हुआन पुहोल गार्सिया

हुआन पुयोल गार्सिया (Spanish: Juan Pujol García), (१४ फेब्रुवारी, इ.स. १९१२ - १० ऑक्टोबर, इ.स. १९८८) हा एक, एकाच वेळी परस्पर विरोधी पक्षांकरता हेरगिरी करणारा गुप्तहेर होता.

हुआन पुहोल गार्सिया
Joan pujol garcia.jpg
हुआन पुयोल गार्सिया
जन्म नाव हुआन पुयोल गार्सिया
टोपणनाव गार्बो [ब्रिटिश], अराबेल[जर्मन]
जन्म फेब्रुवारी १४, इ. स. १९१२
कातालोनिया सिटी, बार्सिलोना
मृत्यू ऑक्टोबर १०, इ. स. १९८८
काराकास, व्हेनेझुएला
राष्ट्रीयत्व स्पॅनिश Flag of Spain.svg
कार्यक्षेत्र गुप्तहेरी
पुरस्कार Most Excellent Order of the British Empire, Iron Cross by जर्मनी

हुआन पुयोल गार्सियाने दुहेरी हेरगिरीचे (डबल एजंट) काम जाणीवपूर्वक पत्करले. त्याचे ब्रिटिश टोपणनाव (संकेताक्षर) गार्बो तर जर्मन संकेतनाव अराबेल होते. दोन्ही राष्ट्रांच्या गुप्तहेरसंस्थांना तो आपलाच गुप्तहेर वाटे. त्याला त्याच्या हेरगिरीबद्दल दोन्ही बाजूंनी पुरस्कारही मिळाले होते. ब्रिटिशांकडून मोस्ट एक्सेलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार दिला तर जर्मनांकडून त्याला आयर्न क्रॉस पुरस्कार दिला गेला.

दुसऱ्या महायुद्धाच्या थोडेसेच आधी झालेल्या, स्पॅनिश यादवी युद्धातील कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट दोन्ही पक्षांवर जुआन पुजोल गार्स्या नाराज होता. म्हणून दोस्त राष्ट्रांच्या बाजूने त्याची मनोभूमिका बनत गेली. पुयोल व त्याच्या पत्नीला ब्रिटनअमेरिका अशा दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनांनी सामावून घेण्यास नकार दिला. तरी त्याने हार न मानता, त्या काळात हिटलर - मुसोलिनी मैत्री अक्ष उदयास येऊ लागलेला असताना, कट्टर नाझी समर्थक व (नाझींच्या मदत व सहानुभूतीने सत्तेवर आलेल्या) स्पॅनिश सरकारचा हस्तक अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली व तो जर्मन हेर म्हणून नियुक्त झाला.

जर्मन हेर झाल्यानंतर त्यास ब्रिटनला जाऊन इतर हेरांची भरती करण्यास सांगण्यात आले. पण तो पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे गेला. तिथून प्रत्यक्षात थापा असलेले काही बनावट रिपोर्ट त्याने पाठविले . असले थापाडे रिपोर्ट बनवूनही तो धरला गेला नाहीच, उलट जर्मनांच्या नजरेत विश्वासार्ह बनला. मग त्याने स्वतःसारखेच इतर काही सब-एजंट बनवण्यास सुरुवात केली; फक्त त्या सब एजंटाचे अस्तित्व पूर्णतः त्याच्या कल्पनेतले होते. ह्या काल्पनिक एजंटांवर तो पुढे चुकांचे, उशीरा खबर देण्याचे खापर फोडणार होता. अशा कामगिरीमुळे दोस्तांनाही शेवटी पुजोलचा मैत्रीचा हात स्वीकारावाच लागला. त्याला आता दोस्तांतर्फे सहकुटुंब ब्रिटनला पाठवण्यात आले. त्याचा बॉस/सहकारी टॉमस हॅरिस आणि तो स्वतः अशा दोघांनी उर्वरित युद्धकाळात गुप्तहेरांचे काल्पनिक जाळे सुरुवातीस पत्राने आणि मग रेडियोमार्गे वाढवत ठेवले.

