हॅरी पॉटर
हॅरी पॉटर ही जे.के. रोलिंग ह्या ब्रिटिश लेखिकेने तयार केलेली ७ कादंबऱ्यांची शृंखला आहे. ह्या पुस्तकांमधील काल्पनिक कथानकात हॅरी पॉटर हा जादूगार मुलगा आपला मित्र रॉन विजली व मैत्रिण हर्माइनी ग्रेंजर ह्यांच्यासोबत हॉगवॉर्ट्ज जादू आणि तंत्र विद्यालय नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेत शिकत असतो. त्याच्या साहसाची, जादू कौशल्याची व लॉर्ड वोल्डेमॉर्ट ह्या बलाढ्य व दुष्ट जादूगाराशी त्याच्या लढ्याची एकसंध कथा ह्या ७ पुस्तकांतुन जे.के. रोलिंगने वर्णन केली आहे.
१९९७ साली हॅरी पॉटर शृंखलेतील पहिले पुस्तक हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफेर्स स्टोन या नावाने प्रकाशित झाले व त्यानंतर हॅरी पॉटरची लोकप्रियता वाढतच राहिली. जून २००८ अखेरीस हॅरी पॉटर पुस्तकांच्या ४० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत व हॅरी पॉटर शृंखला ६७ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे. हॅरी पॉटरच्या एकूण सात कादंबऱ्या मंजुषा आमडेकर यांनी मराठीत भाषांतरित केल्या आहेत.[१]
कथानक
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हॅरी पॉटरच्या कथेची सुरुवात हॅरीच्या अकराव्या वर्षात पदार्पण करण्यापासून होते. हॅरी लहानपणापासून लिटील व्हीन्गिंग, सरे ह्या काल्पनिक गावात आपली मावशी पेटुनिया, काका आणि मावस भाऊ डडली - या डर्सली कुटुंबात राहात असतो. त्या घरी त्याला कस्पटासमान वागणूक मिळत असते. अकराव्या वर्षी त्याला रुबियस हॅग्रिड नावाच्या अर्धदानवाकडून कळते की आपण एक जादूगार आहोत आणि ह्या विश्वाला समांतर असे एक जादूचे विश्व आहे. जी मुले जादूगार किंवा जादूगारीण असतात त्यांना जादूचे धडे घ्यायला शाळेत बोलावले जाते. हॅरीला हॉगवर्ट्स नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेतून प्रवेशासाठी निमंत्रण येते. तिथे त्याला रॉन व हर्माइनी हे मित्र भेटतात. त्याला हेही कळते की त्याच्या आई वडिलांना (जेम्स पॉटर व लिली पॉटर) वॉल्डेमॉर्ट नावाच्या दुष्ट जादुगाराने, (जो कथानकाचा खलनायक आहे) तो अवघा एक वर्षाचा असताना, ठार मारलेले असते व हॅरीला मारण्याचा प्रयत्न करताना तो मरणासन्न अवस्थेत पोचलेला असतो.
पहिल्या पुस्तकात वोल्डेमॉर्ट प्रोफेसर क्विरलच्या देहाला वश करून अद्भुत असा परीस हॉगवर्ट्समधून चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती व शरीर परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्याचा तो प्रयत्न हाणून पाडतो.
दुसऱ्या भागात टॉम रिडलची डायरी रॉनची छोटी बहीण जिनी विझलीला आपल्या दुष्ट जादूच्या प्रभावाखाली आणते व तिच्याकरवी गुप्त तळघर उघडविते. त्या तळघरामध्ये असलेला कलदृष्टी हॉगवर्ट्समधील मगलू विद्यार्थ्यांवर हल्ले करु लागतो. हॅरी रॉनच्या सहाय्याने तळघराचा शोध लावतो व तळघर उघडतो आणि गॉडरीक ग्रिफिन्डोरची तलवार वापरून त्या सर्पाला ठार मारतो व मारलेल्या कालदृष्टी सुळा वापरून टॉमची डायरी नष्ट करतो आणि जिनीचे प्राण वाचवतो.
