हा लेख मानवाच्या स्त्रीजातीतील गर्भावस्थेविषयी आहे.

गरोदर स्त्री

स्त्रीच्या गर्भाशयातील भ्रूण किंवा गर्भ म्हटल्या जाणाऱ्या एक किंवा अधिक अपत्यांची वाढ म्हणजे गर्भावस्था किंवा गरोदरपण होय. गर्भावस्थेत जुळे किंवा तिळ्यांप्रमाणे अनेक सगर्भता असू शकतात. गर्भधारणेनंतर सुमारे ३८ आठवड्यांत प्रसूती होते; रजोचक्राची लांबी चार आठवडे असणाऱ्या स्त्रियांमध्ये हा काळ अंतिम सामान्य रजोकालाच्या प्रारंभापासून सुमारे ४० आठवडे इतका येतो. सस्तनी प्राण्यांच्या गर्भावस्थांपैकी मानवी गर्भावस्थेचा सर्वाधिक अभ्यास झालेला आहे. गर्भधारणा लैंगिक समागमातून किंवा सहाय्यक प्रजननी तंत्रज्ञानामार्फत साधली जाऊ शकते.

गर्भधारणेपासूनच्या आठ आठवड्यापर्यंतचे अपत्य म्हणजे भ्रूण होय, त्यानंतर जन्मापर्यंत गर्भ ही संज्ञा वापरली जाते.[][] प्रसवपूर्व विकासाच्या विविध अवस्थांचा निर्देश सुलभ व्हावा म्हणून मानवी गर्भावस्था तीन तिमाहींच्या कालावधीत विभागली जाते. पहिल्या तिमाहीत गर्भस्राव (भ्रूणाचा किंवा गर्भाचा नैसर्गिक मृत्यू) होण्याचा धोका सर्वाधिक असतो. दुसऱ्या तिमाहीत गर्भाची वाढ सहजगत्या पाहिली जाऊ शकते. तिसऱ्या तिमाहीचा प्रारंभ हा जवळपास जीवनक्षमतेचा, अर्थात वैद्यकीय मदतीसह किंवा मदतीशिवाय गर्भाशयाबाहेर गर्भ जगू शकण्याच्या क्षमतेचा बिंदू असतो.[]

परिभाषा

संपादन

वैज्ञानिक परिभाषेत गर्भावस्थेला ग्रॅव्हिडिटी अशी एक संज्ञा आहे. ती लॅटिन भाषेतील "जड" या अर्थाच्या धातूवरून आलेली आहे. गरोदर स्त्रीला इंग्रजीत ग्रॅव्हिडा असेही म्हणले जाते. पॅरिटी (प्रजकता) ही संज्ञा (लघुरूप पॅरा‌) स्त्रीने जितक्या वेळा अपत्याला जन्म दिलेला आहे त्या संख्येसाठी वापरली जाते. प्रजकता मोजताना एकाच वेळी असलेली एकाहून अधिक गर्भांची गर्भावस्थाही "एक" म्हणूनच मोजली जाते आणि सामान्यतः प्रजकतेतत मृतगर्भजन्मांचाही समावेश असतो. वैद्यकीय परिभाषेत कधीही गरोदर न झालेल्या स्त्रीला नलिग्रॅव्हिडा (अगर्भा) (वांझ) असे आणि पहिल्यांदाच गरोदर असलेल्या स्त्रीला प्रायमिग्रॅव्हिडा (पहिलटकरीण) असे म्हणतात. ज्या स्त्रीमध्ये गर्भावस्था कधीही २० आठवड्यांपलीकडे गेलेली नाही तिला नलिपॅरा (अप्रजका) असे म्हणतात.

गर्भारकाळ

संपादन
 
प्रसुतीकाळातील वाढीचा तक्ता

बहुतांशी दर महिन्यामध्ये येणारी मासिक पाळी चुकल्यामुळे गर्भावस्था असल्याची शंका येते. वैद्यकीय अधिकारी अशा वेळी प्रत्यक्ष तपासणी किंवा मूत्रतपासणी करून गर्भावस्थेची खात्री करून घेतात. सध्या औषध विक्री केंद्रामध्ये गर्भावस्था असल्याची खात्री करून घेण्यासाठी तयार उपकरणे मिळतात.

मानवामध्ये हा काळ साधारण ४० आठवड्यांचा असतो. (फलन ते बालकाचा जन्म) या काळाला गर्भारकाळ म्हणतात. गर्भारकाळाचे सामान्यतः तीन काळ मानले जातात.पूर्ण गर्भाची वाढ होण्यास सु. चाळीस आठवड्यांचा कालावधि आवश्यक आहे. हा चाळीस आठवड्यांचा काळ शेवटच्या मासिकपाळीच्या पहिल्या दिवसापासून मोजण्यात येतो. कारण मासिक पाळी आली नाही म्हणजे त्या महिन्याच्या गर्भचक्रामधील बाराव्या ते चवदाव्या दिवशी अंडमोचन आणि निषेचन झालेले असते. सामान्यपणे गर्भावस्थेचे तीन तीन महिन्यांचे तीन टप्पे मानण्यात येतात.