पुयोलची मोलाची ठरलेली कामगिरी म्हणजे ऑपरेशन फोर्टिट्यूड. ह्या ऑपरेशनचे उद्दिष्ट एकच. जर्मनांना दोस्तांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणाबद्दल अनभिज्ञ ठेवणे व जमेल त्या मार्गाने त्याबद्दल जर्मनांची दिशाभूल करणे. पुयोलने मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे जर्मन पास दे कॅले इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच, पास दे कॅले मध्ये अडकवून ठेवल्या.

सुरुवातीचे दिवस आणि खाजगी आयुष्यसंपादन करा

बार्सिलोनामधील कातालोनिया सिटी मध्ये १४ फेब्रुवारी १९१२ रोजी त्याचा जन्म झाला. (काही ठिकाणी ही नोंद २८ फेब्रुवारी अशी दिली आहे). पुयोलने लहानपणीच शाळा अर्धवट सोडली होती. अनेक लहानमोठी कामे तो शिकला होता. कधी हार्डवेअरच्या दुकानात काम कर तर कधी कुक्कुटपालन शीक असे त्याचे उद्योग सुरू होते. वडिलांनी मागे थोडीफार मालमत्ता सोडली होती. पण ती स्पॅनिश युद्धादरम्यानच्या काळात तिथल्या कामगारांनी ताब्यात घेतली. स्पॅनिश यादवी युद्धात एका बाजूला इटली-नाझी यांचे समर्थन असलेला फॅसिस्ट गट होता, तर दुसरीकडे सोव्हियेट रशियाचे कम्युनिस्ट होते. दोन्ही बाजूंकडून त्याला हीन वागणूक मिळाली, कुणी त्याच्या कुटुंबीयांचा छळ केला होता तर कुणाची विचारसरणी त्याला पटेना; म्हणून तो दोन्ही पक्षांवर वैतागला होता. त्याने दोन्ही बाजूंकडून एकेकदा काम केले होते, पण एकही गोळी त्याने कधी कोणत्याही बाजूकडून झाडली नव्हती.

१९४० च्या दरम्यान त्याला हेरगिरी करण्याची संधी त्याने स्वतःहून मागणी करूनही (बहुधा त्यामुळेच) ब्रिटनने दिली नाही. पण मग त्याने ब्रिटनला कार्यालयीन कामासाठी जाऊ-येऊ शकणारा "कट्टर नाझी समर्थक" असा स्पेन सरकारचा अधिकारी म्हणून एक धादांत खोटी ओळख तयार केली. पोर्तुगालमधील स्पॅनिश दूतावासात काम करत असल्याची बतावणी करून त्याने स्पॅनिश राजदूतांसाठीचा पासपोर्टही बनवला. फ्रेडरिको टोपणनाव असणाऱ्या जर्मन गुप्तचरास त्याने गाठले व भुलवले. जर्मनांनी मग त्यास हेरगिरीच्या 'क्रॅश कोर्स'चे प्रशिक्षण दिले. संकेतलेखन/गुप्त लेखन(secret writing), अदृश्य शाई, संकेत पुस्तिका(code book) आणि खर्चायला ६०० पाउंड ह्यांचा त्या कोर्समध्ये समावेश होता. त्याला अराबेल हे टोपणनाव जर्मनांनी दिले.

