विश्वनाथ काशीनाथ राजवाडे

महाराष्ट्रातील प्रख्यात इतिहासकार, लेखक, वक्ते
(इतिहासाचार्य राजवाडे या पानावरून पुनर्निर्देशित)

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जन्म : २४ जून १८६३; - ३१ डिसेंबर १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
जन्म नाव विश्वनाथ काशीनाथ राजवाडे
जन्म २४ जून इ.स. १८६३
वरसई, रायगड जिल्हा
मृत्यू ३१ डिसेंबर इ.स. १९२६
धुळे
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास
प्रसिद्ध साहित्यकृती मराठ्यांच्या इतिहासाची साधने
भारतीय विवाह संस्थेचा इतिहास

वि. का. राजवाडे यांचा जन्म महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील वरसई येथे झाला. []

बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्लिश भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी जानेवारी १८९४ मध्ये भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. त्याच्या उपोद्घातामध्ये हे मासिक सुरू करण्यामागे आपला उद्देश स्वभाषेची सेवा आणि त्यायोगे होणारी देशसेवा आहे असे त्यांनी सांगितले आहे.[]

१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.

३१ डिसेंबर १९२६]] रोजी राजवाडे यांचे निधन झाले.

राजवाडे म्हणायचे - ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेलाो नाही.

राजवाडे ह्यांचे जन्मवर्ष

संपादन

राजवाडे ह्यांच्या जन्माच्या वर्षाबाबत थोडा गोंधळ झालेला दिसतो. त्यांच्याविषयीच्या विविध लेखनांत त्यांचे जन्मवर्ष वेगवेगळे दिलेले आढळते[].

राजवाडे ह्यांच्या मृत्यूनंतर द. वा. पोतदार ह्यांनी केसरीत लिहिलेल्या लेखात त्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८६ अशी नोंदवलेली आढळते[]. ह्यानुसार इ. स. १२ जुलै १८६४ हा दिनांक[] मिळतो.

मात्र राजवाड्यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ब्राह्मण-पत्रिकेच्या राजवाडे तिलांजली अंकात वा. दा. मुंडले ह्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार राजवाडे ह्यांनी मुंडल्यांना आपला जन्मशक १७८५ असा सांगितला होता. त्याबाबत मुंडले ह्यांनी पोतदार ह्यांच्याकडे विचारणा केली आणि राजवाड्यांचे थोरले बंधू वैजनाथपंत राजवाडे ह्यांच्याकडे त्यांना विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारणा केली असता राजवाडे ह्यांची एक जन्मपत्रिका वैजनाथपंत ह्यांनी पोतदारांना उपलब्ध करून दिली. ती मुंडले ह्यांच्या लेखात छापली असून त्यावर राजवाड्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८५ अशी नोंदवलेली आहे[]. इसवी सनानुसार हा दिनांक २४ जून १८६३ असा आहे[]. दत्तोपंत पोतदार ह्यांनीही नंतरच्या काळात ह्याच तिथीचा उल्लेख केलेला आढळतो [].

ह्याव्यतिरिक्त १२ जुलै १८६३[] आणि २४ जुलै १८६३[१०] असे दोन दिनांक राजवाडे ह्यांचे जन्मदिनांक म्हणून नोंदवलेले आढळतात. मात्र त्यांचे आधार नोंदवलेले आढळत नाहीत[११]. त्यामुळे उपलब्ध पुरावे पाहता आषाढ शु. ८, शके १७८५ (२४ जून १८६३) हाच दिनांक राजवाडे ह्यांचा जन्मदिनांक असावा असे म्हणता येते.

राजवाड्यांचा दरारा

संपादन

महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार के.सी. ठाकरे, विठ्ठल रामजी शिंदे, जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. नंतरही इतिहाससंशोधक त्र्यं.शं. शेजवलकर यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचे वाक्‍य न्‌ वाक्य ब्रह्मवाक्‍य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्‍वात याच वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे राजवाडे यांचे स्थान अबाधित राहिले.

राजवाड्यांचे लेखन आणि प्रस्तावना

संपादन
 
विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे मोडी लिपीतील हस्ताक्षर

राजवाडे यांच्या नावावर स्वतंत्र असा एकही ग्रंथ नाही. त्यांनी नियतकालिकांमधून किरकोळ स्वरूपाचे लेख लिहिले. ‘महिकावतीची बखर’ आणि ‘राधामाधवविलास चंपू’ या प्राचीन ग्रंथांचे संपादन केले आणि मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली. त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे. ज्यांना या प्रस्तावना आवडल्या नाहीत, त्यांनाही राजवाडे यांनी अविश्रांत कष्ट घेऊन, प्रचंड भ्रमंती करून जमा केलेल्या इतिहासाच्या साधनसामग्रीसाठी त्यांच्या ऋणात राहण्यावाचून पर्यायच नव्हता.

राजवाडे यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ या पुस्तकाची प्रस्तावना मूळ पुस्तकापेक्षा अधिक वाचनीय आहे. असेच त्यांच्या बहुतेक पुस्तकांबद्दल म्हणता येईल.

प्रतिभाशक्ती आणि आत्मविश्वास

संपादन

राजवाडे बुद्धिमान तर होतेच; पण त्यांना प्रतिभाशक्तीचीही देणगी लाभली होती. जबरदस्त आत्मविश्‍वास हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्यामुळं साधा अंदाज किंवा कयाससुद्धा ते अशा पद्धतीने व अशा आक्रमकपणाने मांडत, की जणू काही तो त्रिकालाबाधित सत्य असलेला महासिद्धान्तच आहे.