तिसऱ्या भागात हॅरीला कळते की सिरियस ब्लॅक नावाचा कैदी अझ्काबान तुरुंगातून पळाला आहे व तो हॅरीच्याच मागावर आहे. त्यामुळे हॉग्वार्ट्झला डिमेंटर्स सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते जे अझ्काबानचे रक्षक असतात. डिमेंटर्सच्या अवतीभवती येणाऱ्या कुणाच्याही आनंदाच्या आठवणी शोषून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेच्या बाहेर पडण्यास बंदी असते. त्याच सुमारास हॉगवार्ट्स मध्ये काळ्या / गुप्त कलांपासून बचाव हा विषय शिकविण्यासाठी रिमस ल्युपिन नावाच्या एका नव्या शिक्षकाची नेमणुक होते. हॅरीला कळते की डिमेंटर्स शक्तीचा प्रभाव आपल्यावर सर्वात जास्त पडत आहे . त्यापासून बचाव करण्यासाठी तो रिमसकडुन पितृदेव मंत्र शिकून घेतो व आत्मसात करतो, हे आजवर अनेक कुशल म्हणवणाऱ्या जादुगारांनाही शक्य झालेले नसते.सर्वसाधारणरीत्या विद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकवला जाणारी ही कठीण जादू हॅरी अवघ्या 13 व्या वर्षी आत्मसात करतो . शेवटी हॅरीचा सामना सिरियसशी होतो, तेथे त्याला कळते की सिरियस हा हॅरीचा शत्रू नसून हितचिंतक असतो व तरुणपणी तो हॅरीचे वडील जेम्सचा व ल्युपिनचा मित्र असतो. त्यांचा चौथा मित्र पीटर पेटीग्र्यू ने हॅरीच्या आईवडिलांचा विश्वासघात केलेला असतो व जेम्स व लिलीच्या लपण्याचे ठिकाण त्याने वोल्डेमॉर्टला सांगितले असते. शिवाय चतुरपणे त्याने सिरियस गुन्हेगार सिद्ध होईल अशी चाल खेळलेली असते . जगाच्या लेखी पेटीग्र्युला सिरियसने ठार मारले , त्याला वीरमरण आले पण प्रत्यक्षात पेटीग्र्यु पाळीव उंदराच्या रूपात 12 वर्षे रॉनच्या घरात राहत असतो. याच भागात हॅरीला समजतं की वेअरवुल्फ / नरलांडगा असलेल्या रिमसला मदत करण्यासाठी त्याचे वडील जेम्स आणि त्यांचे 2 मित्र सिरियस आणि पीटर पेटीग्र्यु यांनी प्राण्यामध्ये रूपांतरीत होण्याची अत्यंत कठीण जादू शिकून घेतली होती व सत्य हे चौघे वगळता कोणालाही ठाऊक नव्हतं . याच प्राणिरूपाचा फायदा पीटरने घेतला . हे सत्य कळल्यावर हॅरी व त्याचे मित्र पीटरला डिमेंटर्सच्या हवाली करण्यास निघतात. परंतु पौर्णिमेचा चंद्र पाहताच ल्युपिन वेअरवुल्फ / नरलांडग्यामध्ये परिवर्तित होतो व ह्या गोंधळाचा फायदा उठवून पीटर त्यांच्या तावडीतून निसटतो. सिरियस मग सुटकेसाठी पुरावे नसल्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी भुमिगत होतो.
चौथ्या भागात एक आझकाबांच कैदी mr. बर्टी क्राऊच ज्युनिअर का रूपांतर रसाच्या साह्याने मड आय मुडीच रूप घेतो व शाळेत शिकवण्यास येतो. त्याच वर्षी शाळेत त्रीशालंत्रगत जादुई खेळाच्या प्रतियोगिता असते.
जादू / मॅजिक
संपादनहॅरी पॉटर मधली जादूची संकल्पना फार विस्तृत आहे .
ही एक अतिन्द्रिय / अनैसर्गिक शक्ती आहे . ही शक्ती जनुकांमधून व्यक्तीत येते अशी संकल्पना मांडली आहे . उदा . आई व वडील दोघांमध्ये ही शक्ती असल्यास मुलामध्ये ती येण्याची शक्यता 99 % असते . दोघांपैकी एकातच ही शक्ती असल्यास ती मुलांमध्ये येण्याची शक्यता - संभाव्यता काही प्रमाणात कमी होते . कदाचित अशा दाम्पत्याच्या 3 मुलांपैकी एकामध्येच ही शक्ती येऊ शकते किंवा तिघांतही . पण जर एकातच आली तर उरलेल्या 2 मुलांच्या अपत्यांमध्ये ती येणारच नाही असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही . शिवाय आई व वडील दोघांतही ही शक्ती नाही व कुटुंबात अनेक पिढ्यांत कुणातही ही शक्ती नव्हती अशा दाम्पत्याच्या पोटीही ही शक्ती असलेली मुलं जन्म घेतात . अर्थात याचं प्रमाण खूप कमी असतं .