त्याच्यावर ब्रिटनला जाऊन इतर हेरांची भरती करण्याचे काम सोपवण्यात आले. पण तो (पोर्तुगालची राजधानी) लिस्बन इथे गेला. तिथून त्याने सार्वजनिकरीत्या सहज उपलब्ध असणाऱ्या स्रोतातून माहिती घेत खरे रिपोर्ट म्हणून विश्वास बसावेत असे अनेक खोटे रिपोर्ट बनवले. इंग्लंडचे टूरिस्ट गाइड, रेल्वे वेळापत्रक, चित्रपट रिळे आणि अगदी मासिकातील जाहिरातीही त्याने ह्यासाठी वापरल्या. ब्रिटन फिरत असल्याचा त्याने बहाणा केला. ब्रिटिश रेल्वे गाइड वापरत त्याने फिरण्याचा खर्चही मागितला. ब्रिटनमधील गणनपद्धती त्याला धड समजत नसे. पण मग त्याने कुठे कुठे गेलो हे फक्त सांगण्यास सुरुवात केली व सर्व खर्चाची एकूण गोळाबेरीज नंतर पाठवतो असे तो सांगत राहिला. त्याचे काल्पनिक, अस्तित्वात नसलेले गुप्तचर ब्रिटनभर पसरलेले होते. अर्थात तो कधीच इंग्लंडमध्ये गेला नसल्याने त्याने काही चुकाही रिपोर्ट मध्ये केल्या. पण रिपोर्ट मधील इतर तपशील इतके चपखल बसत होते, की ह्या चुकाही दुर्लक्षित केल्या गेल्या. (ग्लासगो, स्कॉटलंडमधील एक एजंट वाइनवेडा असल्याचे त्याने रिपोर्ट मध्ये लिहिले. प्रत्यक्षात स्कॉटलंडच्या पेयपानाच्या सवयीत वाइनचे स्थान फार वरती नाही. )

अमेरिका युद्धात उतरल्यावर, १९४२ मध्ये त्याने अमेरिकेशीही संपर्क केला. लेफ्टनंट डिमोरेस्ट ह्यांनी ह्याची क्षमता ओळखली व आपल्या ब्रिटनच्या सहकाऱ्यांकडे त्याची शिफारस केली. एकदा पुजोलच्या रिपोर्टच्या आधारे अस्तित्वातच नसलेल्या, नुसताच बागुलबुवा केलेल्या ब्रिटनच्या काही नाविक तुकड्यांचा शोध आणि वेध घेण्यासाठी जर्मनांनी बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च केली होती. ह्यामुळे जर्मनांची कुणीतरी जाणीवपूर्वक दिशाभूल करीत आहे हे ब्रिटनच्या लक्षात आले होतेच. ब्रिटनने मग २४ एप्रिल १९४२ रोजी त्याला ब्रिटनमध्ये प्रवेश दिला. त्याची अधिकृत नेमणूक केली. गार्बो हे टोपणनाव ब्रिटिशांनी दिले.

पुजालोला ब्रिटिश गार्बो म्हणत, जर्मन त्याला अराबेल म्हणत. टॉमी हॅरिस ह्या ब्रिटिश बॉस-तथा-सहकाऱ्याच्या सोबतीने त्याने तब्बल ३१५ पत्रे (सरासरी २००० शब्द असलेले) लिस्बनमधील एका जर्मन पोष्टबॉक्सला पाठवले. जर्मनांना आपण त्यांचा तथाकथित गुप्त रिपोर्ट पाठवीत आहोत असे तो ह्या ३१५ पत्रातून भासावीत होता. त्याने भरभरून पाठवलेल्या माहितीने व त्याने भासवलेल्या गुप्तहेरांच्या काल्पनिक नेटवर्कमुळे आनंदीत झालेल्या जर्मनांनी ब्रिटनमध्ये अधिक हेर पाठवायचा विचारही केला नाही. त्याने दिलेली माहिती हे एक मिश्रण होते. थापा(काल्पनिक कथा), खरी पण लष्करीदृष्ट्या निरुपयोगी माहिती, आणि लष्करासाठी उपयोगी पण बऱ्याच विलंबाने मिळालेली (म्हणूनच निरर्थक ठरलेली) माहिती ह्याचे ते मिश्रण होते.