प्रकाशित साहित्य

संपादन
  • भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास Archived 2021-08-31 at the Wayback Machine.
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १ -मराठी भाषा व व्याकरण
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड २ -मराठी ग्रंथ व ग्रंथकार
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ३ -संस्कृत भाषा विषयक
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ४ -अभिलेख संशोधन
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ५ -मराठी धातुकोष
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ६ -व्युत्पत्ती कोष
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ७,८ -समाजकारण व राजकारण
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ९ - आत्मवृत्त व लेख
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १० -प्रस्तावना खंड
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड ११ -इतिहास
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १२ -संपादक राजवाडे
  • इतिहासाचार्य वि.का.राजवाडे समग्र साहित्य खंड १३ -समग्र संत साहित्य
  • खानदेशातील घराणी
  • तीर्थरूप शहाजीराजे भोसले यांचे चरित्र
  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
  • राजवाडेनामादिशब्द व्युत्पत्तिकोश
  • राजवाडे लेखसंग्रह (संपादक - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी; साहित्य अकादमी प्रकाशन)
  • राधामाधवविलासचंपू (संपादन आणि प्रस्तावना)
  • संस्कृत प्रतिशब्दशः भाषांतर
  • संस्कृत भाषेचा उलगडा
  • ज्ञानेश्वर नीति कथा
  • ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता) : अध्याय १ (२३ पानी प्रस्तावनेसह), ४, १२
  • ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण

संस्थात्मक कार्य

संपादन

वि.का. राजवाडे यांच्यावरील पुस्तके

संपादन
  • ब्राह्मण पत्रिकेचा राजवाडे तिलांजली अंक (राजवाडे यांच्या मृत्यूसंबंधी प्रमुख वर्तमानपत्रांचे व प्रसिद्ध पुरुषांचे अभिप्राय; दुर्मीळ छायाचित्रे)
  • राजवाडे यांचे चरित्र व राजवाड्यांच्या दोन तपांचा विद्वत्सहवास (लेखक - भा.वा. भट)
  • राजवाड्यांचा रामदास : (राजवाडे लेखसंग्रहाअंतर्गत, संपादन द.वा. पोतदार)
  • इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र (लेखक - साने गुरुजी)

वि.का.राजवाडे यांचे इतिहास संशोधन मंडळ

संपादन
  • इतिहास संशोधनासाठी वि.का. राजवाडे यांनी पुणे येथे ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले.

वि.का.राजवाडे यांचे इतिहासातिल कार्य

संपादन
  • मानवी इतिहास काल व स्थल यांनी

बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हणले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार* विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे.

  • काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी

सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.

             _अंतिम चित्रण 
  • इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण

अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत.


  • मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.
  • त्यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन.
  • केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धेयांच्याच हकिकती नव्हेत’’, असे त्यांचे मत होते.
  • अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

_संदर्भ - इतिहास व राज्यशास्त्र

      इयत्ता दहावी पाठ्यपुस्तक

संदर्भ

संपादन
  1. ^ राजवाडे, २०१७ पृ. एक.
  2. ^ डॉ. नंदकुमार मोरे (२८ नोव्हेंबर २०१७). "अनुवादाचे सांस्कृतिक महत्त्व". दै. सकाळ, सप्तरंग पुरवणी.
  3. ^ देवळेकर & २०२१ पृ. २२-२८.
  4. ^ पोतदार & १९२७ पृ. ८.
  5. ^ मोडक & १८८९ पृ. ३३८.
  6. ^ मुंडले & १९२७ पृ. ८.
  7. ^ मोडक & १८८९ पृ. ३३५.
  8. ^ पोतदार & १९६५ पृ. ७.
  9. ^ खानोलकर & १९६३ पृ. ९१.
  10. ^ कुलकर्णी & २००७ पृ. ५१.
  11. ^ देवळेकर & २०२१ पृ. २७-२८.

संदर्भसूची

संपादन
  • कुलकर्णी, अ. रा. (२००७). "विश्वनाथ काशिनाथ राजवाडे : व्यक्ती आणि कार्य". मराठ्यांचे इतिहासकार ((२०११ पुनर्मुद्रण) ed.). पुणे: राजहंस.
  • खानोलकर, गंगाधर देवराव (१९६३). "विश्वनाथ काशीनाथ राजवाडे". अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक (खंड ६ भाग २). पुणे: व्हीनस प्रकाशन.
  • पोतदार, दत्तो वामन (४ जानेवारी १८२७). "कै. वि. का. राजवाडे". केसरी.
  • पोतदार, दत्तो वामन (१९६५). "वि. का. राजवाडे". राजवाडे दर्शन. पुणे: मॉडर्न बुक डेपो प्रकाशन.
  • भट, भास्कर वामन (२०१०). राजवाडे-चरित्र (२री आवृत्ती ed.). धुळे: वि. का. राजवाडे संशोधन मंडळ (प्रकाशित १० जून २०१०).
  • मुंडले, वासुदेव दामोदर (१८२७). "कै. राजवाड्यांची जन्मपत्रिका". ब्राह्मण-पत्रिका (राजवाडे तिलांजली अंक).
  • मोडक, बाळाजी प्रभाकर (१८८९). शक व सन यांची तिथि व तारिखवार जंत्री. पुणे व कोल्हापूर: बाळाजी प्रभाकर मोडक.
  • राजवाडे, विश्वनाथ (२०१७). भारतीय विवाह संस्थेचा इतिहास. लोकवाङ्मयगृह.

बाह्य दुवे

संपादन