उल्हास नागेश कशाळकर

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक
(उल्हास कशाळकर या पानावरून पुनर्निर्देशित)

उल्हास कशाळकर (जानेवारी १४, इ.स. १९५५ - हयात) हे नामवंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत.

उल्हास नागेश कशाळकर
आयुष्य
जन्म जानेवारी १४, इ.स. १९५५
जन्म स्थान पांढरकवडा, नागपूर, भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गुरू राजाभाऊ कोगजे
पी. एन. खर्डेनवीस
राम मराठे
गजाननबुवा जोशी
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,
घराणे ग्वाल्हेर
आग्रा
जयपूर
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
गौरव
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. २००८
भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्कार, इ.स. २०१०.

पूर्वजीवन

संपादन

उल्हास कशाळकरांचा जन्म नागपूर जवळील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी झाला. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. कशाळकरांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात त्यांना राम मराठ्यांकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.

सांगीतिक कारकीर्द

संपादन

उल्हास कशाळकरांनी दूरदर्शनआकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी इ.स. १९८३ ते १९९० चे दरम्यान काम केले. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय टी सी संगीत संशोधन अकादमीत आचार्य पद स्वीकारले व आजवर ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरुपदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत.

त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात इ.स. २००६ मध्ये, तर अ‍ॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात इ.स. २००८ मध्ये ते सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.

सन्मान व पुरस्कार

संपादन
  • वि.वि.द. (विष्णू दिगंबर पलुसकर, विनायकराव पटवर्धन आणि द.वि. पलुसकर) संगीत समारोहात पं विष्णू दिगंबर पलुसकर स्मृती पुरस्कार (१९-१२-२०१७)
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. २००८
  • भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्कार, इ.स. २०१०
  • मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान. इ.स. २०१७

बाह्य दुवे

संपादन

आय टी सी संगीत संशोधन अकादमी संस्थळ (इंग्रजी मजकूर)