कोथळीगड
कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर हा किल्ल्ला आहे. किल्ला छोटा आहे पण पायथ्याची गुहा मोठी आहे. गुहेचे खांब मूळ पाषाणातून कोरून काढले आहेत. गुहेमधून एक आडवातिडवा कोरून काढलेला दगडी जिना किल्ल्याच्या माथ्यावर जातो. वर जागा अगदी थोडी आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो कर्जतच्या मूळ डोंगररांगेपासून तुटून वेगळा पडलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची दोन टाकी आहेत.
कोथळीगड | |
नाव | कोथळीगड |
उंची | ४७२ मीटर/१५५० फूट |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | बिकट |
ठिकाण | महाराष्ट्र |
जवळचे गाव | पेठ(ता.कर्जत जि.रायगड) |
डोंगररांग | कर्जत-भिमाशंकर |
सध्याची अवस्था | |
स्थापना | {{{स्थापना}}} |
पेठ गावाच्या निकटतेमुळे याला ’पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. हा किल्ला ’कोथळा’ या नावानेही ओळखतात. कर्जतहून खेड-कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार, चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिधगड, माणिकगड, पिशाळगड असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा
संपादनपेठ गावातून पाऊलवाटेने वर चढत गेल्यावर कातळकड्याच्या पोटात खोदलेल्या गुहा थेट सामोऱ्या येतात. प्रथम देवीची गुहा व पाण्याचे टाके लागते नंतर आकाराने मोठी असलेली भैरोबाची गुहा लागते भैरोबाच्या गुहेत छताला आधार देणारे कोरीवकाम असलेले स्तंभ आहेत. गुहेत ४-५ ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जुने तोफेचे गोळे आहेत. गुहेजवळच किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी एका ऊर्ध्वमुखी भुयारात पायऱ्या खोदल्या आहेत.
कर्जतहून कोठिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते. येथून साधारणतः ४-५ तासात गडावर पोहचता येते.
रायगड तालुक्यातल्या कर्जत(पूर्व) रेल्वे स्टेशनपासून कशेळेमार्गे जाणारी आंबिवले बस आहे. आंबिवलीजवळ एक छान तळे आहे. तिथून चढ लागतो. तीन किलोमीटरवर पेठ गाव लागते. कोठळीगडाचा हा पायथा आहे. थोड्याशा बिकट चढणीने किल्ल्याच्या माथ्यावर पोचता येते. खाली तळात काही पंचरसी तोफा पडल्या आहेत. या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांदरे खिंडीत जाण्यास पायवाट आहे.
इतिहास
संपादनशिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचे सैन्य कापून काढले.
हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूर वीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला; त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले.
संदर्भ
संपादन- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- Trek the Sahyadris - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- नकाशा : http://wikimapia.org/406669/