ही शक्ती असलेल्या व्यक्ती कोणत्याही शिक्षणाशिवाय लहानसहान जादू करू शकतात किंवा बऱ्याचदा ठरवून काही करण्यापेक्षा अशी जादू आपोआपच होते . याला अपघाती जादू असे नाव दिले आहे . ही शक्ती असलेली मुले वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षांपासून हे अपघाती जादू दाखवू लागतात . उदाहरणार्थ . पहिल्या पुस्तकात हॅरीची मावशी त्याचे केस अगदी बारीक आणि वाईट पद्धतीने कापते , उद्या शाळेत सगळे चेष्टा करणार ह्या विचाराने त्याला रात्रभर झोप लागत नाही , सकाळी त्याचे केस होते तसे वाढलेले असतात . यावेळी आपण जादूगार आहोत हे त्याला माहीतही नसतं . खूप राग आल्यास किंवा खूप भीती वाटल्यास अशी जादू ह्या मुलांकडून होते .
पण ह्या नियंत्रण नसलेल्या जादूचा तसा काही उपयोग नसतो . ही नियंत्रणाखाली आणून वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरण्याकरता छडी खरेदी करावी लागते ( ह्या विशिष्ट छड्या बनवणारे काही तज्ज्ञ जादूगार असतात , छडी बनवण्याचे शास्त्र हा एक वेगळाच विषय आहे ) आणि जादूविद्या शिकवणाऱ्या विद्यालयात जाऊन 7 वर्षे जादूच्या वेगवेगळ्या शाखांचं शिक्षण घ्यावं लागतं .
मगलू
संपादनवर उल्लेखलेली शक्ती असलेले लोक म्हणजे जादूगार . त्यांनी ही शक्ती नसलेल्या लोकांना म्हणजे बहुसंख्य लोकसंख्येला मगलू हे नाव दिलं . मगलू म्हणजे ज्यांच्यात जादू नाही ते लोक . मगलू लोकांमध्ये जादूगारांबद्दल प्रचंड भीती असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून जादूगार समाज अज्ञात राहतो .
जादूगार समाज
संपादनजादूगार समाज म्हणजे जादू करू शकणाऱ्या लोकांचा समाज . ज्यांच्या अनेक पिढ्या जादूगारच होत्या अशा लोकांनी मगल समाजापासून स्वतःला लांब ठेवलं , लपवून / अज्ञात ठेवलं . मगल लोकांसमोर जादूगार समाजाचं / जादूचं अस्तित्त्व उघड होऊ द्यायचं नाही हा जादूगार समाजाचा सर्वात मोठा नियम / कायदा आहे .
जादू मंत्रालय
संपादनजादू मंत्रालय जादूगार समाजाचे वेगवेगळे प्रश्न हाताळतेच .. उदा . जादुई प्राण्यांची व्यवस्था , जादूच्या वस्तूंवरचे नियम , गुन्हेगार जादूगारांवर कारवाई करणे इ इ . पण त्याचे सर्वात मोठे काम म्हणजे मगल समाजापासून जादूगार समाजाचे अस्तित्त्व लपवून ठेवणे . त्यासाठी अनेक कुशल , बुद्धिमान विशेष गुणवत्ता प्राप्त केलेले जादूगार या मंत्रालयाच्या विविध शाखांमध्ये काम करतात .
अझ्काबान
संपादनहा जादूगारांसाठीचा तुरुंग एका ओसाड बेटावर आहे याचे पहारेकरी म्हणजे डिमेन्टर्स हे जादुई जीव .
डिमेन्टर - डिमेन्टर ह्या जादुई जीवाची निर्मिती लेखिकेने डिप्रेशन ह्या मानसिक आजारावरून केली आहे . डिमेन्टर जवळ येताच व्यक्तीला अतिशय उदास , दुःखी , वाईट वाटू लागते ... आयुष्यात घडून गेलेल्या सगळ्या वाईट घटना आठवू लागतात , आपण आता कधीच आनंदी होऊ शकणार नाही अशी त्याची खात्री पटते . हे डिमेन्टर व्यक्तीचा आनंद , उत्साह , आयुष्यावरचं प्रेम सगळं शोषून घेतं , तेच त्याचं अन्न आहे . डिमेन्टरना भलेभले कुशल जादूगारही थरथर कापतात . ह्याच्याशी सामना करणं फार कठीण आहे पण अशक्य नाही . त्याला पळवून लावण्याचा एक मंत्र आहे . अर्थात छडी हलवून मंत्र म्हटला कि ते पळून जातं एवढं हे सोपं नाही . त्यासाठी जादूगार अतिशय खंबीर मनाचा असणं आवश्यक आहे कारण डिमेन्टर समोर येताच लढण्याची शक्ती फार कमी होते , गळून जायला होतं . अगदी निपुण म्हणवणारे जादूगारही ह्या मंत्राचा यशस्वी वापर करण्यात अयशस्वी होतात . हा मंत्र आयुष्यातल्या अतिशय सुखद प्रिय अशा एखाद्या आठवणीवर पूर्ण लक्ष केंद्रित करून , डीमेंटरच्या दुःखद प्रभावाने प्रभावित न होता , सर्वशक्तिनिशी त्याला घालवून लावण्याची इच्छा करून म्हटला तरच यशस्वी होतो .
