माणिकगड

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला

माणिकगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

माणिकगड किल्ला

सिंहगड
माणिकगड किल्लाचे ठिकाण दाखविणारा नकाशा
माणिकगड किल्लाचे ठिकाण दाखविणारा नकाशा
माणिकगड किल्ला
गुणक 18°29′N 73°07′E / 18.49°N 73.11°E / 18.49; 73.11
नाव माणिकगड किल्ला
उंची 760 मीटर
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पेण, रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव पाताळगंगा
डोंगररांग सह्याद्री
सध्याची अवस्था अर्धभग्न
स्थापना अज्ञात


मुंबई - पुणे हमरस्त्यावरून जातांना पातळगंगा एम. आय. डी. सी.च्या जवळ असल्याने माणिकगडाच्या पायथ्याच्या वडवली गावापर्यंत जाण्यासाठी वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

पहाण्याची ठिकाणे :

पायथ्याच्या वडगावातून गावाच्या मागील डोंगराआडून डोकावणारा माणिकगडाचा माथा दिसतो. परंतु तेथे पोहोचण्यासाठी माणसाला द्राविडी प्राणायाम करावा लागतो. प्रथम गावामागचा डोंगर चढून गेल्यावर माणूस ठाकरवाडीत पोहोचतो. ठाकरवाडीतून लांबलचक पठार पार करून किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते. तेथून दाट झाडीतील खड्या चढणीची वाट चढून किल्ल्याला पूर्ण वळसा घालून किल्ल्याच्या वडगावातून दिसणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूस येता येते. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज दिसायला लागतात. येथे सपाटीवर पाण्याचे एक टाके आहे. त्याच्या बाजूने पुढे जाऊन थोडे चढून गेल्यावर पूर्वेकडून तुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश होतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच चुन्याचा घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतो. पूर्वी या ठिकाणी घाण्याचे दगडी चाक होते. आता ते गडावर दिसत नाही. चुन्याच्या घाण्याजवळच त्याची छोटी प्रतिकृती कोरलेली आहे. चुन्याच्या घाण्याजवळून दोन वाटांनी किल्ला पाहाता येतो. सरळ चालत गेल्यास माणूस उत्तराभिमुख प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. गडाचा दरवाजा, पाहारेकऱ्यांसाठी असणाऱ्यां देवड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. दरवाजाच्या आतल्या बाजूस घुमटी आहे. त्यात एक शेंदूर फ़ासलेली मूर्ती ठेवलेली आहे.

गडाच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूस गडाचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाची चौकट अजून शाबूत आहे. द्वारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. दरवाजा ओलांडून आत गेल्यावर गडाचा सर्वोच्च माथा येतो. येथे उजव्या बाजूस मोठ्या वास्तुचे अवशेष आहेत. त्याच्या पुढे गडावरील सर्वात मोठे टाके आहे. ते पाहून दरी उजवीकडे ठेवत पुढे गेल्यावर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्यावर गडाच्या उत्तर टोकावरील उद्ध्वस्त बुरुजावर आपण पोहोचतो. येथुन उजवीकडे वळून (दरी डाव्या बाजूस ठेवून) चालत गेल्यास प्रथम उध्वस्त चोर दरवाजा दिसतो. पुढे गेल्यावर उजव्या बाजूस पाण्याची २ बुजलेली टाकी आहेत. त्याच्या पुढे खोलगट भागात उघड्यावर शंकराची पिंड आणि नंदी आहे. तेथेच एक शेंदूर फ़ासलेली भग्न मूर्ती आहे. त्यापुढे रांगेत चार टाकी आहेत. त्यातील छोट्या टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. याशिवाय या टाक्यांसमोरच दरीच्या बाजूस एक शेंदूर फ़ासलेला दगड दिसतो तेथे दरीच्या खालच्या अंगाला एक टाके आहे.

टाके पाहून पुढे गेल्यावर पूर्व टोकावरील बुरुज लागतो. या बुरुजाच्या बाजूला असलेल्या तुटक्या तटबंदितूनही गडावर येता येते. परंतु त्यासाठी कातळ टप्पा व घसाऱ्याची वाट चढून जावे लागते. पावसाळ्यात या मार्गाने येणे टाळतात. बुरुजावरून तटबंदीच्या बाजूने चालत जातांना ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली दिसते. पुढे गडाच्या सर्वोच्च माथ्यावरच्या बुरुज लागतो. गडावरील सुस्थितीत असलेल्या या बुरुजाला चर्याही आहेत. या बुरुजाच्या पुढे पायऱ्या आहेत. या ठिकाणी उद्ध्वस्त दरवाजाचे अवशेष आहेत. गडाच्या आतील भागात असलेले या दोन दरवाजे पाहून असे अनुमान काढता येते की गडाच्या सर्वोच्च माथ्याला तटबंदी होती. या दरवाजातून खाली उतरल्यावर पुन्हा गड जिथून पाहायाला सुरुवात केली त्या जागेपाशी माणूस येऊन पोहचतो. किल्ल्यावरून उत्तरेला प्रबळगड, इरशाळगड, माथेरान, वायव्येला कर्नाळा आणि ईशान्येला सांकशीचा किल्ला हा परिसर दिसतो. संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.

पोहोचण्याच्या वाटा :

पनवेलमार्गे किंवा खोपोलीमार्गे माणिकगडाच्या पायथ्याच्या वडवली गावात जाता येते. वडवली पातळगंगा एम. आय. डी. सी.च्या जवळ असल्याने वहातुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

पनवेल मार्गे :- पनवेलहुन दोन मार्गांनी माणिकगडच्या पायथ्याच्या वडवली गावापर्यंत जाता येते.

१) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ कि.मी.आहे.

२) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - सावळा फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २० कि.मी. आहे.

३) पनवेल - मुंबई पुणे महामार्ग - दांड फाटा - रसायनी - पाताळगंगा एम.आय.डी.सी - सवणे यामार्गे १० कि.मी आहे .

पनवेल - वाशिवली बस दर अर्ध्या तासाने आहेत. तसेच दांड फ़ाटा व सावळा फ़ाटा या फ़ाट्यावरून ६ आसनी रिक्षाने थेट वडवलीपर्यंत जाता येते.

खोपोली मार्गे :- खोपोलीहून - चौक - दांड फ़ाटा - रसायनी - पाताळगंगा एम. आय. डी. सी.- वाशिवली -वडगाव यामार्गे अंतर २५ कि.मी.आहे.

राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : वडगावमार्गे २ तास लागतात.

बाह्य दुवे

संपादन