गजानन माधव मुक्तिबोध
गजानन माधव मुक्तिबोध (१३ नोव्हेंबर १९१७-११ सप्टेंबर १९६४[१]) हे आधुनिक भारतातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार व विचारवंत होते. मराठीत
प्रसिद्ध असलेले शरद्चंद्र माधव मुक्तिबोध (१९२१-१९८५) यांचे ते मोठे बंधू होते. [[File:Gajanan Madhav Muktibodh.jpg]]
जन्म
संपादनगजानन माधव यांचा जन्म ग्वाल्हेर संस्थानाच्या मुरेना जिल्ह्यातील शिवपूर येथे (आता मध्यप्रदेश) येथे झाला[२]. त्यांच्या वडलांचे नाव माधवराव आणि आईचे नाव पार्वतीबाई होते.
कौटुंबिक माहिती
संपादनगजानन माधव मुक्तिबोधांचे पणजोबा वासुदेव हे मूळचे जळगावचे रहिवासी होते, त्यांचे मूळ आडनाव कुलकर्णी होते. जळगाव सोडून वासुदेव कुलकर्णी तत्कालीन ग्वाल्हेर येथे स्थायिक झाले. वासुदेवराव यांचा मुलगा (म्हणजे गजानन माधव यांचे आजोबा) गोपाळराव वासुदेव हे ग्वाल्हेरच्या तत्कालीन टोंक (आता राजस्थान) जिल्ह्यात ऑफिस सुपेरिंटेन्डेट होते. ते फारसीचे उत्तम जाणकार होते, त्यामुळे त्यांना मुन्शीजी म्हंटले जात असे.
गजानन माधव मुक्तिबोधांचे वडील माधवराव गोपाळराव हे सब-इन्स्पेक्टर होते आणि इन्स्पेक्टर पदावर ते निवृत्त झाले. ते धार्मिक, निर्भिक, निर्भीड आणि न्यायनिष्ठ होते. त्याकाळीही पोलीस खाते भ्रष्टाचारी होतेच. माधवराव अत्यंत सचोटीचे आणि प्रामाणिक होते, त्यांचा खूप मोठा दरारा होता. त्यांच्या सतत बदल्या होत असत. त्यांच्या नेक आणि पारदर्शक जीवनाचा मोठा प्रभाव गजानन यांच्यावर पडला होता. मुक्तिबोधांनी पित्याच्या या नेकीवर दोन कविताही लिहिल्या. माधवराव यांचे शिक्षण माध्यमिक पर्यंत झाले होते. तेही फारसीचे जाणकार होते. त्यांना धर्म आणि भारतीय तत्त्वज्ञानात अतिशय रुची होती. त्यांना म. गांधींजीच्या बद्दल अतिशय आदर होता, त्याकाळी ते लो. टिळकांच्या ‘केसरी’चे वाचक होते.
गजानन माधव मुक्तिबोधांच्या आई पार्वतीबाई ह्या बुंदेलखंड येथील समृद्ध शेतकरी कुटुंबातील होत्या. त्याही अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचे शिक्षण सहावी पर्यंत झाले होते. त्या उच्च बुद्धीमत्तेच्या होत्या. त्यांना त्याकाळी सहाशे रुपयांचा पुरस्कार विद्यार्थी दशेत मिळाला होता. हिंदीतील प्रेमचंद आणि मराठीतील हरिनारायण आपटे हे त्यांचे आवडते लेखक होते. [२]
गजानन मुक्तिबोध हे माधवराव गोपाळराव याचं तिसरे अपत्य होते. त्यांची दोन मुले आधी मरण पावली.चौथे अपत्य म्हणजे शरदचंद्र मुक्तिबोध.
मृत्यू
संपादनगजानन माधव मुक्तिबोधांचा मृत्यू अतिशय करुणाजनक होता. त्यांना १७ फेब्रुवारी १९६४ रोजी अर्धांगवायूचा मोठा झटका आला. त्यांची प्रकृती फारच बिघडली.. हिंदीतील ज्येष्ठ कवी आणि समीक्षक अशोक वाजपेयी यांनी १२ सप्टेंबर २०१४ रोजी "मुक्तिबोधः 'एक गोत्रहीन कवि'" हा स्मरण लेख लिहिला. या लेखात[३] वाजपेयी लिहितात की “भारतीय ज्ञानपीठने त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संमतीपत्रावर मला त्यांचा अनुमतीची सही घ्यायची होती म्हणून मी त्यांना सागरवरून भोपाळ येथे भेटावयास गेलो. त्यावेळी ते झोपूनच होते आणि अर्धी अर्धी सिगारेट पित होते. सही करताना त्यांचा हात अतिशय थरथरत होता. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सोय सुद्धा फारशी चांगली नव्हती. ते सगळे पाहून मी भयचकित झालो. "
" मी दिल्लीला परतलो आणि श्रीकांत वर्मा (सुप्रसिद्ध हिंदी कवी) यांना म्हणालो की मुक्तिबोधांना आपण दिल्लीलाच हलवले पाहिजे. वर्मा हे मुक्तिबोधांचे मोठे प्रशंसक आणि घनिष्ठ मित्र होते. मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री द्वारकाप्रसाद मिश्र यांच्याशी वर्मांनी चर्चा केली आणि त्यांना भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटल मध्ये आणले गेले. दिल्लीला हरिवंशराय बच्चन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांना भेटलो. त्यात रघुवीर सहाय, नेमीचंद्र जैन, प्रभाकर माचवे, श्रीकांत वर्मा, भारतभूषण अग्रवाल, अजित कुमार आणि मी होतो. शास्त्रीजीनी लगेच मुक्तीबोधांना ‘एम्स’ (भारतीय आयुर्विज्ञान संस्था) येथे हलवण्याचे आदेश दिले. रघुवीर सहाय यांनी तेथूनच भोपाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना फोन केला. पण मुक्तिबोध तोपर्यंत बेशुद्धावस्थेत गेले होते. दोन-तीन दिवसांनी हरिशंकर परसाई त्यांना दिल्लीला घेऊन आले. त्या बेशुद्धावस्थेतून दोन-तीन महिने ते बाहेर आलेच नाहीत. अखेरीस त्याच अवस्थेत त्यांना मृत्यू आला. मृत्युसमयी त्यांना टी.बी. झाला होता. ”
१७ फेब्रुवारी १९६४ रोजी आलेला अर्धांगवायूचा झटक्यानंतर ते आठ महीने मृत्यूशी झुंजत राहिले आणि अखेरीस ११ सप्टेंबर १९६४ रोजी रात्री त्यांचा शोकान्त झाला.