अझ्काबानमध्ये जादूचा गुन्हेगारीसाठी वापर केलेल्या जादूगारांना कैदी म्हणून ठेवलं जातं , छडी जप्त केलेली असते त्यामुळे ते या मंत्राचा उपयोगही करू शकत नाहीत , थोड्याच दिवसात ते आपलं मानसिक संतुलन हरवून बसतात . डिमेन्टरकडून दिली जाणारी सर्वात वाईट शिक्षा म्हणजे kiss of dementor , डिमेन्टरचं चुंबन ... ज्यात ते व्यक्तीचा आत्मा शोषून घेतं . सर्वात भयानक गुन्हेगारांनाच ही शिक्षा दिली जाते . व्यक्ती मरत नाही पण केवळ शरीर जिवंत राहातं , आतली अस्मिता नष्ट होते . डिमेन्टर्स वर जादू मंत्रालयाने नियंत्रण प्राप्त करून त्यांना आपल्या सेवेत घेतलं आहे . हे नियंत्रण त्यांनी नाखुशीनेच स्वीकारलं आहे , अर्थात यात त्यांचा फायदा आहेच पण नियंत्रण नसतं तर ते स्वतंत्र पणे जादूगार आणि मगल समाजात विहरले असते आणि लोकांचं सुख आनंद शोषून घेत राहिले असते .
शुद्ध रक्त , अर्ध रक्त आणि अशुद्ध रक्त संकल्पना
संपादनजादूगार / अलौकिक शक्ती असलेल्या लोकांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी आहे . जादूगार समाजात काही घराणी अशी होती की ज्यांच्या आधीच्या सगळ्या पिढ्या जादूगार होत्या , त्यांनी हा वारसा जपण्याचा फार प्रयत्न केला ... म्हणजे दोन्ही पालक मगल आहेत अशा जादूगाराशी लग्न करायचं नाही , नाईलाजच झाल्यास एक हाफ ब्लड घराण्यातील जोडीदार स्वीकारायचा आणि मगल तर नाहीच नाही . जेणेकरून अपत्य जादूगार नसण्याची संभाव्यता शून्य होईल . हे स्वतःला प्युअर ब्लड म्हणवून घेत .
ह्या घराण्यांतील काही घराण्यांच्या मते ज्यांच्या कुटुंबात मगल जोडीदार किंवा मगल कुटुंबात जन्मलेला जादूगार जोडीदार म्हणून निवडला जातो अशी कुटुंबे ही अनेक पिढ्या जादूगारच असलेल्या कुटुंबांपेक्षा कमी व हलक्या दर्जाची , अशुद्ध रक्ताची आहेत व अशी भेसळ घडवून आणणे हे एकप्रकारचे घृणास्पद कार्य आहे .
एक पालक मगल व दुसरा जादूगार किंवा दोन्ही पालक जादूगार पण आजी आजोबा पैकी कोणीतरी मगल असून जी मुले जादुई गुण घेऊन जन्माला आली त्या सगळ्यांसाठी हाफ ब्लड ही संज्ञा . प्युअर ब्लड जादूगारांच्या मते हाफ ब्लड कमी दर्जाचे पण अगदीच तिरस्करणीय नाही .
तर ज्यांच्या मागच्या पिढ्यांत कोणी जादूगार नव्हते , ज्यांचा जादूशी काही संबंध नाही अशा मगल कुटुंबात जन्मलेले जादूगार म्हणजे अशुद्ध रक्ताचे - मडब्लड्स किंवा मगलबॉर्न .. हे प्युअर ब्लड्सच्या मते अगदीच खालच्या दर्जाचे , तिरस्करणीय . अशांना जादूगार समाजात प्रवेशच देऊ नये , जादू तंत्रविद्यालयात प्रवेश देऊ नये , जादूचे शिक्षण घेऊ देऊ नये . आणि मगल लोक तर पूर्णच तिरस्करणीय , त्यांच्याशी कसलाच संबंध ठेवायचा नाही .