पहिली तिमाही- पहिल्या बारा आठवड्यात भ्रूणावस्था आणि गर्भाची प्राथमिक वाढ होते.

दुसरी तिमाही- गर्भावस्थेचा १३ ते २७ आठवड्यांचा काळ

तिसरी तिमाही- गर्भावस्थेचा २८ ते ४० आठवड्यांचा काळ

पहिली तिमाही

संपादन

पहिली तिमाही टळलेल्या मासिक पाळीपासून पहिले तीन महिने (१२ आठवडे) हा काळ मानला जातो. स्त्रीमधील अंतरस्रावांमुळे स्तनाग्रे व त्याच्या बाजूच्या भागात रंगबदल होऊन तो ग़डद (Dark) होतो. बाळाच्या वाढीतला सुरुवातीचा हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. यात वाढीचे खालील टप्पे असतात.

 
भ्रूण परिपक्वताचे बदल

निषेचनानंतर पहिले आठ आठवडे व शेवटच्या मासिक पाळीनंतर दहा आठवडेपर्यंत वाढत जाणाऱ्या गर्भपेशी समूहास भ्रूण म्हणण्याची पद्धत आहे. त्यानंतर बाळाचा जन्म होईपर्यंत त्यास अर्भक म्हणतात. पहिल्या तिमाहीमध्ये भ्रूण हे परिसरातील व पर्यावरणातील बदलास अधिक संवेदनक्षम असते. या काळात भ्रूणाचे बहुतेक सर्व अवयव तयार होण्याची प्रक्रिया चालू असते. भ्रूणवृद्धि होत असता त्याभोवती उल्ब नावाचे एक पातळ आवरण तयार होते. या आवरणामुळे भ्रूणाचे संरक्षण होते. उल्बावरणामध्ये उल्बद्रव असतो. या द्रवामुळे भ्रूणाचे/गर्भाचे तापमान बदलापासून आणि धक्क्यापासून प्रसूतिपर्यंत रक्षण होते. गर्भ गर्भशय्येमध्ये रुजल्यानंतर गर्भशय्येतील रक्तवाहिन्यांची तोंडे उघडतात. त्यातून वाहणारे रक्त पोषजनक पेशीतील पोकळ्यामध्ये पसरते. पोषजन्य पेशींचे भरीव स्तंभ आणि रक्तपोकळ्या यांची गुंतागुंतीची जालिकाकार रचना तयार होते. प्रथम रसांकुर, द्वितितक रसांकुर आणि तृतीयक रसांकुर अशा रचनेमुळे मातेचे रक्त आणि त्यामधील पोषक दृव्ये व भ्रूण पेशीमधून बाहेर आलेली अपशिष्टे यांची अदलाबदल या रचनेमध्ये होते. निषेचनानंतर सुमारे सतराव्या दिवशी अशा प्राथमिक वारेची निर्मिती होते. गर्भाच्या वाढीबरोबर वार गर्भाशयाच्या घुमटाकार बाजूस आतून चिकटते. प्रसूति होईपर्यंत गर्भाचे पोषण वारेतून आणि गर्भाशयास चिकटलेल्या अपरेमधून होते. अपरेमधून एचसीजी (ह्यूमन कोरिऑनिक गोनॅडोट्रोपिन) ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. प्रोजेस्टेरॉन हे गर्भरक्षक संप्रेरक आहे. प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशयाचे आकुंचन होत नाही. आणि गर्भ प्रसूतीपर्यंत वृद्धिक्षम राहतो.

गर्भावस्थेच्या चवथ्या आठवड्यात गर्भाची सर्व महत्त्वाची इंद्रिये विकसित झालेली असतात. मज्जारज्जू, मेंदूपोकळ्या तयार होतात. हृदयपेशींचे आकुंचन चवथ्या आठवड्यात चालू होते. अवयवबुंध दिसायला लागतात. आठव्या आठवड्यापर्यंत गर्भाच्या अभिसरणसंस्था, चेतासंस्था, पचनसंस्था, आणि वृक्क व उत्सर्जन संस्था विकसित झालेल्या असतात. सर्व महत्त्वाच्या अवयव विकसित होतात.

