर दूर असलेल्या शेखूपुरा गावी एप्रिल १२, इ.स. १९३७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशनदांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरमधल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला.

नंतर गुलशन यांनी दिल्लीस येऊन मॅट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वे भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तऱ्हेने ते माया नगरीत दाखल झाले.

१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले मैं क्‍या जानूॅं कहॉं लागे ये सावन मतवाला रे हे गीत लता मंगेशकरांनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नोकरी सोडून दिली.

चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. या चित्रपटातील त्यांची चांदनी के चांद टुकडों के लिये, तुम्हे याद होगा कभी हम मिले थे आदी गाणी गाजली.

त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ २४० गाणी लिहिली आहेत. पैकी कल्याणजी-आनंदजी ह्या संगीतकारांसाठी गुलशनदांनी एकूण ६९ गाणी लिहिली तर आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांच्यासाठी १५० गाणी लिहिली.

गुलशन बावरा यांचे शुक्रवारी दिनांक ७ ऑगस्ट, इ.स. २००९ला हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले.

पुरस्कार

संपादन

गुलशन बावरा यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकाराचा मान दोन वेळा मिळाला आहे:

वर्ष गाणे चित्रपट संगीतकार गायक
१९७४ यारी है इमान मेरा जंजीर (1973) कल्याणजी-आनंदजी‎ मन्ना डे
१९६८ मेरे देश की धरती सोना उगले उपकार कल्याणजी-आनंदजी‎ महेन्द्र कपूर

निवडक लोकप्रिय गीते

संपादन
  • अगर तुमना होते (अगर तुमना होते)
  • वादा कर लें साजना (हाथ की सफाई)
  • कस्मे वादे निभाऐंगे हम (कस्मे वादे)
  • हाल ए दिल गाके सुनवाऐं
  • प्यार हमें कीस मोड पे ले आया
  • जिंदगी मिल के बितायें (सत्ते पे सत्ता)
  • पीनेवालोंको पीने का बहाना चाहिए (हाथ की सफाई)
  • कितनी भी तू कर लें सितम (सनम तेरी कसम)
  • जीवन के हर मोड पे मिल जायेंगे हमसफर (झूठा कहीं का)
  • तू तो है वही (ये वादा रहा)
  • आतीं रहेगी बहारें (कस्मे वादे)

बाह्य दुवे

संपादन
  • Gulshan Bawra at बॉलिवुड हंगामा
  • "गुलशन बावरा यांची तरुणीवर छाप".