अर्थात सगळीच प्युअर ब्लड घराणी या मताची नव्हती . काही असा भेद मुळीच मानत नसत आणि सर्व समान हे तत्त्व मानीत . शिवाय जादूगारांच्या घराण्यांची संख्या मुळातच थोडी होती त्यामुळे सुरुवातीच्या काळात तरी वंश टिकवायचा तर भेसळीचा धोका पत्करून मगल लोकांमधून जोडीदार निवडण्याशिवाय पर्यायच नव्हता . त्यामुळे काही प्युअर ब्लड घराण्यांमध्ये असे मगलबॉर्न किंवा मगल लोक जोडीदार म्हणून स्वीकारले गेले आणि हे वंश पुढे वाढले ... आज त्यात जन्माला आलेले काहीजण हाफब्लड तर काहीजण प्युअरब्लड आहेत .
पण काही प्युअर ब्लड घराणी मात्र शुद्ध रक्ताचा अट्टाहास ठेवून बसली त्यामुळे मोजक्या कुटुंबांशी वैवाहिक संबंध जोडण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिला नाही .
बराच काळ जादूगार समाजाची साधारण परिस्थिती वरीलप्रमाणे होती .
हॉगवॉर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्डी / हॉगवॉर्ट्स जादू आणि तंत्र विद्यालय
संपादनहॅरी पॉटरच्या जगात जादूचं तंत्रशुद्ध शिक्षण देणारी 11 विद्यालयं आहेत . त्यापैकी ब्रिटन मधलं विद्यालय म्हणजे हॉगवॉर्ट्स. हॉगवॉर्ट्सची स्थापना सुमारे एक हजार वर्षांपूर्वी केली गेली . गॉड्रिक ग्रिफिनडोर / ग्राइफिन्डॉर , सलझार स्लिदरीन / स्लायदेरीन , रोवेना रेव्हनक्लॉ आणि हेल्गा हफलपफ या चार असामान्य प्रतिभावंत जादूगारांनी हॉगवर्ट्सची स्थापना केली .
चौघांनी चार हाऊस निर्माण केले . जादुई शक्ती असलेल्या मुलांचं वर्गीकरण ठराविक गुणांनुसार या चार हाऊसेस मध्ये केलं जाऊ लागलं .
गॉडरिक ग्राइफिन्डोर यांनी आपल्या ग्रायफिन्डोर हाऊसमध्ये धैर्यवान , शूर , निधड्या छातीच्या मुलांना घेतलं जाईल असं ठरवलं . रोवेना रेव्हनक्लॉ यांनी रेव्हनक्लॉ हाऊस मध्ये बुद्धिमान , प्रतिभासंपन्न मुलांना घेतलं जाईल असं घोषित केलं , सलझार स्लायदेरीन यांनी शुद्ध रक्त , हुशार , महत्त्वाकांक्षी , धूर्त आणि वेळप्रसंगी हवे ते साध्य करण्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करणे , स्वहिताला सर्वोच्च महत्त्व देणे हे गुण महत्त्वाचे मानून अशा विद्यार्थ्यांना आपल्या स्लायदेरीन हाऊस मध्ये समाविष्ट करण्याचं ठरवलं तर हेल्गा यांनी मेहनत कष्ट घेण्याची तयारी असलेले , निष्ठापूर्ण , समंजस , प्रेमळ विद्यार्थी आपण आपल्या हफलपफ हाऊस मध्ये घेऊ असं सांगितलं .
हॉगवार्ट्सची इमारत म्हणजे एक प्रचंड किल्ला आहे . ज्यात अनेक मजले , बुरुज , गुप्त खोल्या , तळघरे वगैरे आहेत . ही इमारत व तिच्या आसपासचा काही एकर परिसरावर मगल लोकांना तो दिसू नये अशी जादू करण्यात आली आहे . जर एखादा मगल मनुष्य तिथे गेला तर " धोका ! दूर राहा ! प्रवेश करू नका ! " असा संदेश लिहिलेली पाटी एका ओसाड , उध्वस्त इमारतीवर लावलेली दिसते .