  • ५ आठवडे- पहिल्या पाच आठवड्यात भ्रूण तयार होऊन त्यात बदल होतात. भ्रूण एकपेशीयकडून बहुपेशीय प्रकाराकडे रूपांतरित होत असतो.
  • ७ आठवडे- गर्भामध्ये बदल होऊन हृदय सुरू होते. अंडमध्य तयार होऊन त्यापासून इतर अवयव तयार होण्यास प्रारंभ होत असतो.
  • १२ आठवडे- हाडांची निर्मिती सुरू होते.

गर्भचाचण्या: गर्भवती महिलेच्या मूत्रामध्ये एचसीजी आढळते. बहुतेक तयार गर्भचाचणी संचामध्ये एचसीजी चाचणीवरून गर्भ राहिल्याचे निदान करण्यात येते. आजपर्यंतच्या अभ्यासावरून ५० ते ७०% गर्भाच्या चेतासंस्थेमधील दोष गर्भवती महिलेस फॉलिक ॲसिड (बी9 जीवनसत्त्व) दिल्यास दूर होतात असे आढळून आले आहे. गर्भवती होऊ इच्छिणाऱ्या महिलेस दररोज ४०० मिग्रॅ फॉलिक ॲसिडची मात्रा पुरेशी आहे. क्षकिरण चिकित्सा, काहीं औषधे, आणि प्रदूषके यांचा पहिल्या तिमाहीमध्ये गर्भावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे क्षकिरण चिकित्सा टाळतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांना गर्भवती स्त्री घेत असलेल्या औषधांची पूर्ण माहिती दिली असेल तर व त्यांनी. गर्भजलचिकित्सा आणि अल्ट्रासाउंड करायचा सल्ला दिल्यास ह्या चाचण्या खात्रीलायक केंद्रामधून करून घेणे हितावह असते. बाराव्या आठवड्यापर्यंतच्या गर्भाचे लिंग अल्ट्रासाउंड चाचणीमधून कळते. पण अशी गर्भलिंग चिकित्सा करण्यास कायद्याने बंदी आहे.

दुसरी तिमाही

संपादन
 
गर्भावस्थेतील दुसऱ्या काळात गर्भाशयाची स्थिती

दुसरा काळ हा टळलेल्या पाळी पासून पहिले तीन महिने (१२ आठवडे) ते ६ महिने (२८ आठवडे) हा काळ मानला जातो. या काळात वजन वाढण्यास सुरुवात होते. गर्भधारणा असलेले १२ आठवड्याचे गर्भाशय ओटीच्यावर हाताला जाणवते. बाळाची वाढ सुरू राहते. २० आठवडे पूर्ण होताना मातेस गर्भाची हालचाल जाणवू लागते. गर्भातील बाळाची इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. गर्भ मूत्रविसर्जन करते. हे गर्भजलाचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. याकाळात जननेंद्रिय तयार होते आणि हे भ्रूण स्त्री-पुरुष म्हणून ओळखले जाऊ शकते.

गर्भावस्थेची दुसरी तिमाही १३ ते २७ आठवड्यांची असते. या कालावधीमध्ये गर्भाची प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आणि स्नायूंचे चलनवलन चालू होते. गर्भाच्या मेंदूची वाढ हा या टप्प्यामधील महत्त्वाचा घटक आहे.

१४-१६ आठवडे पूर्ण होताना स्तनांमध्ये पिवळसर चिकट द्रव तयार होणे सुरू होते. गर्भाशयाला ब्रॅस्टन-हिक्स आकुंचन (Braxton Hicks contractions) सुरू होतात. या गर्भारपणात गर्भाशयाच्या स्नायूंची हालचाल करून त्यातील ताण व्यवस्थित करण्याबरोबर गर्भाला उत्तेजित करत असतात. याद्वारे भ्रूणातील रक्तसंक्रमण व्यवस्थित केले जाते.

तिसरी तिमाही

संपादन

तिसरा काळ हा टळलेल्या पाळीपासून पहिले सहा महिने (२८ आठवडे) ते ९ महिने (३८ आठवडे) हा काळ मानला जातो. २८व्या आठवड्यापासून प्रसूतिपर्यंत गर्भावस्थेची तिसरी तिमाही मानण्यात येते. मेंदू, वृक्क आणि फुफ्फुसे असे सर्व महत्त्वाचे अवयव आणि इंद्रिये पूर्णपणे विकसित होण्याचा हा काळ असतो.. ३६व्या आठवड्यात गर्भाचे डोके गर्भाशयमुखाकडे येते. ३७व्या आठवड्यात गर्भाची वाढ पूर्ण झाल्याचे मानण्यात येते. गर्भाचे वजन या सुमारास ३०००-३६०० ग्रॅम झालेले असते. मातेचे अपुरे पोषण आणि गर्भाशय लहान असणे एकाऐवजी दोन गर्भ गर्भाशयात असण्याने (पहा जुळे) कमी वजनाचा गर्भ विकसित होतो.