आफ्रिकेत जर्मन सेनानी रोमेल ह्याच्या झंझावाती मोहिमा सुरू होत्या. त्यास पायबंद घालण्यासाठी १९४२ च्या अखेरीस दोस्तांनी ऑपरेशन टॉर्च सुरू केले. हे ऑपरेशन सुरू होऊन गेल्यानंतर, दोस्तांच्या हल्ले करणाऱ्या नौका वगैरे यथास्थित आफ्रिकेत पोचल्यावर मग पुजोलोने आपला तथाकथित गोपनीय अहवाल तयार केला. "आमच्या क्लायड नदीवरील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोस्तांच्या नौका निघाल्यात. आफ़्रिकेत(भूमध्य सागरात) त्या जाणार असल्याचे ते खात्रीलायकरीत्या कळते" अशा अर्थाचा तो अहवाल होता. काही दिवस पूर्वीची तारीख, त्या तारखेचा सही -शिक्का जमवून तो अहवाल एअरमेलने लिस्बनमधील जर्मन पोस्ट बॉक्सला धाडून दिला. उशीरा आली असली तरी जर्मन इतकी अचूक माहिती पाहून चकित झाले. "उशीरामुळे माहिती उपयोग करू शकलो नाही; खेद आहे. पण तुमची कामगिरी भूषणावह/भन्नाट आहे" असे शिफारसपत्र त्यास जर्मनीकडून मिळाले. हे संदेश तो त्यांच्याकडे कसे पाठवी? तर पैशासाठी पत्रे नेणारे पायलट त्या काळी हॉलंडच्या विमानसेवेत होते. त्यांच्या मार्फत तो ही पत्रे लिस्बन शहरात पाठवी. पण त्यामुळे पाठवण्याच्या वेळा, संख्या ह्यावर बंधने आली. म्हणून जर्मनांच्या मागणीनुसार त्याला आता रेडियो संदेश देणारी व्यवस्था करायची होती. मग त्याने अजून एक काल्पनिक रेडियो ऑपरेटरचे पात्र उभे केले.

कधीकधी माहिती उशीरा पोचवण्यासाठी त्याच्या ह्या "एजंट्स"ची कारणे तो पुढे करी. एकदा तर "लिव्हरपूल मधील एजंट आजारी पडल्याने तिथे सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या हवाई हालचालींची माहिती मिळू शकत नाही" असे त्याने सांगितले. ते पटावे म्हणून काही काळाने तो लिव्हरपूल मधील एजंटचा "मृत्यू" सुद्धा झाला. ही बतावणी खरी वाटावी म्हणून त्याने स्थानिक पेपरात याच्या नावाचा शोकसंदेशही छापला. ते पाहून गहिवरलेल्या जर्मनांनी त्या लिव्हरपूल मधील एजंटच्या पश्चात त्याच्या "विधवा" पत्नीसाठी पेन्शनसुद्धा सुरू केली.

युद्धकाळात रेडियोद्वारे संदेश पोचवायचे काम अर्थातच सरळ होत नसते. थेट संदेश कुणी कुणाला देत नाही. कारण ते हॅक केले जाऊ शकतात. त्यामुळे आधी ते सांकेतिक लिपीत लिहितात(encryption) आणि पुन्हा तो मेसेज मिळेल तेव्हा मूळ रूपात परत आणतात (decryption). ह्यादरम्यान तो कुणाच्या हाती लागला तरी त्यातून काहीच अर्थबोध होऊ नये हा हेतू. आता जर्मनांनी पुजालोशी रेडियोद्वारे संवाद सुरू केल्याने ब्रिटिशांना आयताच विदारुपी कच्चा माल मिळाला. त्यामुळे जर्मनीचे इतरही शेकडो-हजारो सांकेतिक संदेश वाचणे ब्रिटनला शक्य झाले.