शिक्षण
संपादनगजानन माधव मुक्तिबोधांचे प्राथमिक शिक्षण उज्जैन येथे झाले. १९३८ मध्ये बी. ए.ची पदवी मिळवल्यानंतर त्यांना तेथील मॉर्डन स्कूल येथे शिक्षकाची नोकरी मिळाली. १९५४ मध्ये एम. ए.ची पदवी मिळाल्यानंतर त्यांना राजनांदगाव येथील दिग्विजय कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. येथे त्यांनी इंग्लिश, फ्रेंच, रशियन साहित्याचा अभ्यास केला. त्याच बरोबर त्यांनी रहस्यमय कथा, वैज्ञानिक कथा कादंबऱ्या यांचाही अभ्यास केला. विविध देशांचा इतिहास आणि विज्ञान-विषयक साहित्य यांची अभ्यास केला. त्यातून त्यांची 'भारत इतिहास और संस्कृति' ह्या समीक्षा ग्रंथाची निर्मिती झाली.
साहित्य
संपादनमुक्तिबोध विशेषांक
संपादनमुक्तिबोधांच्या २०१७ च्या जन्मशताब्दीनिमित मराठवाडा साहित्य परिषदेने ०८ ऑक्टोबर २०१७ रोजी परिषदेने ‘गजानन माधव मुक्तिबोध यांचे साहित्य’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. तेथे वाचल्या गेलेल्या निबंधांवर आधारित “गजानन माधव मुक्तिबोध विशेषांक’[४] प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या संपादनात प्रसिद्ध केला. या अंकात ज्येष्ठ हिंदी साहित्यिक व समीक्षक विष्णू खरे, निशिकांत ठकार आणि चंद्रकान्त पाटील यांचे तसेच, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, मुक्त पत्रकार व भाषांतरकार श्रीनिवास हेमाडे, ‘युगवाणी’चे संपादक प्रफुल्ल शिलेदार, समीक्षक चंद्रदेव कवडे, प्रा. डॉ. भारती गोरे, प्रा. राजेंद्र नाईकवाडे, प्रा.गोविंद बुरसे, राजा होळकुंदे यांचे लेख समाविष्ट आहेत.[५]
हे सुद्धा पहा
संपादन- MUKTIBODH : मुझे पुकारती हुई पुकार : गजानन माधव मुक्तिबोध : Hindi Studio with Manish Gupta
- A Centenary Celebration of Muktibodh - Ashok Chakradhar at Jashn-e-Adab Poetry Festival
संदर्भ
संपादन- ^ खरे, विष्णु (२०१८, जानेवारी-फेब्रुवारी). गजानन माधव मुक्तिबोध : सर्वश्रेष्ठ भारतीय कवी. औरंगाबाद: गजानन माधव मुक्तिबोध विशेषांक, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, संपादक : आसाराम लोमटे. pp. ०४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b नन्दकिशोर नवल (१९९६). भारतीय साहित्य के निर्माता मुक्तिबोध. नई दिल्ली: साहित्य अकादेमी, प्रथम संस्करण. pp. १०. ISBN 81-260-0018-x Check
|isbn=
value: invalid character (सहाय्य). - ^ आलोचक, अशोक वाजपेयी कवि एवं. "मुक्तिबोधः 'एक गोत्रहीन कवि'". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2018-09-12 रोजी पाहिले.
- ^ प्रतिष्ठान , गजानन माधव मुक्तिबोध विशेषांक (जानेवारी-फेब्रुवारी २०१८ , वर्ष ६६ वे, अंक तिसरा). संपादक : आसाराम लोमटे. औरंगाबाद: मराठवाडा साहित्य परिषद. pp. ०१-६८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ प्रतिष्ठान, गजानन माधव मुक्तिबोध विशेषांक (जानेवारी-फेब्रुवारी २०१८ , वर्ष ६६वे, अंक : तिसरा). संपादक आसाराम लोमटे. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)