प्रा. इरिना पेट्रोव्हना ग्लुश्कोव्हा (९ ऑगस्ट, इ.स. १९५२ - ) या महाराष्ट्राच्या रशियातील सांस्कृतिक दूत (ब्रँड अ‍ॅम्बेसिडर) आहेत. ही नियुक्ती १५ जुलै २०१६ रोजी करण्यात आली.[][]

प्रा. ग्लुश्कोव्हा या मॉस्को येथील ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मराठी भाषेच्या संशोधिका म्हणून काम करीत असून त्यांचा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचनांचा अभ्यास आहे. १९७० पासून त्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी संबंधित आहेत.

महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठ्ठलावर त्यांचे विशेष संशोधन आहे. प्रा. ग्लुश्कोव्हा यांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेविषयी वाटणाऱ्या आस्थेमुळे आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या पालखी परंपरेचा सखोल अभ्यास केला आहे. मराठ्यांचा इतिहास हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. हा अभ्यास करण्याकरिता त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडी लिपीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.[]

भारतविद्येच्या अभ्यासक ग्लुश्कोव्हा या काही काळ मॉस्को विद्यापीठामध्ये हिंदीच्या प्राध्यापिका होत्या. संत तुकारामांच्या अभंगांचा अनुवाद करण्यासाठी १९८५ मध्ये त्या काही दिवस पुण्यात राहिल्या. या काळामध्ये त्या मराठी बोलायला शिकल्या. मॉरिशस येथील मराठी मंडळामध्ये १९८९ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेत त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव केला होता.[]

स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडाच्या ६१ व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीचा संस्कृतमध्ये उल्लेख आहे. १२३ श्लोकांमध्ये अप्पा वैद्य यांनी १८५६ मध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहिलेले ११ पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पोथीरूपामध्ये आहे. या हस्तलिखिताचा अभ्यास करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरिना ग्लुश्कोव्हा यांनी मॉस्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वार्षिकांकामध्येही त्यांनी या विषयावर लेखन केले होते.

एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात कीर्तनकार सदानंदबुवा कुलकर्णी यांनी ‘आमची आळंदी’ हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. यामध्ये १८ अध्याय असून सुमारे दोनशे ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरिना ग्लुश्कोव्हा यांनी पाहिले होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा रशियातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक दूत".
  2. ^ a b "प्रा. इरिना ग्लुश्कोव्हा राज्याच्या सांस्कृतिक दूत".[permanent dead link]