ऑपरेशन फोर्टिट्यूड आणि ऑपरेशन ओव्हरलॉर्डसंपादन करा

जानेवारी १९४४ पासून तयारी सुरू झाली युरोपवरील दोस्तांच्या निर्णायक चढाईची. नॉर्मंडीवर ते हल्ला करणार होते. त्याचे नाव होते ऑपरेशन ओव्हरलॉर्ड. ह्या योजनेबाबत जर्मनांची दिशाभूल करण्याचे, नॉर्मंडीमध्ये सेना उतरत नसून Pas de Calais ह्या ठिकाणी त्या उतरत असल्याचे भासवायचे एकहाती कंत्राट अर्थातच पुजालोला देण्यात आले. ह्या दिशाभूल करण्याच्या धंद्याचे नाव होते ऑपरेशन फोर्टिट्यूड. जानेवारी १९४४ ते प्रत्यक्ष घटनेपर्यंत त्याने जवळपास पाचेकशे रेडियो संदेश पाठवले. कधीकधी दिवसाला पंचवीसही संदेश होत. संदेशांची विश्वासार्हता टिकावी म्हणून "अराबेल"रुपी पुजालो किंवा त्याचा एखादा तथाकथित एजंट ह्यांनी मोठ्या हल्ल्याची तारीख व इतर काही तपशील द्यावेत असे ठरले. अर्थातच हे तपशील इतके उशीरा दिले जाणार होते की लष्करीदृष्ट्या निरर्थक ठरावेत, शत्रुपक्षांस हालचाल करण्याचीही उसंत मिळू नये. ५-६ जूनला एक "एजंट", अतिमहत्त्वाची माहिती घेऊन येणार आहे, अशी हवा निर्माण करण्यात आली. रात्री ३ला केलेल्या कॉलला सकाळी आठ वाजेपर्यंत 'गार्बो'रुपी पुजालोला जर्मनांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. नेमक्या ह्याच गोष्टीचे भांडवल करत गार्बोने अधिकाधिक तपशिलांची भर घालत आपली विश्वासार्हता वाढवत ठेवली. त्याने उलट जर्मन अधिकाऱ्यांशी बोलताना चिडचिड/नाराजी व्यक्त केली. "इतका निष्काळजीपणा बरा नव्हे. मी तत्त्वांसाठी इथे माझा जीव धोक्यात घालतोय, अन्यथा हे काम सोडून दिले असते" असे उलट त्यांनाच ऐकवले.

"ब्रिटनच्या आग्नेयेला(दक्षिण पूर्व) फार मोठा फौजफाटा जमा होतोय. खरा हल्ला तिकडूनच होणार आहे. त्या खऱ्या हल्ल्यापासून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नीच ब्रिटिश व अमेरिकन्स नॉर्मन्डीवर एक छोटा हल्ला चढवतील" अशा अर्थाचे संदेश गार्बोरुपी पुजालो व त्याचे काल्पनिक एजंट ऐकवू लागले. ह्या थापा खऱ्या वाटाव्या म्हणून ब्याकग्राउंड मध्ये विमान, रणगाडे, व्हॅन्स ह्यांचे आवाज, गोंगाट हे ही सुरू ठेवले. जणू काही त्या लष्करी तळावरूनच हे साहेब संदेश पाठवून राहिलेत. ही माहिती इतकी महत्त्वाची वाटली की नाझींनी ती थेट हिटलरलाही दाखवली. ही माहिती त्यांना -अती महत्त्वाची वाटली. अत्यंत ऋणी असल्याचा सूर असल्याचा एक प्रतिसंदेश नाझींनी त्याला पाठवला. परिणामी जर्मन Pas de Calais इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच, Pas de Calais मध्ये अडकवून ठेवल्या. खुद्द अत्युच्च सेनानी रोमेलने पुनः पुनः विनंती करूनही नॉर्मन्डीला फौजा हालवण्यास त्याला मनाई केली गेली. नॉर्मन्डीवर हल्ला झाल्याच्या दिवशी Pas de Calais इथे जर्मन फौजा अडकल्या होत्या हे ठीक आहे. पण त्यानंतर दोन महिन्यांनंतरही Pas de Calais इथेच मोठे जर्मन लष्कर होते, उलट तिथेच ते अधिकाधिक जमा करीत होते.