या चार संस्थापकांनी एक उत्कृष्ट जादू शिक्षण देणाऱ्या विद्यालयाची स्थापना करायच्या हेतूने हॉगवार्ट्सची स्थापना केली खरी पण पुढे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले . सलझार स्लायदेरीन हे सुरुवातीपासूनच शुद्ध रक्ताचे आग्रही होते . त्यांनी मगल कुटुंबात जन्मलेल्या मुलांना हॉगवार्ट्समध्ये प्रवेश देऊ नये असा आग्रह धरला . हा हट्ट उरलेल्या तिघांना मान्य झाला नाही . शेवटी सलझार हॉगवार्ट्स सोडून निघून गेले .
जाण्यापूर्वी सलझार स्लायदेरीनने हॉगवार्ट्समध्ये एक गुप्त तळघर बांधून त्यात एक असा राक्षसी प्राणी ठेवला आहे जो वेळ येताच हॉगवार्ट्सला सगळ्या मडब्लड विद्यार्थ्यांपासून मुक्त करेल . सलझार स्लायदेरीनचा वारस जेव्हा हॉगवार्ट्स मध्ये येईल तेव्हा तोच फक्त या प्राण्याला नियंत्रणाखाली आणू शकेल व तो या प्राण्याकरवी तेव्हा जे कोणी मगलबॉर्न विद्यार्थी असतील त्यांना मारून टाकेल अशी आख्यायिका / दंतकथा पुढे प्रचलित झाली .
अशाप्रकारे १००० वर्षांपूर्वी हॉगवार्ट्सची स्थापना झाली आणि काही वर्षांतच एक संस्थापक विद्यालय सोडून निघून गेला .
हॅरी पॉटर पुस्तके
संपादनक्र. | नाव | प्रकाशन तारीख |
---|---|---|
१ | हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन | ३० जून १९९७ |
२ | हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स | २ जुलै १९९८ |
३ | हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकबान | ८ जुलै १९९९ |
४ | हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर | ८ जुलै २००० |
५ | हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स | २१ जून २००३ |
६ | हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिन्स | १६ जुलै २००५ |
७ | हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज | २१ जुलै २००७ |
चित्रपट
संपादनमुख्य लेख: हॅरी पॉटर
हॅरी पॉटर शृंखलेच्या ७ पुस्तकांपैकी सर्व पुस्तकांवर आधारित चित्रपट (ह्याच नावाचे) आजपर्यंत प्रदर्शित झाले आहेत. फक्त ७व्या पुस्तकावर आधारित दोन चित्रपट निघाले आहेत.
- हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन (हॅरी पॉटर आणि परीस)
- हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सीक्रेट्स (हॅरी पॉटर आणि रहस्यमयी तळघर)
- हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ ॲझकाबान (हॅरी पॉटर आणि अझ्काबानचा कैदी)
- हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर (हॅरी पॉटर आणि अग्निचषक)
- हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स (हॅरी पॉटर आणि फिनिक्स सेना)
- हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिन्स (हॅरी पॉटर आणि अर्ध्या शुद्ध रक्ताचा राजकुमार)
- हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग १ (हॅरी पॉटर आणि मृत्यूदेवतेच्या भेटी)
- हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज - भाग २ (हॅरी पॉटर आणि मृत्यूदेवतेच्या भेटी)
मुख्य पात्रे
संपादन- हॅरी पॉटर
- रॉन विजली - हॅरीचा वर्गमित्र
- हर्मायोनी ग्रेंजर - हॅरीची वर्गमैत्रिण
- नेव्हिल लाँगबोटम - हॅरीचा वर्गमित्र
- आल्बस डंबलडोर - हॉग्वार्ट्झ शाळेचे मुख्याध्यापक
- सेव्हेरस स्नेप - हॉग्वार्ट्झ शाळेमधील एक शिक्षक
- जिनी विजली - रॉनची बहीण व हॅरीची प्रेयसी
- टॉम रिडल (लॉर्ड व्होल्डेमॉर्ट) - हॅरीच्या पालकांचा खुनी व दुष्ट जादूगार
बाह्य दुवे
संपादन- हॅरी पॉटर विकी - हॅरी पॉटर कादंबरीमालिकेला वाहिलेला बाह्य विकी (इंग्लिश मजकूर)
- जे.के. रोलिंग हिचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- ^ "हॅरी पॉटर आणि परीस-Harry Potter Ani Paris by J. K. Rowling - Manjul Publishing House - BookGanga.com". www.bookganga.com. 2021-12-31 रोजी पाहिले.