गर्भ २९ आठवड्याचा असताना बाळाची वाढ झपाट्याने होते, तसेच त्याच्या अवयवांना बळकटी येते. बाळाला अंगभर लव (बारीक केस) येते त्यास लॅन्युगो(lanugo) म्हणतात. बाळाच्या त्वचेचे रक्षण करण्याकरिता पांढरा चिकट द्रव संपूर्ण अंगभर पसरलेला असतो. त्यास व्हर्निक्स (vernix) म्हणतात. या काळात बाळाच्या मेंदूची तसेच फुप्फुसांची वाढ झपाट्याने होते. माता जे सेवन करेल ते नाळेद्वारे बाळापर्यंत पोहोचत असते. ३४ आठवडे पूर्ण होताना फुप्फुसांची वाढ पूर्ण झालेली असते. जशी जशी प्रसूती जवळ येते बाळ मोठे झाल्यामुळे गर्भाशयात फिरण्यासाठी जागा कमी असते त्यामुळे बाळाची हालचाल मंदावते. ३८ आठवड्याच्या वाढीचे बाळ पूर्ण वाढीचे मानले जाते.

शेवटच्या मासिक पाळीनंतर साधारण ४० आठवड्यांनी बाळाचा जन्म होतो.

लक्षणे

संपादन

मातेमधील बदल- पहिल्या तीन महिन्यामध्ये मातेच्या शरीरात गर्भधारण करण्याच्या दृष्टीने बदल होतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे मळमळ, उलट्या आणि मूड बदल. स्तनांचा आकार बदलणे, स्तनांचा कडकपणा बदलून ते मऊ होणे, थकवा जाणवणे, काहीं पदार्थ खाण्याची इच्छा होणे. गर्भधारणेनंतर पहिल्या काहीं आठवड्यात स्तनाग्रांच्या भोवतालची जागा काळवंडते. दुसऱ्या तिमाहीमध्ये मातेमध्ये उत्साह वाढतो. गर्भाचा आकार वीसपटीनी मोठा होतो. १९-२०व्या आठवड्यात मातेस गर्भाची हालचाल जाणवते. या काळात मातांनी सैल कपडे वापराणे योग्य असते. तिसऱ्या तिमाहीमध्ये मातेचे पोट खाली उतरते.

गर्भार स्त्रीचा अपेक्षित आहार व व्यवहार

संपादन
  1. तेलकट व मसालेदार पदार्थ टाळणे.
  2. भरपूर दूध पिणे.
  3. फळे खाणे.
  4. मन नेहमी आनंदी ठेवणे.
  5. सकारात्मक विचार जोपासणे.
  6. भांडणे, हिंसक दृष्ये न पाहणे.

वैद्यकीय तपासण्या

संपादन
 
William Hunter, Anatomia uteri humani gravidi tabulis illustrata, 1774

रक्ताच्या तपासण्या

संपादन

लघवीची तपासणी

संपादन
  • लघवीतील जीवाणू, प्रथिने व इतर तपासण्या.

सोनोग्राफीच्या तपासणीतून बाळाची वाढ, गर्भजल प्रमाण, गर्भातील व्यंग याची तपासणी करतात. गर्भाच्या डोक्याचा घेर, मांडीच्या हाडाची लांबी, पोटाचा परीघ यांच्या येणाऱ्या संख्येच्या आधारे बाळाची वाढ आठवड्यांत ठरवतात. बाळाच्या अवयवांचा व्यवस्थित अभ्यास करून अवयवांतील व्यंग तपासतात.  

भावी पित्याचा सहभाग

संपादन
 
नवजात बालक

स्त्रीची गर्भावस्था संपून बालकाचा/बालकांचा जन्म होण्याच्या क्रियेला प्रसूती म्हणतात. नैसर्गिक प्रसूती योनी मार्गातून होते परंतु ज्यावेळी ती शक्य नसते त्यावेळी पोटावर ऑपरेशन करून बाळाची प्रसूती केली जाते या सिझेरियन सेक्शन ऑपरेशन म्हणतात. ज्युलियस सीझर राजाचा जन्म या प्रकारे झाला होता.

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ भ्रूणाची व्याख्या|http://www.medterms.com/script/main/art.asp?articlekey=3225 Archived 2012-09-12 at the Wayback Machine.
  2. ^ गर्भाची व्याख्या|http://www.medterms.com/script/main/art.asp?articlekey=3424 Archived 2007-08-22 at the Wayback Machine.
  3. ^ तिमाहीची व्याख्या|http://www.medterms.com/script/main/art.asp?articlekey=11446 Archived 2012-10-11 at the Wayback Machine.