ह्यानंतर जून महिन्याच्याच शेवटी जर्मनीने लंडनवर v1 ह्या क्षेपणास्त्राने हल्ले सुरू केले. (मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले हे पहिलेच अशा प्रकारचे क्षेपणास्त्र असावे. तोवर मानव चलीत विमानेच काय ती बॉम्बफेक करीत. ) ते हल्ले कसे होताहेत, ठीक होताहेत की नाही, किती हानी झाली ह्याचे तपशील जर्मनांनी पुजालोला विचारण्यास सुरुवात केली. आता आली का पंचाईत. ह्याबद्दल संशय येऊ न देता थापा मारणे त्याला जमणार नव्हते. आणि खरी माहिती देणे त्याला स्वतःला पटणार नव्हते. मग काय. त्याला ब्रिटनने "अटक" केली आणि त्याच्या सेवेत खंड पडण्याचे कारण पुरवले. काही दिवसातच "अटके"तून तो परतला. पण पुन्हा लंडनभोवती हेरगिरी करण्यास असमर्थ आहोत असे म्हणत स्वतःची सुटका त्याने करून घेतली.

जर्मनांनी त्याला त्याच्या तथाकथित एजंटच्या नेटवर्कच्या खर्चापोटी तब्बल तीन लाख चाळीस हजार डॉलर दिले. ह्या नेटवर्क मध्ये एकेकाळी सत्तावीस एजंट असल्याचे त्याने त्यांना कळवले होते.

"अराबेल"रुपी पुजालोला २९ जुलै १९४४ला जर्मनांतर्फे Iron Cross रेडियोवरून घोषित करण्यात आला. युद्धानंतर त्याच्या संपर्कातील एका जर्मन अधिकाऱ्याने तो प्रत्यक्ष त्याच्या हाती सुपूर्त केला. शक्यतो हा प्रत्यक्ष लढाईतील सैनिकांना देण्यात येई. हिटलरच्या प्रत्यक्ष परवानगीनंतरच हा दिला जाई. इकडे पंचम जॉर्जच्या हस्ते ब्रिटनच्या वतीने त्याला MBE(Most Excellent Order of the British Empire ) हा ही सन्मान देण्यात आला.

दोन्ही बाजूंकडून असे पुरस्कार मिळणे ही एक दुर्मिळ अशी गोष्ट. आपल्याला फसवण्यात आले हे नाझींना अखेरपर्यंत समजलेच नसावे.

युद्धोत्तरसंपादन करा

आपली खरी ओळख शिल्लक राहिलेल्या नाझींना झाली तर आपली खैर नाही हे पुयोल जाणून होता. युद्ध संपताच तो आफ्रिकेतील अँगोला देशात गेला. नाझींनी आपला पिच्छा सोडून द्यावा म्हणून १९४९ मध्ये त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला आणि वेनेझुएला येथे स्थलांतर केले. त्याने तेथे एका संपूर्ण वेगळ्या ओळखीसह वास्तव्य केले.

इ.स. १९८४ पर्यंत तो असाच शांत अज्ञात जीवन जगत होता. मात्र त्या वर्षी त्याला त्याच्यासंबंधी पुस्तक लिहू पाहणाऱ्या रॉबर्ट अ‍ॅलिसन ह्या ब्रिटिश राजकारण्याने अथक परिश्रम घेऊन हुडकलेच. यासाठी ॲलिसनने गुप्तहेर जगतातील संपर्कस्थाने, पुयोलचे त्या काळातील मित्र, सहकारी, अधिकारी आणि इतर अनेक संपर्क त्याने वापरले. १९८४ला पुजोलला ब्रिटनमध्ये आमंत्रत करण्यात आले. त्याचा प्रिन्स फिलिप ह्यांच्या हस्ते भव्य सत्कारही करण्यात आला. चाळीस वर्षांनी युद्धातील आठवणी जागवण्यासाठी त्याने ब्रिटन ते फ्रांसमधील नॉर्मंडीचा किनारा असा प्रवासही त्याने केला.

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा